नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
मुळात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं किंवा त्यात कोणत्याही प्रकारची उलाढाल हा एक प्रकारचा जुगारच. एखाद्या शेअरच्या किंमतीत वाढ होईल, की त्या शेअरचा भाव पडेल, ह्याचं भाकित करणं अवघड. अगदी त्या क्षेत्रातील जाणकार देखील अतिलोभापायी म्हणा किंवा अति आत्मविश्वासापोटी बरंच काही गमावून बसतात; अगदी घर-दार सुद्धां. मग ज्यांना त्या क्षेत्रातील जाण नाही, त्यांचं चुकीच्या निर्णयामुळे किती नुकसान होत असेल विचारुच नका. भरीत भर म्हणून जर स्टॉक एक्सचेंजच्या एमडी आणि सीईओ अशा जबाबदार पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने स्टॉक एक्सचेंजचे व्यवहार चालविण्यासाठी हिमालयातील योगीचे मार्गदर्शन घेतले, तर ते अनाकलनीय नाही कां ठरणार?
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या विरोधात सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने जारी केलेला १९० पानांचा दीर्घ अहवाल विशेषत: एका “अज्ञात व्यक्तीच्या” संदर्भामुळे चर्चेत राहिला आहे. एनएसईच्या माजी सर्वेसर्वा चित्रा रामकृष्ण ह्यांनी त्या अज्ञात व्यक्तीला स्टॉक एक्सचेंजबद्दल गोपनीय माहिती दिल्याचा आरोप आहे.
चित्रा रामकृष्ण आणि तथाकथित “योगी” किंवा “सिद्ध पुरुष” यांच्यातील कथित नातेसंबंधावर प्रकाश टाकणारे अनेक अहवाल सादर करण्यात आले आहेत, परंतु सर्वांना भेडसावणारा मोठा प्रश्न हा आहे, की भांडवली बाजार नियामकांनी त्यांच्या तपासात कसूर तर केली नाही?
प्राथमिक तपासात आरोपीने केलेल्या विधानांवर विश्वास ठेवून उघडपणे दिसणाऱ्या सत्याकडे डोळेझाक करण्याऐवजी मूळ कारण किंवा अंतिम लाभार्थी शोधणे आवश्यक ठरते.
सेबीचा आदेश स्पष्टपणे सांगतो की चुकीची कृत्ये करण्यात आली आहेत, परंतु नियामकाने गुन्ह्याचा तपशील शोधण्यासाठी आणि कठोर भूमिका घेण्यासाठी शक्य ते सर्व केले की नाही यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
सेबीने चित्रा रामकृष्ण आणि अनोळखी व्यक्ती यांच्यातील ईमेल पत्रव्यवहाराचा उल्लेख केला आहे परंतु सेबीला स्वतःलाच त्या अज्ञात व्यक्तीची ओळख शोधून काढण्यात रस होता असे दिसत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे सेबीच्या अहवालामध्ये “अज्ञात व्यक्ती” हा शब्द सुमारे २४० वेळा नमूद करण्यात आला आहे.
गोपनीय माहिती उघड करणे हे गंभीर उल्लंघन आहे आणि नियामकांनी भूतकाळात अशा लोकांविरुद्ध कठोर कारवाई केलेली आहे, परंतु या प्रकरणात त्यांनी चित्रा रामकृष्ण यांच्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवलेला दिसतो. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जी तथाकथित “आध्यात्मिक शक्ती” त्यांना दोन दशकांपासून मार्गदर्शन करत आहे त्या व्यक्तीला “कोणत्याही शारीरिक समन्वयाची आवश्यकता नाही आणि ती व्यक्ती तिच्या इच्छेनुसार प्रकट होईल.”
भांडवली बाजार नियामकाकडे अज्ञात व्यक्तीची ओळख उघड करण्यासाठी साधने नाहीत असे गृहीत धरले, तरी त्यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करणे शक्य झाले असते. चित्रा रामकृष्ण आणि अनोळखी व्यक्ती यांच्यातील ईमेल संवादाचे तपशील मिळाल्याचे सेबीच्या अहवालात स्पष्टपणे दिसून आले आहे.
ह्या घडामोडींशी परिचित असलेल्या एका व्यक्तीच्या म्हणण्यानुसार “सत्य हे कल्पनेपेक्षा खूपच वेगळं असतं. सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी सेबीने ईडी किंवा सीबीआय ह्यांची मदत घेणे किंवा सायबर सेलकडे तक्रार दाखल करणे आवश्यक नाही का? प्रकरणाच्या संवेदनशीलतेमुळे आपले नांव गुप्त ठेवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
एक ‘योगी’ चित्रा रामकृष्ण यांना नॅशनल स्टॉक एक्स्चेंज चालवण्यासाठी मार्गदर्शन करत असल्याचे दाखवणाऱ्या इमेल्समध्ये काही मजकूर आहे जो संशयास्पद वाटतो. उदाहरणार्थ, फेब्रुवारी २०१७ मध्ये, योगींनी चित्रा रामकृष्ण यांना लिहिले, “बॅग तयार ठेवा, मी पुढच्या महिन्यात सेशेल्सला जाण्याचे नियोजन करत आहे, तुम्ही माझ्यासोबत येऊ शकाल कां ह्याची मी चाचपणी करेन, कांचन लंडनला जाण्यापूर्वी कांचन आणि भार्गवा आणि तुम्ही दोन मुलांसह न्यूझीलंड येथे जा. पुढील प्रवासासाठी हाॅंगकाॅंग किंवा सिंगापूर हे एक ट्रान्झिट आहे. तुम्हाला मदत हवी असल्यास कृपया मला कळवा, सेशु आवश्यक ते करेल.”
सेबीची बाजू मांडताना कोणी म्हणेल की नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ही एक सूचीबद्ध संस्था नाही आणि त्यामुळे बेकायदेशीर नफा किंवा अनुचित व्यापार पद्धतींचा गुन्हा न्यायालयात सिद्ध करणे कठीण जाईल. परंतु सिक्युरिटीज कायद्यात विषद केले आहे की गोपनीय किंवा अंतर्गत माहिती उघड करणे हा गुन्हा आहे.
बाजारपेठेतील अनेकांना धक्कादायक वाटणारी वस्तुस्थिती अशी आहे की सेबीने अहवालामध्ये काही अनावश्यक तपशील – विशेषत: चित्रा रामकृष्णच्या अनोळखी व्यक्तीशी झालेल्या संवादाच्या संबंधित तपशीलाचा विनाकारण उल्लेख केला आहे. खरं तर पैशाचा ओघ वळविण्याच्या प्रयत्नाचा, किंवा बँक खाती तपासण्याचा किंवा झालेला फायदा तपासण्याचा प्रयत्न करण्याची अधिक गरज होती.
विशेष म्हणजे योगी, बाबा किंवा अगदी राजकीय गुरुंची चौकशी करण्याची सेबीने टाळाटाळ करण्याची ही पहिलीच वेळ नाही. फोर्टिस आणि रेलिगेअर प्रकरणांमध्ये, मालविंदर मोहन सिंग यांनी सेबीला हस्तलिखित निर्देश दिले होते आणि दिल्ली उच्च न्यायालयात एफआयआर आणि प्रतिज्ञापत्र देखील दाखल केले होते, परंतु त्याबद्दल सेबीने कोणतीही कारवाई केली नव्हती.
आतां जरी चित्रा रामकृष्ण हिला अटक झाली असली, तरी देखील हे प्रकरण म्हणजे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असंच काहीसं ठरण्याची जास्त शक्यता आहे.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा