कर्जाचे 2000 रुपये बनवले भांडवल, आज एक महिला उद्योजक स्वतःच्या व्यवसायातून कमावतीय 12 लाख !!
स्वाती ठोनगे या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एका खेडेगावात राहतात, लहानपण अगदी सुखात गेलं, एकत्रित कुटुंब पध्दतीत राहत असल्यामुळे कधीच कोणत्या दुःखाची जाणीव झाली नाही, त्यांच्या कुटुंबामध्ये एकूण 52 लोक राहत असत. तसेच त्यांना 7 चूलते होते, स्वाती या त्या घरातील एकुलती एक मुलगी असल्यामुळे त्यांचा खूप लाड व्हायचा त्यांना दुःख म्हणजे काय हे माहीतच नव्हतं.
त्यांच्या वडिलांनी त्यांना कधीच कशाची कमी पडू दिली नाही, जे मागेल ते त्यांना न मागता मिळत असे. त्यांनी 5 पाचवी ते दहावी च शिक्षण बार्शी ला घेतलं पण पुढील शिक्षणासाठी मुलीला बाहेर पाठवायचं नाही असं घरच्यांचं मत होतं त्यामुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आला नाही, पण स्वाती यांच आधीपासून स्वतःचा व्यवसाय करण्याचं स्वप्न होतं,
स्वाती यांचं 2006 साली लग्न झालं, त्यांचे पती देखील त्यांच्याप्रमाणेच जिद्दी आणि मेहनती होते. परंतु त्यांना हे सुख फार काळ मिळालं नाही आणि 2010 साली त्यांच्या पतीचं आकस्मित निधन झालं, तेव्हा त्यांची मुलगी ही फक्त साडेतीन महिन्याची होती आणि मुलगा फक्त पावणेदोन वर्षाचा होता.
पतीच्या निधनानंतर त्यांच्या सासरच्यांनी ही त्यांची साथ सोडून दिली, त्यांच्या वडिलांनी त्यांना मुलांसह घरी परत येण्याचा सल्ला दिला पण त्यांनी त्याला स्पष्ट नकार देत या संकटाचा सामना एकटीने आणि धीराने करायचं ठरवल. स्वतःच्या मुलांच्या भविष्याचा, त्यांचा शिक्षणाचा त्यांना विचार करायचा होता
त्यासाठी त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप महत्त्वाचं होत, परंतु पतीच्या अश्या आकस्मित निधनाने त्या खूप खचल्या होत्या, पुढे काय करावं हे त्यानं सुचत नव्हतं, अशातच त्यांच्या मावसबहिणीने त्यांना बचत गटात जाण्याचा सल्ला दिला, तू हुशार आहेस, जिद्दी आहेस, बचत गटात तुला काहीतरी करण्याची संधी मिळेल असा त्यांनी सांगितलं.
परंतु सासरच्यांनी त्यांना बचत गटात जाण्यास स्पष्ट नकार दिला, तूला बचत गटात जायचं असेल तर आमच्या पासून अलिप्त राहा आपल्यात बचत गटात जात नाहीत अस त्यांनी सांगितलं, एकीकडे मुलांच भविष्य आणि दुसरिकडे सासर चे लोक अश्या धर्मसंकटात त्या अडकल्या, मात्र त्याच्यातल्या आई ने हिम्मत सोडली नाही,
आणि त्या कुटुंबापासून वेगळ्या झाल्या. त्यांनी ठरवलं की कधीच कुणाच्या पूढे हात पसरायचे नाही, कारण जेव्हा त्यांच्या मुलाने त्याच्या काकांकडे 5 रुपये मागितले त्यासाठी त्यांनी त्या मुलांना बरेचदा आठवण करून दिली. आणि म्हणूनच स्वाती यांनी ठरवलं की आता जे करायचं ते स्वतः च्या बळावर, आपल्या मुलांनी कधीही कुणाची मदत मागता कामा नये,
आणि या ठरावानिशी त्यांनी बचत गटात प्रवेश केला. एका मिटिंग मध्ये त्यांची भेट एस एस पी च्या रेश्मा राऊत यांच्याशी झाली, त्यांनी स्वाती यांच्यातील कौशल्य पाहिलं आणि त्यांना मार्केटिंग च्या कामासाठी स्वतःच्या ऑफिस मध्ये बोलावून घेतलं, स्वाती यांना मात्र यामध्ये समाधान मिळत नव्हत कारण त्यांना स्वतःचा व्यवसाय चालू करायचा होता.
अशातच एकदा सोलापूर इथे कृषी प्रदर्शनी असल्याचं त्यांना कळलं, त्यांना त्यामध्ये स्वतःचा स्टॉल लावयाचा होता, पण त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते, त्यांनी ही अडचण रेश्मा राऊत यांना सांगितली, रेश्मा राऊत यांनी त्यांना स्टॉल लावण्यासाठी 2000 रुपये उधार दिले व स्वाती यांनी त्या ठिकाणी चहाचा स्टॉल लावला,
आणि छोट्याश्या स्टॉल मधून त्यांनी पाच दिवसात 7000 रुपये चा व्यवसाय करून दाखवला. त्यांच्या पहिल्या व्यवसायात त्यांना 5000 रुपये चा नफा झाला होता. नंतर बचत गटाच्या मुंबई येथील कामासाठी स्वाती यांची मार्गदर्शक म्हणून निवड झाली, बार्शी तालुक्यातून येणाऱ्या 6 गटाच्या मार्गदर्शक म्हणून त्या मुंबईला आल्या,
तसेच ज्या महिला मुंबई ला येऊन त्यांचा माल विकू शकत नाही अशा महिलांचा माल त्या स्वतः मुंबई ला घेऊन गेल्या, त्या महिलांनी देखील अगदी विश्वासाने त्यांचा सर्व माल स्वाती यांच्यांकडे सोपवला आणि सुदैवाने त्यांनी घेतलेला 60000 रुपये किमतीचा माल त्यांनी 1,20,000 रुपये ला विकला, ही त्यांच्या व्यवसायाची दुसरी पायरी होती.
तरीही स्वाती यांना काही समाधान वाटेना कारण त्यांना स्वतः व्यवसाय सुरू करायचा होता. त्यांच्याकडे आता पैसे येऊ लागले होते, लोकांची आवड आणि बाजारातील मागणी यांचा विचार करून त्यांनी उडीद पापड आणि शाबुच्या पापडांचा व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले, बचत गटातील दोन महिलांना सोबत घेऊन त्यांनी हा व्यवसाय सुरु केला,
बाहेर जिथे महिलांना या कामाचे 150 रुपये मिळत होते तिथे स्वाती यांनी त्यांना 200 रुपये देऊ केले. स्वाती यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन महिलांनी पापड बनवायला सुरुवात केली. हे काम चालू असतानाच केरळ ला खाद्यपदार्थांचे स्टॉल लागणार होते यामध्ये 10 राज्यांमधून महाराष्ट्राचं देखील नाव होतं,
बार्शी तालुक्यातून फक्त पाच महिला या स्टॉल साठी केरळ ला जाणार होत्या, स्वाती यांना इथे देखील मार्गदर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली, महाराष्ट्रातील सर्वांचे आवडते आणि प्रसिद्ध अश्या पुरणपोळीचा स्टॉल लावायचं त्यांनी ठरवलं, मात्र केरळ मध्ये त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
आणि सुरुवातीचे दोन दिवस त्यांचा काहीही नफा झाला नाही, आपण निवडलेला पदार्थ चुकीचा असल्याचं त्यांना लक्षात आलं, त्यांनी केलेल्या निरीक्षणातून त्यांना अस लक्षात आलं की तिथे मासांहारी पदार्थांना जास्त मागणी आह, मग कोल्हापूरच्या प्रसिद्ध चिकन आणि अंडाकरी बनवण्याचं त्यांनी ठरवलं,
सुरुवातीला काहीही नफा न मिळालेल्या स्वाती यांनी पुढील आठ दिवसात एक लाख साठ हजार रुपयांचा व्यवसाय करून दाखवला. केरळ वरून परत येत असताना स्वाती आणि त्यांच्या मैत्रिणीने स्वतः काहीतरी करण्याचं ठरवलं, बचत गटातील महिलांनी बनवले पदार्थ विकण्याचा त्यांनी ठरवलं
आणि स्वदेशी मार्केटिंग नावाची कंपनी त्यांनी सुरू केली, या मध्ये फक्त बचत गटातील महिलांचा माल विकत घेऊन त्याच पॅकिंग आणि लेबलिंग त्यांनी केलं, सध्या 27 महिलांचा माल त्या विकत असून या महिलांना कमीत कमी 25-30 हजार रुपये महिन्याला त्या देत आहेत, याचा त्यांना आज अभिमान वाटतो.
स्वतः जवळ एक रुपया देखील नसताना उधारीचे 2000 रुपये घेऊन त्या आज एक यशस्वी व्यावसायिक बनल्या आहेत, दुसऱ्याकडे 5 रुपयासाठी भीक मागावी लागत असणाऱ्या स्वाती आज महिन्याला 50000 रुपये कमावतात. महिलांनी जर ठरवलं तर त्या काहीही करू शकतात त्यामुळे परिस्थितीला घाबरून जाऊ नका, अपयश हीच यशाची पहिली पहिली पायरी आहे,
अपयशाला सामोरे जा आणि हिंमतीने लढा द्या, स्वतः चा व्यवसाय करा, स्वतः मालक बना आणि बेरोजगारांना रोजगार मिळवून द्या अस स्वाती सांगतात. त्याच्या जिद्दी ने त्यांनी शून्यातून सुरुवात करुन आज लाखो रूपये कमावले तसेच इतर अनेक महिलांना रोजगार देखील मिळवून दिला आहे.