पोलिस स्थानकात तक्रार कशी दाखल कराल? FIR म्हणजे काय? FIR कोण दाखल करु शकतो? तक्रारदार महिला असेल तर.?

बातम्या लोकप्रिय शैक्षणिक

FIR म्हणजे First Information Report, प्रथम खबर अहवाल या बद्दल आपण सगळ्यांनी च ऐकलं आहे पण FIR म्हणजे नक्की काय असतो, तो कसा करायचा किंवा पोलिसात तक्रार कशी दाखल करायची हे आपल्याला माहीत नसतं. म्हणूनच FIR म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊ. प्रथम माहिती अहवाल म्हणजे झालेल्या गुन्ह्याविषयी पोलिसांना दिलेल्या सविस्तर माहितीचे लिखित स्वरूप असते. ही औपचारिक तक्रार असून तिच्या आधारे पोलीस तपस करण्यास सुरु करतात.

जी कोणी व्यक्ती गुन्ह्याची माहिती सर्वात पहिले पोलिसांना देते त्या व्यक्तीच्या नाव व सहीने प्रथम माहिती अहवाल दाखल होतो. त्याची एक प्रत त्या व्यक्तीला देणे बंधनकारक आहे. भारतीय कायद्यामध्ये गुन्ह्याचे दोन प्रकार पडतात १.दखलपात्र गुन्हा, २.अदखलपात्र गुन्हादखलपात्र गुन्हयामध्ये चोरी, घरफोडी, मोटरवाहनचोरी,अपघात, सोनसाखळी चोरी, हल्ला, बलात्कार, हल्ल्याचा प्रयत्न, खंडणी हे दखलपात्र गुन्हे आहेत.

अशा गुन्ह्यात पोलीस आरोपीला वॉरंट शिवाय अटक करु शकतात, तसेच कोर्टाच्या आदेशाशिवाय पोलीस केस चा तपास करू शकतात. या साठी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करावा लागतो. दखलपात्र गुन्ह्याची फिर्याद नोंदविल्यावर FIR ची  प्रत फिर्यादीस विनामूल्य देण्यात येते. अदखलपात्र गुन्ह्यामध्ये किरकोळ गुन्हे येतात. अशा गुन्हामध्ये वॉरंट शिवाय आरोपीला अटक करता येत नाही. तसेच कोर्टाच्या आदेशाशिवाय केसचा तपास सुरू करता येत नाही.

अदखलपात्र गुन्हा पोलीस किरकोळ प्रकरणात दाखल करतात. अशा प्रकरणात खटला चालविण्याचा अधिकार असलेल्या दंडाधिकारी यांची पूर्वपरवानगी प्राप्त झाल्याशिवाय कोणताही पोलीस अधिकारी अदखलपात्र गुन्ह्याचा तपास करू शकत नाही. FIR हा अत्याचाराला सामोरे जाणाऱ्या व्यक्तीनेच नोंदवावा असे नाही, तर अत्याचाराला सामोरे गेलेल्या व्यक्तीच्या वतीने त्याचे नातेवाईक, पालक, मित्र मैत्रिणी देखील FIR साक्षीदार म्हणून नोंदवू शकतात.

तुम्हाला तक्रार कोणत्याही पोलीस स्थानकात नोंदवता येतो, ज्या हद्दीत गुन्हा घडला त्याच हद्दीतील पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवा अशी सक्ती पोलिस करू शकत नाहीत. तक्रार नोंदवून ती योग्य त्या पोलीस स्थानकात वर्ग करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. तुम्ही तक्रार दाखल करायला गेल्यावर लिखित स्वरूपात ही तुमची तक्रार दाखल करू शकता. अदखलपात्र गुन्ह्याची तक्रार मुंबई पोलिसांच्या वेबसाईटवरूनही करता येते.

मात्र दखलपात्र गुन्हा असो किंवा अदखलपात्र FIR किंवा एन सी ची प्रत तक्रारदाराला तातडीने देणे बंधनकारक आहे. पोलिसांना गुन्ह्याची माहिती लेखी किंवा तोंडी स्वरूपात देता येते, जेव्हा तक्रार तोंडी दिली जाते तेव्हा तिचे लिखित स्वरूपात रूपांतर करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. गुन्ह्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीचा जबाब तिच्याच शब्दात लिहणे आवश्यक आहे. तक्रार व जबाब लिहून झाल्यावर माहिती देणाऱ्या व्यक्तीस जी भाषा कळते त्या भाषेत समजावून सांगून त्यावर सही घेणे आवश्यक आहे.

(फौजदारी प्रक्रिया संहिता कलम१५४(१)) अत्याचारपीडित व्यक्ती स्त्री असेल व ती स्वतः गुन्हा नोंदवत असेल तर प्रथम खबर अहवाल महिला पोलीस अधिकारी किंवा कुठल्याही महिला अधिकारी यांच्याकडून नोंदवला जावा (फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५४). महिला पोलीस अधिकारी उपलब्ध नसल्यास पुरुष पोलीस अधिकारी यांनी  महिला हवालदार यांच्या उपस्थितीत तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. महिला तक्रारदारांना रात्रीच्या वेळी फोन वरून तक्रार नोंदवण्याचा अधिकार आहे.

अशावेळी महिला पोलीसांच्या उपस्थित तक्रार नोंदवून घेऊ शकतात. चौकशी व जबाब नोंदवताना अपमानास्पद वाटेल, लाज वाटेल अथवा त्यांच्या चारित्र्यावर संशय निर्माण होईल, त्यांच्या प्रतिष्ठेला बाधा निर्माण होईल असे प्रश्न पोलीस विचारू शकत नाहीत. एकदा पोलिसांना घडलेल्या बलात्काराच्या गुन्ह्याची माहिती दिल्यावर पीडित व्यक्तीला योग्य वाटेल अशा ठिकाणीच तिचा जबाब नोंदवणे पोलिसांची जबाबदारी आहे. सदर ठिकाण म्हणजे पीडित महिलेचे घर, हॉस्पिटल, किंवा इतर कुठलीही जागा असू शकते.

पोलिसांकडे खोटा गुन्हा दाखल करणे हा गुन्हा आहे. गुन्हा दाखल करताना पोलिसांना खोटी अवास्तव माहिती देणे, त्यांची दिशाभूल करणे हा भारतीय दंड संहितेनुसार अपराध ठरतो. खोटा FIR देणाऱ्या व्यक्तीला दोन वर्षांची शिक्षा किंवा दंड ठोठावला जाऊ शकतो. किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. भारतीय दंड विधानाच्या कलम १४२ नुसार ज्या पोलीस अधिकाऱ्याने खोटा FIR दाखल करून घेतला त्याच्यावर देखील कारवाई होते व अधिकारी शिक्षेस पात्र ठरतो.