भूतांचे गांव विकत घेणारा अवलिया !

प्रवास लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

संपूर्ण जगात अशा अनेक जागा, गावं, घरं आहेत जिथे कोणीही रहात नाही. ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. मग तुम्ही म्हणाल ही गावं वसली कशी किंवा ही घरं बांधली कुणी? तिथे कधीच कुणी रहात नव्हतं हे शक्य नाही, मग तिथे राहणारी लोक गेली कुठे? अशा ओसाड आणि माणसाचा मागमूस नसलेल्या जागांना ‘घोस्ट टाऊन’ असं संबोधलं जातं.

अर्थात अशा सगळ्याच जागा ओसाड पडलेल्या आहेत असं नव्हे, काही जागांचं रूपांतर नॅशनल पार्कमध्ये करण्यात आलेलं आहे, जिथे जगभरातील प्रवासी दरवर्षी भेट देतात. एकट्या अमेरिकेमध्ये अशा ओसाड पडलेल्या तब्बल ३५०० जागा आहेत, ज्यातील मोजक्याच जागा लक्झरी टुरिस्ट स्पॉट म्हणून विकसित करण्यात येत आहेत.

डेथ व्हॅलीजवळ वसलेले आणि वाळवंटी प्रदेशातील पर्वतांनी वेढलेले सेरो गोर्डो, कॅलिफोर्निया हे असंच एक घोस्ट टाऊन. फार पूर्वी इथे चांदीच्या खाणी होत्या आणि कॅलिफोर्निया शहराच्या उभारणीसाठी इथली चांदी कामास आली. जवळपास ३०० एकर जमीनीवर वसलेल्या सेरो गोर्डो इथे एक हाॅटेल, चर्च आणि एक जनरल स्टोअर्स आहे; अर्थातच रिकामं. १९व्या शतकाच्या अखेरीस किंवा २०व्या शतकाच्या सुरुवातीला अधिक चांगल्या संधीच्या शोधात तिकडची माणसं शहरांमध्ये गेली असावीत.

अशा निर्मनुष्य ठिकाणी यायला कोण धजावणार? एक जण मात्र होता. ब्रेंट अंडरवुड. हा ३२ वर्षाचा अमेरिकन उद्योजक. आपल्या मित्राबरोबर त्याने सेरो गोर्डो ही जागा २०१८ मध्ये लक्झरी टुरिस्ट स्पॉट म्हणून विकसित करण्यासाठी विकत घेतली. त्याच्या कल्पनेत ही जागा म्हणजे लोकांच्या ‘स्वप्नांची पूर्ती करणारे स्थान’. ही जागा विकसित करण्याकरीता रेकी तर करावीच लागणार.‌ तर हा पठ्ठ्या सेरो गोर्डो इथे गेला, पण आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे याची त्याला कल्पनाच नव्हती.

याआधी त्याने एचके ऑस्टिन नांवाचं एक हाॅस्टेल सुरू केलं होतं ज्याची मूळ संकल्पना हाॅटेल कम ऑफिस स्पेस अशी होती. रेस्टॉरंट्स आणि बारने गजबजलेल्या रस्त्यावर हे हॉस्टेल १८९२ च्या व्हिक्टोरियन मॅन्शन मध्ये आहे. आरामशीर बंक बेड आणि लॉकर, वाय-फाय, स्वयंपाकघर, लाउंज, तसेच लायब्ररी अशा अनेक सुविधांनी युक्त असं हे हाॅस्टेल त्याने अनेक वर्ष चालवलं.

मार्चमध्ये ब्रेंट अंडरवुड सेरो गोर्डो येथे रवाना झाला ते फक्त काही दिवस राहून तिथे कोणत्या स्पाॅटवर हाॅटेल बांधता येईल ह्याचा अभ्यास करण्यासाठी. झालं मात्र विपरीत. काही दिवसांतच बाहेरच्या जगात कोरोनाचा उद्रेक झाला, शिवाय सेरो गोर्डो इथे अवकाळी हिमवादळ उदभवलं ज्यामुळे तो तिथेच अडकून पडला.

क्षणभर विचार करून पहा. निर्मनुष्य जागा, मैलभर अंतरावर देखील चिटपाखरू नाही, मोबाईल आहे पण संथ इंटरनेट, बोलायला कुणीतरी हवं, तर तेही नाही. बरं, केवळ काही दिवस रहाण्याचं ठरवून आल्यामूळे जवळ अन्नपदार्थ, पाणी इत्यादी अगदी मोजकंच. जेव्हढं आहे तितकंच पुरवत दिवस काढण्याशिवाय पर्याय नाही. साधं दूध आणायचं म्हटलं तर सर्वात जवळचं शहर दोन तासांच्या अंतरावर.

अशा सक्तीने झालेल्या एकांतवासात ब्रेंट अंडरवुड अडकून पडला खरा, पण काही दिवसांतच सावरला. अर्थात आहे त्या परिस्थितीत दिवस काढण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय होता कुठे? अशा निर्मनुष्य ठिकाणी सगळ्यात मोठी समस्या म्हणजे दिवसभर करायचं काय? वेळ घालविण्यासाठी एकही साधन नाही. इंटरनेट आहे, पण मर्यादित प्रमाणात, आणि मोबाईल तरी किती वेळ बघणार? पण तो निराश झाला नाही.

बाहेरच्या जलद गतीने सुरू असलेल्या जगाची सवय असलेला माणूस अचानकपणे संथ आणि शांत वातावरणात ढकलला गेला तर जे होईल, तेच त्याचं झालं. तो जगायला शिकला. आणि आतां तर तो म्हणतो की त्याला इथून हलावसंच वाटत नाही. कारण इथल्या शांततेने आणि संथ जीवनाने त्याला आपल्या जीवनात अधिक महत्त्वाचं काय आहे ते शिकवलं.

त्याने विविध छंद जोपासण्यास सुरुवात केली. प्राण्यांचा मागोवा घेणे; एक रानमांजर रोज रात्री त्याच्या घराच्या अंगणात येत असे, त्याच्या ठशांचा अभ्यास करणे हा एक छंद झाला. त्याने बर्फ वितळवून पिण्यायोग्य पाणी तयार केले, ज्यासाठी हे शहर प्रसिद्ध आहे त्या चांदीच्या खाणीतील बोगद्यांचा शोध लावला जिथे त्याला १९३८ च्या दरम्यान काढलेली भित्तिचित्रे सापडली.

सेरो गॉर्डोमध्ये ४,५०० हून अधिक रहिवासी राहत होते, परंतु आतां केवळ २२ घरं शिल्लक आहेत जी अर्थातच रिकामी आणि जीर्ण अवस्थेत आहेत. काही घरांच्या बाहेर अजूनही नादुरुस्त, गंजलेल्या अवस्थेत असलेल्या गाड्या आहेत, आणि त्यायोगे ब्रेंट अंडरवुड आपला गाड्या दुरुस्त करण्याचा छंद जोपासत आहे.

तिथे मॉर्टिमर बेलशॉ आणि लुईस डी. गॉर्डन या नावाने ओळखल्या जाणार्‍या दोन ऐतिहासिक मॅन्शन आहेत जी १८७० च्या दशकात मेक्सिकन ऑइल बॅरन्सच्या मालकीची होती. त्यापैकी एका मॅन्शनला ब्रेंट अंडरवुड याने आपलं घर बनवलं आहे आणि दुसऱ्या मॅन्शनचं रुपांतर तो लक्झरी हाॅटेलमध्ये करणार आहे.

अमेरिका आणि युरोप सारख्या काही देशांमध्ये भुता-खेतांबद्दल एकूणच प्रचंड आकर्षण आहे. “इथे येईपर्यंत माझा भुता-खेतांवर विश्वास नव्हता”, ब्रेंट अंडरवुड म्हणतो. मला भुतांबद्दल भीतीयुक्त आदर आहे त्यामुळे मी दोन ठिकाणी जाण्याचं कटाक्षाने टाळतो; एक म्हणजे स्मशानभूमी आणि दुसरी, बंक हाऊस.

तिथे काहीतरी अतर्क्य नक्कीच आहे. कारण मी जितका जास्त काळ तिथे असतो, तितक्या जास्त गोष्टी माझ्या बाबतीत घडतात ज्यांचं स्पष्टीकरण मी देऊ शकत नाही.” सेरो गॉर्डोला हाॅलिडे डेस्टिनेशन बनविण्याचे काम सुरू झाले आहे आणि येत्या काही वर्षांत हे घोस्ट टाऊन जगभरातील प्रवाशांचा आवडता टूरिस्ट स्पाॅट होईल याची ब्रेंट अंडरवुडला खात्री आहे.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.