कलामहर्षी केकी मूस – टेबलटाॅप फोटोग्राफीचा सम्राट

मनोरंजन लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

जर तुम्ही सधन कुटुंबात जन्मला असाल, पैसे कसे कमवायचे ही भ्रांत नसेल, आई-वडिलांचं एकुलतं एक/लाडकं अपत्य असाल, बंगल्यात रहात असाल, तर तुम्ही साहजिकच असा विचार कराल, की मस्तपैकी ऐशोआराम करावा, खावं-प्यावं आणि मजेत जगावं. साहजिकच आहे म्हणा, तुमच्या जागी दुसरा कुणी असता, तरी त्याने असाचं विचार केला असता, पण एक अवलिया होता, ज्याला असं आयुष्य जगायचं नव्हतं. केकी मूस. एक मनस्वी कलाकार, ज्याने कलेच्या क्षेत्रात अनेक नवे मार्ग चोखाळले आणि कलाप्रांतात स्वतःचा अमीट ठसा उमटवला.

कैखुश्रु माणेकजी उर्फ केकी मूस ह्यांचा जन्म एका श्रीमंत आणि श्रद्धाळू पारसी कुटुंबात झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून कला विषयात पदवी घेतली आणि पुढे १९३८ मध्ये युनायटेड किंग्डमच्या बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्डमध्ये व्यावसायिक आणि ललित कला पदविकाधारक बनले. नंतर त्यांनी इजिप्त, ग्रीस, रशिया, जपान आणि चीन अशा देशांना भेट देऊन विविध कला आणि संस्कृतीचा अभ्यास केला.

त्यांचे आई-वडील आधीच चाळीसगांव येथे ब्रिटीश वसाहतींमधील बंगल्यात रहात, आणि सोडा बाॅटल फॅक्टरी आणि वाईन शॉप चालवत असतं. त्यांच्या आई-वडिलांची अशी इच्छा होती की आपल्या मुलाने आपला व्यवसाय संभाळावा, परंतु केकी मूसच्या मनांत मात्र वेगळाच विचार होता. ते चाळीसगांव येथे आले खरे, पण त्यांचं मन व्यवसायात रमेना.

आईला विश्वासात घेऊन त्यांनी पुन्हां मुंबईला प्रस्थान केले, परंतू काही दिवसांतच वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना चाळीसगांवला परत यावं लागलं. त्यांच्या आईचे निधन झाल्यावर मात्र त्यांनी चाळीसगांव इथे कायमचं रहाण्याचा निर्णय घेतला आणि शेवटपर्यंत ते तिथेच राहिले. खरं सांगायचं तर चाळीसगांव मधील त्यांचं राहतं घर सोडून ते कधीच कुठे गेले नाहीत असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

असं म्हणतात की ते त्यांच्या प्रेयसीची वाट पहात होते. तिच्या प्रतीक्षेत त्यांनी कित्येक रात्री जागून काढल्या. रात्री एक वाजता मुंबईहून पंजाब मेल चाळीसगावला पोहोचत असे. त्या वेळी ते बंगल्याच्या फाटकापाशी येऊन थांबायचे. ती त्या मेलने येणार होती असं म्हणतात. कोण होती त्यांची प्रेयसी? ती येणार होती हे खरं आहे कां? तोपर्यंत ते निदान मुंबईला तरी जात असत; आतां तर चाळीसगांव मधील त्यांच्या घरातून बाहेर पडेनासे झाले.

केवळ दोन वेळा ते आपल्या घरातून बाहेर पडले. पहिल्या वेळी त्यांच्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी, आणि दुसऱ्या वेळी थोर गांधीवादी व भूदान चळवळीचे प्रवर्तक आचार्य विनोबा भावे यांचा फोटोग्राफ घेण्यासाठी चाळीसगांव स्टेशनला गेले होते तेव्हां. सलग ५० वर्ष घरात राहून केकी मूस यांनी कलासाधना केली.

अशा प्रदीर्घ एकांतवासात त्यांनी रेखाटन, चित्रे, छायाचित्रण, शिल्पकला, लाकडातील कोरीव काम, ओरिगामी इत्यादीमध्ये हजारो कलाकृती तयार करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. त्याशिवाय त्यांनी उस्ताद दिन मुहम्मद खान यांच्याकडून सतार शिकली, आणि पंडित फिरोज फ्रामजी यांच्याकडून भारतीय शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. त्यांनी कला, तत्त्वज्ञान, अध्यात्म, कादंबऱ्या, नाटक आणि इतर साहित्यासह तीन हजारांहून अधिक पुस्तकांचा संग्रह केला होता.

‘टेबल टॉप’ ह्या फोटोग्राफीच्या प्रकारात त्यांनी भरीव कार्य केलं आहे आणि त्यांना टेबलटॉप फोटोग्राफीचा सम्राट म्हणून ओळखले जाते. केकी मूस जगप्रसिद्ध चित्रकार रेंम्ब्रांटच्या कलेचे निस्सीम चाहते होते. चाळीसगांव मधील त्यांच्या बंगल्याचे ‘आशीर्वाद’ हे नांव बदलून त्यांनी ‘रेंम्ब्रांट रिट्रीट’ असं ठेवलं. स्वतः एका खोलीत राहून त्यांनी इतर तीन खोल्यांचे रुपांतर आर्ट गॅलरीमध्ये केलं.

जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, बाल गंधर्व, कुमार गंधर्व, न्यायमूर्ती दादा धर्माधिकारी, बाबासाहेब आमटे, पं. महादेवशास्त्री जोशी, अशा अनेक नामवंत व्यक्तींनी ह्या आर्ट गॅलरीला भेट दिली. या कला दिग्गजाने आपले आध्यात्मिक गुरू स्वामी चंद्रकिरण सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्ट तयार करून आपली संपूर्ण मालमत्ता आणि मौल्यवान निर्मिती आणि संग्रह समाजासाठी समर्पित केला आणि ३१ डिसेंबर १९८९ रोजी इहलोक सोडून गेले.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.