घर, बंगला, फ्लॅट, रो-हाऊस विकत घेतांना समजून घ्या ह्या गोष्टी ।। कार्पेट, बिल्डअप एरिया, सुपर बिल्ड अप एरिया म्हणजे काय?

अर्थकारण शेती शैक्षणिक

स्वतःच्या हक्काचे घर विकत घेणे हा कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो. ती त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक असते. आणि घर ही संपूर्ण कुटुंबाची आणि येणाऱ्या पिढ्यांची स्थावर मालमत्ता असते. आणि म्हणूनच अशी स्थावर मालमत्ता विकत घेताना योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेद्वारे विकत घेणे आणि त्यातील कायदेशीर बाबींचा घोळ भविष्यात निर्माण होऊ नये.

यासाठी काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. आणि म्हणूनच आपण आज याद्वारे प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीवर व्यवाहारापासून ते त्या प्रॉपर्टी ची सेल्स डिड होण्यापर्यंत म्हणजे त्या प्रॉपर्टीचे तुमच्या नावे खरेदीखत होण्यापर्यंत जी काही कायदेशीर प्रोसेस आहे याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत.

त्या प्रमाणे ज्या वेळेस आपण एखाद्या रियल इस्टेट एजंट कडे किंवा बिल्डर कडे एखाद्या प्रॉपर्टीच्या खरेदीच्या व्यवहारा साठी जातो. त्यावेळी कार्पेट एरिया, बिल्टअप, सुपर बिल्टअप एरिया, अशा गोष्टींबद्दल चर्चा होती. तर रेरा म्हणजेच रिअल इस्टेट रेगुलेशन अँड डेव्हलमेंट ऍक्ट

यानुसार कार्पेट एरिया, बिल्डअप एरिया, सुपर बिल्ड अप एरिया, अप्रुव्हड प्लँन्स, कम्प्लिशन सर्टिफिकेट, पोझेशन लेटर रजिस्ट्रेशन ऑफ अग्रीमेंट, सेल्स डिड काय असतं याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत.

कार्पेट एरिया (चटई क्षेत्र): कार्पेट एरीआ म्हणजे प्रत्यक्षात वापरात येणारी जागा. याचा अर्थ असा की फ्लॅट मधील जेवढी जागा आपण प्रत्यक्षात राहण्यासाठी वापरु शकतो ती जागा. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे कार्पेट एरिया असे क्षेत्र ज्यावर चटई पसरवली जाऊ शकते. यात बाल्कनी किंवा टेरेस वगळलेले आहे मात्र अंतर्गत भिंतींची जाडी समाविष्ट आहे .

बिल्ट अप एरीआ (Built up Area): कार्पेट एरीआ अधिक(+) बाहेरील भिंतींची जाडी म्हणजे बिल्ट अप एरीआ. बिल्ट अप एरीआ हा साधारणपणे कार्पेट एरीआ पेक्षा 10% ते 15% जास्त असतो.

सुपर बिल्ट अप एरीआ (Super built up / Saleable area): बिल्ट अप एरीआ अधिक(+) लिफ्ट, जिना, क्लबहाऊस, सुरक्षा कक्ष, प्रवेशद्वार यांसाठी वापरण्यात आलेली संयुक्त जागा म्हणजे सुपर बिल्ट अप (SBU). साधारणपणे सुपर बिल्ड अप एरिया बिल्ट अप एरीआच्या 25 % ते 30 % जास्त असतो.

अप्रुव्हड प्लॅन्स (मान्यताप्राप्त आराखडा): स्थावर मालमत्तेचा आराखडा हा संबंधीत महापालिकेने/नगरपालिकेने मंजुर केलेला असतो. यामध्ये प्रकल्पाचा आराखडा आणि प्रत्येक फ्लॅटचा आराखडा समाविष्ट असतो. हा एक महत्त्वाचा दस्तऐवज (Document) असुन बांधकाम कायदेशीर रीत्या करण्यात यावे यासाठी बांधकाम सुरू करण्यापूर्वी महापालिकेकडून/नगरपालिके कडून मंजूर करून घ्यावा लागतो. घर खरेदीचा निर्णय घेण्यापुर्वी मान्यताप्राप्त आराखडा अवश्य तपासून पहावा.

कम्प्लिशन सर्टिफिकेट / ऑक्युपेशन सर्टिफिकेट (OC): Occupation certificate (OC) हा एक महत्त्वाचा दाखला असतो. हा दाखला महानगरपालिकेकडून बिल्डरला देण्यात येतो. ईमारतीमध्ये पाणी विजपुरवठ्याची सोय करण्यात आलेली आहे तसेच सुरुवातीस मंजुर केल्याप्रमाणे आणि मान्यताप्राप्त आराखड्याप्रमाणे ईमारतीचे बांधकाम केले असल्याचा हा दाखला असतो. या दाखल्याद्वारे महानगरपालिकेने सदर ईमारत राहण्यायोग्य असल्याचे जाहीर केलेले असते.

मॉर्गेज अग्रीमेंट (गहाणखत): गृहकर्ज पुरविणारी बँक आणि खरेदीदार यांमध्ये झालेल्या करारानुसार गृहकर्जाची पुर्ण परतफेड होईपर्यंत विकत घेतलेल्या घराचा ताबा बँकेकडे ठेवला जातो. या करारास गहाणखत किंवा मॉर्गेज अग्रीमेंट असे म्हणतात. मालमत्तेची सर्व कागदपत्रे कर्ज फिटेपर्यंत बँकेकडेच राहतात.

पोजिशन लेटर (मालकीपत्र): हे पत्रक बिल्डर कडून ग्राहकास देण्यात येते. यामध्ये असे लिहिलेले असते की मालमत्ता राहण्यासाठी पुर्णपणे तयार आहे आणि आता ग्राहकाकडे हस्तांतरीत करण्यात येत आहे. पोजिशन लेटर (मालकीपत्र) मिळविल्याशिवाय ग्राहकास सदनिकेत राहण्यासाठी जाता येत नाही.

रजिस्ट्रेशन ऑफ अग्रीमेंट (करार नोंदणी): बिल्डर आणि ग्राहकामध्ये जागेचा/घराचा जो करार झालेला असतो त्याची इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट खाली नोंदणी केली जाते. नोंदणी करण्यापुर्वी Stamp duty (मुद्रांकशुल्क) भरणे आवश्यक असते. स्थावर मालमत्ता विकत घेताना झालेला व्यवहार व करार यांची नोंदणी करणे अत्यावश्यक असते. सदर नोंदणी करण्यासाठी रजीस्ट्रेशन चार्जेस (Registration charges) द्यावे लागतात.

सेल्स डिड (खरेदीखत): जमिनीचा मूळ मालक/ बिल्डर यांनी ठराविक रकमेच्या मोबदल्यात मालमत्तेचा मालकी हक्क खरेदीदाराच्या नावे हस्तांतरीत करण्यासाठीचा जो करार केला जातो त्यास Sales deed असे म्हणतात. Sales deed ची नोंदणी करणे महत्त्वाचे असते. अशाप्रकारे आपण घर,बंगला,फ्लॅट,रो-हाऊस विकत घेतांना ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.

2 thoughts on “घर, बंगला, फ्लॅट, रो-हाऊस विकत घेतांना समजून घ्या ह्या गोष्टी ।। कार्पेट, बिल्डअप एरिया, सुपर बिल्ड अप एरिया म्हणजे काय?

Comments are closed.