जमीन मोजणी: फेरफार म्हणजे काय? फेरफारचे प्रकार, चुकिच्या नोंदी, दुरुस्ती याविषयी सविस्तर माहिती !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

शेतीच्या जमिनीच्या कामकाजाच्या वेळी अनेकदा आपण फेरफार हा शब्द ऐकत असतो, पण आपल्या पैकी बरेच जणांना फेरफार म्हणजे काय, त्याचे प्रकार किती असतात, किंवा त्याच्या नोंदी कशा करतात या बद्दल काहीच माहिती नाही. आणि म्हणुनच आज आपण फेरफार बद्दल माहिती जाणून घेऊ. फेरफार म्हणजेच नाव नमुना नं 6 मधील नोंदी म्हणजेच हक्क संपादनाचे पत्रक व फेरफार नोंदवही.

या नोंदवहीत जमिनीचे सर्व व्यवहार, वारस, खरेदी विक्री, तारीख खरेदी रकमा व संबंधित माहिती तपशीलवार मिळते. या फेरफार नोंदवाहिवरील नोंदीच ७/१२ वर येतात. ७/१२ वर कोणताही हक्क नोंदवण्यापूर्वी फेरफार नोंद केली जाते. गावदप्तरी याला गाव नमुना नं ६, फेरफार ची नोंदवही अस म्हणतात.

अनेक ठिकाणी हा नमुना ड म्हणून तर काही ठिकाणी नोंदीचा उतारा म्हणून प्रसिद्ध आहे. फेरफराची नोंदवही ही वास्तविक फेरफाराची दैनंदिनी आहे. जमिनीच्या अधिकारामध्ये जसा जसा बदल होत जातो, त्याचप्रमाणे अनुक्रमाने  या नोंदी घेतल्या जातात. शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा हा गाव नमुना असून त्याबाबत योग्य ती दक्षता व काळजी त्या त्या वेळी न घेतल्या मुळे अनेकांच्या जीवनात फेरफार जीवनात फेरफार घडवून आणणारी हीच ती फेरफार नोंदवही.

गाव नमुना ६ म्हणजेच फेरफार नोंदवही चे चार प्रकार पडतात. 1.गाव नमुना नं ६ अ, विवादग्रस्त प्रकरणाची नोंद वही-फेरफारास हरकत घेतली असल्यास त्याची  तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांच्या निर्णयाची माहिती या नोंदवहीत असते. 2.गाव नमुना नं ६ ब विलंब शुल्क नोंद वही-विलंब शुल्काच्या सर्व नोंदी यात केल्या जातात. 3.गाव नमुना नं ६ क वारस प्रकरणाची नोंद वही 4.गाव नमुना नं ६ ड पोट हिस्स्याची नोंद वही-या वहीत पोट हिस्स्याची वाटणी, भूसंपादन याची नोंद असते.

फेरफाराच्या नोंदी कशा करतात? तर या मध्ये स्तंभ आखले जातात, पहिल्या दिवशी स्तंभात फेरफार नोंदीचा अनुक्रमांक लिहला जातो. दुसऱ्या स्तंभात हक्क प्राप्त केलेल्या व्यक्तीच्या अधिकाराचे स्वरूप लिहले जाते. यामध्ये फेरफाराचा दिनांक, सूचना मिळाल्याचा दिनांक, व्यवहाराचे स्वरूप, संबंधित खातेदारची नावे, व्यवहाराचा दिनांक, मोबदला रक्कम इत्यादी तपशील असतो. स्तंभ तीन मध्ये जमिनीचा व्यवहार ज्या गट नं किंवा सर्वे नं शी संबंधित आहे त्याचा नं लिहला जातो.

चौथ्या स्तंभात अशाप्रकारे केलेल्या फेरफरात संबंधितांना नोटीस देऊन, चौकशी करून व केलेला फेरफार बरोबर करण्यात आला आहे याची स्वतः खात्री करून प्रमाणन अधिकारी (बहुदा मंडळ अधिकारी) त्यांचा आदेश स्तंभ चार मध्ये देतात व पदनाम  लिहून स्वाक्षरी करतात. फेरफाराच्या  नोंदी कोण करतात? राज्यभर या नोंदी तलाठी मंजूर करतात असा गैरसमज आहे. फेरफार नोंदी या फक्त तलाठ्याकडून लिहिल्या जातात. त्या मंजूर किंवा नामंजूर करण्याचा अधिकार तलाठ्यास नाही.

या नोंदी मंडळ अधिकारी किंवा सर्कल भाऊसाहेब हे प्रमाणित करतात. कोणतीही नोंद एकदा मंजूर किंवा नामंजूर झाल्यावर त्या मध्ये बदल करण्याचा तलाठयास किंवा मंडळ अधिकाऱ्यास कसलाही अधिकार नाही. शेत जमीन किंवा इतर जमीन एखाद्या व्यक्तीकडे खरेदी करून किंवा इतर कारणाने येते, अशी प्राप्त झालेली जमीन आपल्या मालकीची आहे याची रीतसर नोंद करणे गरजेचे आहे. त्यासाठी ती जमीन आपल्या कडे कशाप्रकारे, कश्यापद्धतीने आली याचे पुरावे सादर करावे लागतात.

त्या कागदपंत्राच्या आधारे सर्व प्रथम फेरफार नोंद लिहली जाते व ती प्रमाणित आहे की नाही हे तपासण्याची प्रक्रिया सुरू होते. फेरफार नोंद व प्रमाणित नोंद याबद्दल काही महत्वाच्या बाबी खालील प्रमाणे आहेत: -मंजूर किंवा नामंजूर झालेल्या नोंदी मध्ये कसलाही बदल करण्याचा अधिकार तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांना नाही. या मंजूर अथवा नामंजूर नोंदी विरुध्द बाजू  मांडण्यासाठी संबंधित प्रांत अधिकारी यांच्या कडेअपील करावी लागते. फेरफार नोंद झाल्यावर लगेचच त्यांची नोंद ७/१२ वर केली जाते. ७/१२ वरील मालकी हक्काचा उल्लेख हा फेरफार नोंदीत असतो.

कायद्याने प्रमाणित नोंद चुकीची आहे हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत ती खरी मानण्यात येते. जमिनीच्या अधिकारात होणाऱ्या बदलानुसार त्या क्रमवारीत त्याच्या नोंदी होत असतात. ७/१२वरील झालेला बदल कसा आहे याची गेल्या शंभर वर्षातील माहीती फेरफार नोंद वाचल्यावर कळू शकते. फेरफार वरून खातेदाराच्या मालकीच्या एकूण  जमिनीबाबत महिती मिळते. फेरफाराची आसामीवर  खतावणी, आठ अ चा उतारा, जमाबंदी पत्रक असेही म्हणतात. आठ अ वर खातेदाराच्या नावावर असलेल्या सर्व जमिनीच्या गटांची, त्याचा जमीम महसूल, आणि इतर कर याची माहिती मिळते.

फेरफार नोंदीतील चुकीच्या नोंदीची दुरुस्ती:-फेरफार मध्ये  झालेल्या चुकांमुळे ७/१२ वर तशीच नोंदी ओढली जाते. 1.लेखनातील चुका ब त्याची दुरुस्ती-हमखासपणे नावात चूका होतात, गट नं वगळला जातो अश्या वेळी नव्याने नोंद घेण्याची आवश्यकता नसते.लेखनातील चूका दुरुस्त करतेवेळी खातेदाराने थेट संबंधित तहसीलदाराकडे अर्ज करावा, त्यांना कलम 155 महाराष्ट्र महसुल अधिनियमाखाली संबंधित रेकॉर्ड दुरुस्त करून घेण्याचे अधिकार असतात. ज्या प्रकरणात महसूल खात्याची चूक असते त्या केसेसमध्ये तहसीलदार निर्णय घेऊन चूक दुरुस्त करून घेऊ शकतात. मात्र योग्य ती कार्यवाही करावी असा आदेश खालील महसूल कर्मचाऱ्यांना देऊ नये. तर जमीन महसूल कायद्यातील संबंधित तरतुदी खाली चूक दुरुस्त व्हावी असे आदेश द्यावेत.

2.हक्कांबाबत होणाऱ्या चूका व त्याची दुरुस्ती:-जमिनीचा मालकी हक्क, कुळ, वारसा, उत्तराधिकारी  इत्यादी हक्कांमध्ये आपल्याला स्थान देण्यात आले नाही असे वाटणाऱ्या व्यक्तीला योग्य त्या पुरावांच्या आधारे आपणास सदर बाबत हक्क आहे, हे मांडण्यासाठी फेरफार नोंदी विरुद्ध  रीतसर अपील किंवा फेर तपासणी केली पाहिजे.

3.जमीन व्यवहाराच्या  बाबतीत फेरफार मध्ये झालेल्या चुका व त्यांची दुरुस्ती:-पूर्वी झालेल्या नोंदीमध्ये  दुरुस्ती संबधी नोंदणी दुबार होणे कामी अपील करावी लागते, असा अर्ज केल्यानंतर फेर तपासणी केली जाते व नंतरच दुरुस्ती संबधी निर्णय घेण्यात येतो. शेतकरी तहसीलदार कार्यालयात तक्रार दाखल करतात व फेरफार नोंदीमध्ये दुरुस्तीचा आग्रह धरतात पण त्यासाठी कार्यालयीन प्रक्रिया पार पाडावी लागते जरी चूक असेल तरी सुद्धा.

चुकीची नोंद होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी:- चुकीच्या नोंदी होऊ नये म्हणून शेतकऱ्याने  आपला ७/१२  वेळोवेळी तपासून पाहावा व चूक असल्यास तलाठ्याला दाखवावे. 1.पीक पाहणीच्या काळात जमीन मालक सोडून दुसऱ्या कुणाचे ही नाव वाहिवाटदार सदर दाखल करण्याचे अधिकार तलाठ्यांना नाही. त्यामुळे जमीन मालक सोडून अन्य व्यक्ती वाहिवाटीचा दावा करीत असेल तर फक्त अहवाल पाठवण्याची जबाबदारी गाव कामगार तलाठ्याची आहे.

त्यानंतर रीतसर चौकशी करून वाहिवाटदार सदरी कोणाचे नाव लावावे याचे आदेश तहसीलदार यांच्या कडून दिले जातात. 2.पीक पाहणीच्या काळात, शेतातील पिके व त्याचे क्षेत्र व झाडे याची नोंद ७/१२ वर करणे. 3.आपल्या शेतात किती क्षेत्रावर आपण कोणते पीक घेतले आहे व त्याची अचूकपणे ७/१२ वर नोंद झाली आहे की नाही याची काळजी शेतकऱ्याने घेणे गरजेचे आहे चर्चा गावांमध्ये असेल.

4.एखाद्या महत्वाच्या विषयासंबंधी माहीती, गावी करण्यात आलेले प्रसिध्दीकरण वाचून घेतली पाहिजे उदा. मतदार यादीवर जर हरकती मागवल्या असतील तर आपकल्या घरातील सर्वांची नावे नोंदवली आहेत काय ? हे बघणे शेतकऱ्याच्या हिताचे आहे. 5.नवीन शर्तीच्या जमिनीचे हस्तांतरण झालेले आढळल्यास त्याचा अहवाल तहसीलदार यांच्या कडे पाठवणे. 6.संबंधित शेतकऱ्यांनी  याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याकडे कामकाज चालवले पाहिजे.

नवीन शर्तीच्या जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतर होणार नाही, हे बघण्याची जबाबदारी तालाठ्याची आहे. असे हस्तांतर कायदेशीर करण्याचे अधिकार तहसीलदार यांचे कडे नाही त्यामुळे तसा आग्रह धरू नये. 7.जेव्हा गावात नवीन शिधापत्रिका दिल्या जातात तेव्हा घरातील सर्व व्यक्तींची नोंद आवश्यक पणे त्यावर करावी. 8.पीक पाहणी व नोंदणी कालावधीत शेतकऱ्यांने जातीने हजर राहावे. 9.शेजारच्या शेतकऱ्याने मोजणीचा दगड हलवला किंवा काढून टाकला तर मंडळ अधिकारी किंवा तलाठी यांना ताबडतोब लेखी अर्ज देता येईल.

10.कॅनॉल, पाझर तलाव, स्मशानभूमी, गावठाण वाट, रस्ता अशा सार्वजनिक कामात जमीन संपादन केली जाते, त्यावेळी शेतकऱ्याने जागेवर उपस्थित राहणे, नक्की कोणत्या बाजूची जमीन विचारात घेतली आहे हे जाणून घेतले पाहिजे. आपण गैरहजर राहिलो तर सरकारला जमीन घेता येणार नाही असा एक मोठा गैरसमज शेतकऱ्यांत दिसून येतो. वास्तविक समक्ष उपस्थित राहून किती जमीन व कोणत्या बाजूची जमीन घेतली आहे हे कळू शकते शिवाय भूसंपादनाची अंतिम अधीसूचना प्रसिद्ध होण्यापूर्वी योग्य ती हरकत शेतकरी करू शकतो. समक्ष उपस्थित राहिल्यास अनेकवेळा जमिनीची प्रत व भूसंपादनाचे  क्षेत्र याबाबत ताडजोडीतून मार्ग काढता येतो.

वादग्रस्त फेरफार ;-हस्तांतरणाबाबत  फेरफार मध्ये ज्यांच्या ज्यांच्या हितसंबंध असेल अशा सर्वाना लेखी किंवा तोंडी हरकत घेता येते. मिळालेल्या हरकतीची वरिष्ठ महसूल अधिकारी, न्यायालय,किंवा नोंदणी अधिकारी यांच्या कडून प्राप्त अ पत्रकाची नोंद तात्काळ नोंद वहीत करून चावडीवर त्याची प्रत ठळकपणे चिटकवणे बंधनकारक असते. तसेच त्यासंबंधीच्या नोटिसा सर्व संबंधितांना देणे अनिवार्य आहे. अशा नोटिसा दिल्यानंतर तोंडी किंवा लेखी हरकत घेता येते, वादग्रस्त नोंदी या वेगळ्या नोंदवहीत ठेवणे बंधनकारक असते.

अशा हरकतीस लगेच पोच देने बंधनकारक असते. वादात्मक प्रकरणात अव्वल कारकुणापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याने किंवा भूमापान अधिकाऱ्याने सहा महिन्यांचा आत निर्णय घ्यायचा असतो. संबंधित फेरफार वहीत संबंधित नोंदीपुढे दिलेल्या निर्णयाचा निर्देश करून नोंद प्रामाणित किंवा रद्द करायची असते. व नोंद प्रमाणित झाल्यावरच त्याची नोंद गाव नमुना ७ म्हणजेच ७/१२ वर  घेतली जाते. ७/१२ वर आळे करून जुन्या हक्काधारकाच्या नावावर कंस करून नवीन हक्कधारकाचे नाव तपशिलासह नोंदवले जाते. अशा प्रकारे फेरफार नोंदीचे हे महत्व लक्षात घेता अगदी मागील १०० वर्षात  ७/१२ मधील झालेले बदल हे फेरफार वहितील फेरफार नंबर ची नोंद वाचली असता समजू शकते.

4 thoughts on “जमीन मोजणी: फेरफार म्हणजे काय? फेरफारचे प्रकार, चुकिच्या नोंदी, दुरुस्ती याविषयी सविस्तर माहिती !

  1. कुळकायद्यातील परत आलेल्या जमिनी परस्पर विक्री करता येतात का?

Leave a Reply

Your email address will not be published.