कॅन्सरने आपल्या सगळ्याचा अकाली निरोप घेतलेल्या अभिनेता इरफान खानचा नुकताच वाढदिवस झाला. इरफानच्या अकाली जाण्याने चाहत्यांना धक्का बसलाच पण सिनेसृष्टीही एका उत्तम अभिनेत्याला मुकली. फिल्मी बॅकग्राऊंड नसूनही त्याचा अभिनय प्रवास थक्क करणारा ठरला.
हिरो मटेरिअल न दिसतासुध्दा इरफानने अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीला आपली दखल घ्यायला भाग पाडलं. 29 एप्रिल 2020 मध्ये इरफानचं कॅन्सरशी झुंज देताना निधन झालं होतं. 2018 मध्ये इरफानने त्याच्या आजाराविषयी चाहत्यांशी शेअर केलं होतं. त्यानंतर तो उपचारांसाठी परदेशी रवाना झाला होता. त्याला न्युरो इंडोक्राईन ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार झाल्याचंही त्याने शेअर केलं होतं.
त्यानंतर त्याचे चाहते त्याच्या प्रकृतीसाठी सतत प्रार्थनाही करत होते. पण अखेर त्याला काळाने गाठलंच. इरफानच्या मृत्यूला दिड वर्षाहून अधिक काळ लोटला असला तरी त्याच्या आठवणीत चाहते भावूक होताना दिसतात. इरफानचा मुलगा बाबिलही आता अभिनय क्षेत्रात येण्यासाठी सज्ज झाला आहे. बाबिल लवकरच सिनेमात डेब्यु करणार असल्याचं समोर येत आहे. पण सध्या बाबिल एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.
अलीकडेच 66वा फिल्मफेअर अवॉर्ड्स सोहळा पार पडला. यावेळी अभिनेता आयुष्मान खुराणाने त्याच्या खास शैलीत इरफानला श्रद्धांजली वाहिली आहे. या पुरस्कार सोहळ्यात ‘अंग्रेजी मिडियम’ साठी इरफानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर मरणोत्तर ‘लाईफटाईम अचिव्हमेंट’ पुरस्कार दिला गेला. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. निवेदक राजकुमार राव याच्यासह अनेक सेलिब्रिटींनी इरफानच्या आठवणीत अश्रूंना वाट करुन दिली.
यावेळी इरफानचा मुलगा बाबिल याला मात्र अश्रू अनावर झाले. वडिलांच्या आठवणीने तो भर कार्यक्रमात ढसाढसा रडू लागला. यावेळी आसपासच्या व्यक्तींनी त्याचं सांत्वन केल्याचं दिसून आलं. यानंतर आयुष्मानने इरफानसाठी सादर केलेली कविता प्रत्येकाच्याच मनात घर करुन गेली.
कलाकारों का कभी अतीत नहीं होता,
कभी वर्तमान नहीं होता.
जब भी कोई कलाकार जाता है उसका इस तरह से सम्मान नहीं होता,
क्यूँकि हर कोई फ़नकार इरफ़ान नहीं होता
या कवितेने त्याच्या मनातील इरफानच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी आयुष्मानने बाबिलची भेटही घेतली. अंग्रेजी मिडियम हा इरफानचा शेवटचा सिनेमा होता. यामध्ये इरफानने मुलीला परदेशी शिकायला पाठवण्यासाठी धडपडत असलेल्या बापाची व्यक्तिरेखा साकारली होती. या सिनेमात इरफानसोबत राधिका मदान आणि दीपक डोबरियाल हे देखील होते. इरफानचा मुलगा बाबिल देखील आता वडिलांचा अभिनयाचा वारसा सक्षमपणे पुढे नेताना दिसतो आहे. अनुष्का शर्माच्या आगामी काला या प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे.