कोर्टामध्ये करावयाचे अर्ज आणि पुरशीस

कायदा

आपण ज्या वेळेस कोर्टात जात येत असतो किंवा आपला स्वतःचा एखादा दिवाणी दावा किंवा एखादी केस दाखल असते अशा वेळेस आपण अनेक प्रकारचे अर्ज कोर्टासमोर दाखल करत असतो. किंबहुना आपले वकील साहेब अर्जावर वादी किंवा प्रतिवादी म्हणून आपल्या सह्या घेऊन असे अर्ज कोर्टासमोर दाखल करत असतात.

त्याचप्रमाणे कोर्टात तुम्ही पुरशीस असे देखील शब्द नेहमीच ऐकला असेल. मग असे किती प्रकारचे अर्ज आपण कोर्टासमोर देतो किंवा ही पुरशीस म्हणजे काय असते ते किती प्रकारे कोर्टासमोर दिली जाते? याबाबत आपण माहिती घेणार आहोत.
पहिला मुद्दा पाहूया.

आजच्या गैरहजरी बाबत माफी होऊन मिळणे बाबत आपण जो अर्ज देतो तो कोणत्या ऑर्डर आणि कोणत्या रुल अन्वये देतो आणि त्या अर्जामध्ये काय काय लिहायचे असते त्याचबरोबर गैरहजेरी बाबतचा अर्ज किती रुपयाचे कोर्ट फी स्टॅम्प लावायचे असते? जसे की आपणा सर्वांना हे माहिती आहे की गैरहजेरी माफी बाबतचा अर्ज दिवानी तसेच फौजदारी प्रकरणांमध्ये देखील आपण देत असतो.

दिवाणी दाव्यामध्ये गैरहजारी माफी बाबतचा अर्ज आपण दिवानी प्रक्रिया सहित १९०८ चे ऑर्डर १७ रूल १ अन्वये देत असतो. तसेच फौजदारी प्रकरणांमध्ये असा गैरहजेरी माफी अर्ज फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 309 अन्वये देत असतो.
आता पाहूया की अशा अर्जामध्ये काय काय मजकूर लिहायचा असतो.

प्रत्येक अर्जा मध्ये किंवा पुरशीस मध्ये वर कोर्टाचे नाव आणि त्याखाली वादी आणि प्रतिवादीचे नाव संपूर्ण मजकूर सारखाच असतो त्यामध्ये काही बदल होत नाही. परंतु जो मुख्य मजकूर असतो तो बदलत असतो जसे की समजा आपण गैरहजेरी माफी बाबतचा अर्ज कोर्टासमोर देत असू तर त्यामध्ये वर कोर्टाचे नाव त्याखाली वादी आणि प्रतिवादी चे नाव त्यानंतर तुमचा दावा किंवा तुमची केस त्या तारखेस कशासाठी प्रलंबित आहे ते लिहायचे असते.

आणि त्यानंतर महत्त्वाचा येतो तो मुख्य पॅरेग्राफ. जसे की समजा वकील साहेब आजारी आहेत मग तुम्ही असे लिहिले पाहिजे की आज रोजी सदर दाव्याचे कामकाज अमुक या स्टेजवर प्रलंबित असून वादी किंवा प्रतिवादी जो कोणी असेल त्यांचे वकील साहेब आज रोजी आजारी असल्याने कोर्टात हजर राहून दाव्याचे कामकाज चालू शकत नाही.

तर कोर्टाने आजची तारीख तहकूब करून न्यायाच्या दृष्टीने पुढील योग्य ती तारीख नेमून द्यावी. असा गैरहजेरी माफी बाबतचा अर्ज लिहून त्याखाली उजव्या कोपऱ्यामध्ये तुमची सही त्यानंतर डाव्या कोपऱ्यामध्ये दिनांक आणि स्थळ लिहावे आणि अशा गैरहजेरी माफी म्हणजेच कामकाज तहकूबी साठीच्या अर्जास दहा रुपये किमतीचे कोर्ट फी स्टॅम्प म्हणजेच साध्या भाषेमध्ये दहा रुपयाचे तिकीट लावणे आवश्यक असते.

आता फौजदारी प्रकरणांमध्ये ज्यावेळेस आरोपी गैरहजर राहत असतो परंतु वकील साहेब त्या केसचे कामकाज कोर्टासमोर चालवणार असतात त्यावेळेस आरोपीच्या गैरहजेरीत केसचे कामकाज चालवण्यास परवानगी मिळण्यासाठीचा अर्ज आपण देत असतो. असा अर्ज ज्यावेळेस द्यायचा असतो.

त्यावेळेस त्या अर्जास फक्त पाच रुपये किमतीचेच टिकीट लावायचे असते आणि याच परिस्थितीमध्ये जर आरोपी देखील गैरहजर असेल तसेच वकील साहेब देखील कामकाज चालवणार नसतील तर तुम्हाला कामकाज तहकुबीसाठीचा अर्ज दहा रुपयाची तिकीट लावून द्यावे लागेल.

प्रत्येक अर्ज हा एक सारखा असाच असतो वेगळे असते ते त्यामधील कारण. जसे की तुमच्याकडे आज साक्षीदार उपलब्ध नसेल तर तुम्ही कोर्टास अर्ज लिहिताना असे लिहू शकता की आज रोजी साक्षीदार हजर नसल्याने पुढील तारीख निवडून मिळावी. तसेच जर तुमच्याकडे आज कागदोपत्री पुरावे नसतील तर पुरावे देण्यास मुदत मिळावी असे तुम्ही लिहू शकता.

म्हणजेच तुम्ही अर्ज मधील मूळ मजकूर जसे की कोर्टाचे नाव पार्टीची नावे तुमच्या केसची स्टेज आणि तुमची विनंती हे प्रत्येक अर्जामध्ये एकसारखेच असते आणि जो मुख्य मजकूर आहे तोच तुम्हाला बदलावा लागतो. यामध्ये असे काही अर्ज असतात की ज्यामध्ये संपूर्ण अर्ज बदलतो जसे की तारखेस पक्षकार हजर राहत नसेल किंवा मग असे समजून चालू की वादी ही बँक आहे.

आणि प्रतिवादी हा कर्जदार आहे आणि वादी बँकेने कर्जाच्या अनुषंगाने कोर्टामध्ये काहीच कागदपत्रे दाखल केलेले नाही तर अशा परिस्थितीमध्ये प्रतिवादी कोर्ट मध्ये स्पेसिफिक अर्ज देऊ शकतो की कोर्टाने वादीस कर्जबाबतची सर्वतोपरी कागदपत्रे या दाव्यामध्ये दाखल करणेबाबत आदेश करावे. मग या अर्जामध्ये अगोदर सांगितल्या प्रमाणे ठराविक असा मजकूर नमूद नसतो.

आता माहिती घेऊया पुरशीस बद्दल. पुरशीस म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर आपण अगोदर पाहिलेले विनंती अर्ज आणि ही पुरशीस या दोन्ही मधील फरक जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. जो विनंती अर्ज असतो आपण त्याद्वारे कोर्टास एक विशिष्ट मागणीसाठी विनंती करत असतो.

परंतु जी पुरशीस असते ती तुमच्या दाव्यामधील किंवा केसमधील एखादी माहिती कोर्टास कळावी यासाठी आपण पुरशीस देत असतो. पुरशीस अनेक प्रकारच्या असतात जसे की पुरावा बंद करण्यासाठीची पुरशीस, वादी व प्रतिवादी मध्ये तडजोड झाले बाबतचे पुरशीस, दाव्यामधील एखादा प्रतिवादी मयत झाला असेल तर त्याबाबतची पुरशीस.

मग ही प्रत्येक माहिती कोर्टास कळावी यासाठी वेगवेगळ्या पुरशीस असतात. कोणत्याही प्रकारच्या पुरशीसला कोणत्याही प्रकारचा स्टॅम्प अथवा तिकीट आपण लावत नाही. त्यामुळे पुरशीस मध्ये फक्त आणि फक्त माहिती असणे गरजेचे असते आणि अर्जामध्ये विशिष्ट मागणी आणि त्या अनुषंगाने कोर्टास विनंती देखील करायची असते.