…आणि त्या दिवशी मी दारात यमराज पाहिला!

प्रवास

हा प्रसंग आहे मागील वर्षातील बारावीच्या सुट्ट्यांचा.आधार दत्तक संस्थेबरोबर एक वेगळ अनोख नातं निर्माण झालं होत माझं. तो दिवस होता हनुमान जयंती आणि गुड फ्राइडेचा जेव्हा प्रेरणा नावाची अनाथ चिमुकली बाहुली आधारमधे दाखल झाली. दिसायला नाजुक पण आवाज खणखणीत.

त्या दिवसापासुनच तिच्याबरोबर एक मनाचा धागा जोडला गेला होता. कोमेजलेल्या प्रेरणाला खुप वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर एक गंभीर आणि क्वचित होणारा आजार निदान झाला. तब्येत सारखीच ढासळत असल्यामुळे तिला ICU मधे दाखल करावे लागत होते.

माझी बारावी नंतरची सुट्टी चालु असल्यामुळे मी तो वेळ सत्कारणी लावत होते. बोर्डाच्या परिक्षेला सुद्धा उशीरा उठणारी मी तिच्यासाठी पहाटे 5 ला उठून हॉस्पिटलला जायला लागले होते. रात्रपाळी असणाऱ्या आधारच्या मावशी सकाळी 6 वाजता तेथुन निघायच्या आणि मी 6:30 पर्यंत हॉस्पिटलला पोहचायचे.

अखंड 22 दिवस प्रेरणा त्या बेडवर निपचीत पडून होती. परंतु , मी तिच्याशी गप्पा मारायचे म्हणून तीलाही माझ्या स्पर्शाची , आवाजाची सवय झाली होती. रडायला लागली की हॉस्पिटल च्या नर्स सुद्धा म्हणायच्या “पेरू बघ सेजल दिदी आली” की माझी बबडी शांत व्हायची. असच एक सुंदर नातं निर्माण झालं होतं आमच्यामधे.

प्रेरणाचा बेड हा ICU मधील मध्यभागी होता आणि बरोबर बाजुला स्वामी समर्थ यांचा सुंदर फोटो लावलेला होता. कधीही मनापासून देवाला नमस्कार न करणारी सेजल त्या फोटो मधल्या स्वामींना साकड घालत होती. चर्च मधील येशु , दर्गामधील अल्लाह आणि देवळामधल्या देवांना मी तिच्या जीवाची भीक मागत होते.

एके दिवशी दररोजसारखी सकाळी मी हॉस्पिटलला पोहचले. दरवाजा उघडल्यावरचे दृश्य पाहुन माझ्या पायाखालची जमीन हादरली होती. धीर सुटला होता आणि अश्रुंचा बांध फुटला होता. बेडच्या बाजुला 5-6 नर्स आणि 3-4 डॉक्टर जणु माझीच वाट पाहत होते. माझ्या ह्रदयाचे ठोके वाढले होते

आणि प्रेरणाचे कमी होत होते. अश्रुंची धार थांबत नव्हती कारण माझी बाहूली वेगळीच वाटत होती. मी तुटले होते. डॉक्टर ने मला बाहेर जायला सांगीतले आणि त्या दिवशी मी दारात यमराज पाहिला! तो येत नव्हता, तर तो परत जात होता, कारण माझ्या बबडीचा श्वास अजुन चालू होता ! – सेजल सुनील जोशी.