ग्रामपंचायतीच्या कामावर लक्ष कसं ठेवायचं? सरपंच गावाचा विकास कशाप्रकारे करत आहे हे आपल्याला कसं कळेल? किंवा ते कसं पाहायचं? त्याविषयी माहिती कशी मिळवायची? तसेच आपण आपल्या गावाच्या विकासात कशाप्रकारे हातभार लावू शकतो? याविषयी महत्वाची माहिती जाणून घ्या !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतींची निवडणूक आता संपली. बहुतांश ठिकाणी सरपंच यांची निवडही झाली पण सरपंचाची निवड झाली असली तरीही आपण निवडून दिलेली माणसं आपल्या गावाचा विकास कशाप्रकारे करत आहे? हे आपल्याला कसं कळेल?

किंवा ते कसं पाहायचं? त्याविषयी माहिती कशी मिळवायची? तसंच आपण आपल्या गावाच्या विकासात कशाप्रकारे हातभार लावू शकतो? असे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर आज आपण अशाच प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत.

ग्रामपंचायतीचे काम नेमके कसे चालते?: ग्रामपंचायत अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकूण चार प्रकार पडतात. या चार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे सर्व कामकाज चालू असते.

1)पगारी कर्मचारी:- जिल्हा निवड समिती या कर्मचाऱ्यांची निवड करते व राज्य सरकार अशा कर्मचाऱ्यांना पगार देते. यामध्ये ग्रामसेवक जी ग्रामविकासाची कामे करत असतात व तलाठी जे महसुलाची संबंधित कामे करतात. त्यांचा समावेश होतो.

2)मानधन कर्मचारी :- या कर्मचाऱ्यांना गावाच्या विशिष्ट योजना राबविल्या जातात त्यासाठी मानधन मिळत असते. यामध्ये अंगणवाडी सेविका, त्यांच्या मदतनीस, पोलीस पाटील, कोतवाल यांचा समावेश असतो. आता हे जे कर्मचारी आहेत त्यांना त्यांचे त्यांचे विभाग हे मानधन देते. जसे पोलीस पाटील आहे त्यांना गृह विभाग तर कोतवाल यांना महसूल विभाग मानधन देते.

3)स्वयंप्रेरित कर्मचारी:- स्वयंप्रेरित कर्मचाऱ्यांना मानधन किंवा पगार नसतो. गावातल्या एखाद्या कामासाठी स्वतः पुढाकार घेऊन हे काम करत असतात. जेवढे काम करतात तेवढा मोबदला मात्र त्यांना दिला जातो. यात आशा वर्कर, रोजगार सेवक अशा कर्मचाऱ्यांचा समावेश होतो.

4)ग्रामपंचायत कर्मचारी: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये शिपाई, दिवाबत्ती, पाणीपुरवठा कर्मचारी, लिपीक, सफाई कर्मचारी यांचा समावेश होतो. आता, गावाच्या लोकसंख्येनुसार किती कर्मचारी आपण नेमायचे याचा निर्णय गावाने घ्यायचा असतो. तसेच त्यांना किती मानधन द्यायचे, व कोणते काम कोणाला द्यायचे ,याचा निर्णय सुद्धा गावाने घ्यायचा असतो.

आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही पगारी कर्मचारी आहेत त्यांनी आपल्या मुख्यालयही म्हणजेच ज्या ठिकाणी ज्या गावात ते काम करतात त्या त्या ठिकाणी थांबणे महत्त्वाचे असते. त्यासाठी त्यांना प्रति महिना ११७५ रु. घर भाडे व १००० रू. प्रवास खर्च दिला जातो.

पण अनेकदा अशी तक्रार येते की ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक उपस्थित नसतो. कारण अशा वेळी सामान्य माणूस काय करू शकतो? तर यासाठी गावात कोणते कर्मचारी राहतात व कोणते कर्मचारी गावात राहत नाही त्याच्या वर्षातून एकदा ठराव घ्यावा लागतो हा ठराव घेताना तो ग्रामसभेच्या माध्यमातून घ्यावा लागतो.

अशा ग्रामसभेला तुम्ही उपस्थित राहू शकता व त्यात तुम्ही कोणते कर्मचारी गावात राहतात व कोणते कर्मचारी गावात राहत नाही ही माहिती देऊ शकता. जर कर्मचारी गावात राहत नसेल तर त्याला घर भाडेही दिले जात नाही. प्रत्येक कार्यालयात प्रमाणे ग्रामपंचायतीची सुद्धा एक हालचाल रजिस्टर असते.

या रजिस्टर मध्ये ग्रामसेवक किती वाजता ग्रामपंचायत मध्ये आले व त्यांनी सही करणं अपेक्षित असतं. जर ते कोणत्या पर्सनल किंवा शासकीय कामासाठी बाहेर जात असेल तर ते सुद्धा त्यांना हालचाल रजिस्टर मध्ये नमूद करावा लागतो. म्हणजे जर तुम्ही ग्रामपंचायत मध्ये गेले आणि जर तिथे ग्रामसेवक उपस्थित नसेल तर तुम्ही हालचाल रजिस्टर पाहून तुम्हाला माहिती करून घेऊ शकता की ग्रामसेवक कुठे गेले.

ग्रामपंचायत सदस्यांना मानधन किती असतो?: ग्रामपंचायतचे सगळे सदस्य म्हणजेच सरपंच असेल, उपसरपंच असेल किंवा इतर सदस्य असेल यांना बैठकीसाठी प्रत्येक बैठकीला दोनशे रुपये भत्ता दिला जातो. यासाठी तो पैसा सरकार ग्रामपंचायतीला देत असतो.

आणि बैठक संपल्या संपल्या तो सदस्यांच्या खात्यात जमा करणे ग्रामपंचायतीला बंधन कारक असते. तसेच सरपंच व उपसरपंच यांना गावाच्या लोकसंख्येनुसार मानधन मिळत असत. २००० पर्यंत जर गावची लोकसंख्या असेल तर सरपंचाला तीन हजार रुपये तर उपसरपंच यांना एक हजार रुपये मानधन मिळतो.

२००० ते८००० पर्यंत जर गावची लोकसंख्या असेल तर सरपंचाला चार हजार रुपये व उपसरपंचाला पंधराशे रुपये मानधन मिळतो. जर गावची लोकसंख्या ८००० पेक्षा जास्त असेल तर सरपंचाला पाच हजार रुपये व उपसरपंच याला दोन हजार रुपये एवढे दरमहा मानधन दिले जाते. सरपंच व उपसरपंच याच्या पगारातील 75 टक्के रक्कम ही राज्य सरकार देते व 25 टक्के रक्कम ही ग्रामपंचायतला द्यावी लागते.

विकास कामात कसं सहभागी व्हायचं?: आता ग्रामपंचायतीचे काम कसं चालतं ते आपण बघितलं पण एक ग्रामस्थ म्हणून आपण गावाच्या विकासात कसं सहभागी व्हायचं ते बघूया. १)गावात वर्षभरात किमान चार ग्रामसभा घेतल्या जातात ग्रामसभेला नियमीतपणे उपस्थित राहून तुम्ही गावाच्या विकासासंदर्भात तुमच्या संकल्पना मांडू शकता.

2)गावात वेगवेगळ्या ग्रामविकास समित्या असतात.जसं की रेशन दक्षता समिती, शाळा व्यवस्थापन समिती, ग्राम आरोग्य समिती, ग्राम पाणीपुरवठा, स्वच्छता,पोषण आहार समिती तुम्ही या समित्यांमध्ये भागीदारी करू शकता आणि गावाच्या विकास कामात लक्ष घालू शकता.

३)तुम्ही नियमितपणे घरपट्टी ,पाणीपट्टी भरून गावाच्या विकासात हातभार लावू शकता.अर्थातच सर्व कर भरल्याने तुमचा गावाच्या विकास कामात खूप मोठा हातभार लागतो.

विकास कामावर लक्ष कसा ठेवायचा?: पण ,मग तुम्ही म्हणाल कि कर भरला म्हणजे आपली जबाबदारी संपली पण असा अजिबात नाही. पण एक सुज्ञ नागरिक म्हणून तुम्ही गावाच्या विकास कामावर लक्ष ठेवू शकता. त्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.

एक म्हणजे तुम्ही ग्रामसभेच्या दोन दिवस आधी आपला लेखी स्वरूपातील प्रश्न ग्रामपंचायतीला देऊन, त्याची पोचपावती घेऊ शकता. ग्रामसभेत लेखी स्वरूपात प्रश्न विचारले तर तो प्रश्न आणि त्याचे उत्तर ग्रामसभेच्या नोंदवहीत नोंदवलं जाते. तोंडी स्वरूपात विचारलेला प्रश्न नोंदवहीमध्ये घेतला जात नाही.

दुसरा म्हणजे, जर तुम्हाला गावातल्या कुठल्याही कामाविषयी शंका असेल किंवा प्रश्न असेल तर तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली म्हणजेच आरटीआय चा वापर करून त्यासंबंधीची माहिती मागू शकता. तिसरा म्हणजे जर तुम्ही नियमितपणे कर भरत असाल, तर तुम्ही ग्रामपंचायतीला जमा-खर्चाच पत्र मागू शकता.

म्हणजे काय तर वर्षभरात ग्रामपंचायतीकडे किती पैसा आला? तो कुठून आला ?आणि ग्रामपंचायतीने तो कशावर खर्च केला? याबाबत जमाखर्चाच पत्र ग्रामपंचायतीनं नियमित कर भरणाऱ्या कुटुंबाला देणं बंधनकारक असतं. चौथा म्हणजे तुमच्या गावाचं रिपोर्ट कार्ड तुम्ही केंद्र सरकारच्या ‘ई -ग्राम स्वराज्य’ या अप्लिकेशन द्वारे पाहू शकता.

यात सरकारने वेगवेगळ्या योजना साठी तुमच्या गावाला किती निधी दिला आहे आणि ग्रामपंचायतीने तो कुठे व कसा खर्च केला ,याची सविस्तर माहिती त्यात दिलेली असते. तर मग मंडळी, ग्रामपंचायतीचे काम आणि नागरिकांचे कर्तव्य या संबंधीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली, कारण की तुमच्या आमच्या सारख्या प्रत्येक नागरिकाला ही माहिती असणे आवश्यक आहे. या माहीतीचा उपयोग तुम्ही तुमच्या गावाच्या विकासासाठी नक्की करा.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

3 thoughts on “ग्रामपंचायतीच्या कामावर लक्ष कसं ठेवायचं? सरपंच गावाचा विकास कशाप्रकारे करत आहे हे आपल्याला कसं कळेल? किंवा ते कसं पाहायचं? त्याविषयी माहिती कशी मिळवायची? तसेच आपण आपल्या गावाच्या विकासात कशाप्रकारे हातभार लावू शकतो? याविषयी महत्वाची माहिती जाणून घ्या !

  1. E gram swaraj madhe kam kuthe zale yachi mahitich nahi, nuste billing ahe, te pan Kam zale nahi tyache pan

Comments are closed.