मिळवले सोळा लाख पर्यंत उत्पन्न || जांभुळ शेती – एक यशस्वी प्रयोग ।। लागवड, संगोपन आणि अर्थकारण याचा संपूर्ण आढावा !!

लोकप्रिय शेती

मोसंबी, चिकू, लिंबू, पेरू, डाळिंब, केळी अश्या अनेक फळांसाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे, तसेच केळी हे पीक इथे सर्वाधिक घेतल्या जाते परंतु खराब हवामानामुळे केळीच्या पिकाचे नुकसान होऊ लागले त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी इतर पिके घेण्यास सुरू केले, असेच एक पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली या गावातील शेतकरी रघुनाथ पाटील

यांनी पहिल्याच वर्षी जांभूळ या दुर्मिळ होत चाललेल्या फळाच्या बागेतून एकरी अडीच लाख पर्यंत उत्पन्न मिळवले. जांभूळ हे फळ अनेक आजारांवर औषध म्हणून वापरले जाते ,अनेक गुणधर्म असल्या मुळे या फळाला मागणी देखील चांगली आहे,तसेच हे फळ पावसाळ्याच्या सुरुवातीला येत असल्याने जांभुळा च्या शेतीची कामे ही उन्हाळ्यात च असतात,

जेव्हा इतर शेतीची कामे कमी असतात त्यामुळे कामाला मजूर मिळायला देखील त्रास होत नाही, जुन मध्ये हे पीक तयार होते तेव्हा जास्त मजुरांची गरज भासत नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन रघुनाथ पाटील यांनी जांभूळाच पीक घ्यायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठ कोकण कृषी विद्यापीठाकडून माहीती घेतली,

जांभळाच वाण आणि जाती या बद्दल माहीती घेतल्यानंतर सुरुवातीला 7 एकर आणि नंतर 8 एकर अशा एकूण 15 एकर जमिनीवर जांभळाच्या बारडोली जातीची लागवड 15 बाय 15 या अंतरावर केली. मात्र जांभुळाच्या झाडाची थोडी वाढ झाल्यावर त्याचा शेंडा तोडण्यात येतो त्यामुळे झाड रुंद होते,

तसेच जांभूळ हे तिसऱ्या फांदीपासून लागत असल्यामुळे झाडाला उपफांद्या येण हे गरजेचं असत, या कारणास्तव झाडांची लागवड कमीतकमी 20 बाय 20 या अंतरावर करण गरजेचं आहे, कोकण कृषी विद्यापीठाकडून प्रशिक्षण घेतल्या मुळे तेथील शास्त्रज्ञ आणि कुलगुरू यांनी पाटील यांना लागवडीसंदर्भात मार्गदर्शन केले.

तसेचं कलमा देखील त्यांच्याकडून मिळाल्याचं पाटील सांगतात. जांभुळाच्या झाडांची वाढ होऊन फळधारणा होईपर्यंत त्यांनी कांदा, सोयाबीन, उडीद, मूग तसेच भाजीपाला अशी काही आंतरपिके घेतली, तसेच त्यांनी सर्व पिकांसाठी सेंद्रिय खताचा वापर केला,जांभुळाच्या प्रत्येक झाडास 50- 60 किलो शेणखत वापरले,

तसेच या पिकाला एप्रिल मे जून या महिन्यामध्ये पाणी लागत असल्याने रघुनाथ पाटील यांनी शेततळे तयार केले व विहिरीच्या आणि शेततळ्याच्या पाण्याचा वापर केला, झाडांना पाणी देण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला. फळधारणा होण्याची लक्षणे दिसल्यानंतर मधुमाश्यांना आकर्षित करण्यासाठी झाडांवर गुळाच्या पाण्याची फवारणी केली,

तसेच झेंडूचे आंतरपिक घेतले, परिणामी त्यांना एकरी 8 टन जांभुळाचे उत्पन मिळाले. जांभळाचे पीक नाशवंत असल्यामुळे फळ काढल्यानंतर लगेच बाजारात नेऊन विकाव लागतं म्हणून पाटील यांनी आकर्षक पॅकिंग करून त्याची विक्री केली, त्यासाठी त्यांनी निर्मल्स जामुन नावाच्या ब्रँड ची निर्मिती केली.

दर्जेदार आणि टवटवीत जांभळाची विक्री त्यांनी मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरात केली, कोणत्याही रासायनिक खतांचा वापर केला नसल्यामुळे मागणी देखील भरपूर होती, त्यामुळेच त्यांना 200 रुपये प्रतिकिलो चा भाव देखील मिळाला. प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे 10 पॅकेट्स चा एक बॉक्स त्यांनी तयार केले

आणि विक्रीसाठी पाठवले तसेच पाचोरा भडगाव रस्तावर स्टॉल लावून जांभूळाची विक्री केली. जांभळाच्या फळाला मिळणारा भाव आणि त्याचे पीक घेण्यासाठी लागणारा खर्च ,मेहनत इत्यादी चे गणित केले असता जांभळाच्या शेतातून मिळणार उत्पन्न हे परवडणारं आहे असं पाटील सांगतात,

तसेच फळ खराब होऊ नये म्हणून पुढील प्रोसेससिंग चा देखील ते विचार करत आहेत, त्यांच्या शेतातील जांभूळाला परदेशी विक्री साठी पाठवण्यासाठी ते प्रयन्त करत आहेत. कोकण कृषी विद्यापीठातील काही शास्त्रज्ञ पाटील यांच्या शेतात अभ्यास करत आहेत, या अभ्यासाचा इतर अनेक शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. ज्या शेतकऱ्यानांकडे सुरक्षित पाण्याची सोय आहे अश्या शेतकऱ्यांनी जांभळाचे पीक घेतल्यास त्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते.