तुम्हाला माहीत आहे का भारतीय संसदेत पंखे उलटे बसवलेले आहेत! यामागेही एक खास कारण आहे, जाणून घ्या.

लोकप्रिय

आपल्या सर्वांच्या घरात फॅन आहेत. उन्हाळ्यात तेच तर आपल्याला घामाच्या धारांपासून वाचवतात. आपल्याला आराम देतात. तुमच्या घरात हे पंखे कसे लावले आहेत? असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला, तर तुम्हाला वाटेल की, हा काय प्रश्न झाला? पंखे छतापासून खालच्या दिशेने लटकलेले आहेत हे उघड आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की भारताच्या संसदेत पंखे उलट दिशेने बसवलेले आहेत. म्हणजेच फॅन छतावर नाही तर जमिनीवर बसवले आहेत. हे ऐकून आश्‍चर्य वाटेल, पण हे खरे आहे. यामागील कारणही खूप रंजक आहे, चला तर मग जाणून घेऊया संसद भवनातील उलट्या फॅन बद्दल.

1921 चे बांधकाम : संसद भवनाच्या सेंट्रल हॉलचे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ पाहिल्यास तेथे फॅन उलट दिशेने असल्याचे तुमच्या लक्षात येईल. 21 फेब्रुवारी 1921 रोजी ड्यूक ऑफ क्नॉट याने संसद भवनाची पायाभरणी केली होती. संसद भवनाच्या डिझाईनची जबाबदारी प्रसिद्ध आर्किटेक्चर सर एडविन लुटियन्स आणि सर हर्बर्ट बेकर यांना देण्यात आली होती. संसद भवन बांधण्यासाठी ६ वर्षे लागली. इमारत तयार झाल्यानंतर, भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड इर्विन यांनी 18 जानेवारी 1927 रोजी तिचे उद्घाटन केले. त्या काळात या इमारतीसाठी 83 लाख रुपये इतका खर्च आला होता. संसद भवनाची अनेक वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे त्याची रचना खूप वेगळी आहे. त्यातील एक म्हणजे त्याच्या मध्यवर्ती हॉलमध्ये जमिनीवर बसवलेला सिलिंग फॅन.

हे आहे कारण : आता तुम्ही विचार करत असाल की यामागे काय कारण आहे. वास्तविक, यामागचे कारण म्हणजे त्याची वास्तुकला. जेव्हा संसदेची इमारत बांधली गेली तेव्हा तिचा घुमट मुख्य बिंदू मानला गेला, त्यामुळे तो खूप उंच ठेवण्यात आला. ही गोष्ट आहे 1921 सालची आणि त्या वेळी एअर कंडिशनर नव्हते आणि सीलिंग खूपच उंच असल्याने पंखे बसवणे खूप कठीण होते. त्याचबरोबर लांबलचक रॉडच्या सहाय्याने पंखे लावल्याने संसदेच्या सौंदर्यावर परिणाम होत होता.

अशा स्थितीत खांबावर पंखे बसवण्याचा विचार झाला. मग काय, मध्यवर्ती सभागृहाची लांबी लक्षात घेऊन त्याची हवा सभागृहाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचावी यासाठी खांब तयार करून त्यावर उलटे पंखे बसवण्यात आले. मात्र, नंतर तेथे AC बसविण्याची चर्चा सुरू झाल्यावर संसदेची ऐतिहासिकता जपण्यासाठी हे पंखे आहे त्या स्थितीत ठेवण्याचा निर्णय झाला. त्यामुळे संसदेचे सौंदर्य आणि ऐतिहासिकता जपली गेली.

चौसठ योगिनी मंदिरापासून मिळाली प्रेरणा : आता फॅन मागची गोष्ट तर कळली असेल, पण अजूनही मनात एक प्रश्न असेल तो म्हणजे एवढ्या उंच घुमटाची काय गरज होती? यामागेही एक रंजक गोष्ट आहे. आपले संसद हे एका मंदिराच्या धर्तीवर बांधले गेले आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही बरोबर वाचले, एका मंदिराच्या धर्तीवर त्या मंदिराचे नाव चौसठ योगिनी मंदिर असे आहे.

भारतात 4 चौसठ योगिनी मंदिरे आहेत, दोन ओरिसात आणि दोन मध्य प्रदेशात. परंतु मध्य प्रदेशातील मुरैना येथील चौसठ योगिनी मंदिर सर्वात प्रमुख आणि प्राचीन आहे. हे मंदिर त्याच्या भव्य वास्तुकला आणि सुंदर बांधकामासाठी ओळखले जाते. भव्य वास्तुकला आणि अत्यंत सुंदर डिझाइन केलेले मंदिर गोलाकार पायावर बांधले आहे आणि त्यात 64 खोल्या आहेत. प्रत्येक खोलीत एक शिवलिंग आहे. या मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुमारे 200 पायऱ्या चढाव्या लागतात. त्याचवेळी मधोमध एक मोकळा मंडप आहे, त्यामध्ये मोठे शिवलिंग आहे. हे मंदिर 1323 मध्ये बांधले गेले.

ब्रिटीश आर्किटेक्ट एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी या मंदिराच्या आधारे दिल्लीचे संसद भवन बांधले. संसद भवनाची संपूर्ण वास्तू या मंदिरावर आधारित आहे. ज्याप्रमाणे हे मंदिर गोलाकार पाया आणि 101 खांबांवर आहे. त्याच प्रकारे, संसद भवनाचे मुख्य आकर्षण म्हणजे अतिशय उंच घुमट आणि 144 खांब. आपले संसद भवन हा देशाचा ऐतिहासिक वारसा आहे. जगातील भव्य वास्तुकलेच्या काही उत्कृष्ट नमुनांपैकी एक मानली जाते. त्यामुळे आता जेव्हाही तुम्ही दिल्लीला जाल तेव्हा संसद भवनाला नक्की भेट द्या. तिथे तुम्हाला काही मनोरंजक गोष्टींसह एक अतिशय नेत्रदीपक आणि भव्य वास्तुकला पाहायला मिळेल.