मेड इन इंडिया असणाऱ्या Quick heal (क्विक हिल) या अँटीव्हायरसचे निर्माते आपल्या महाराष्ट्रातील मराठी व्यक्तिमत्व-कैलास काटकर यांचा जीवनप्रवास !!

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

कधी काळी कॅलकुलेटर दुरुस्त करणारा एक दहावी पास मुलगा आज जगातील अनेक मोबाईल आणि कॉम्पुटर ला (विषाणू) व्हायरस पासून वाचवत आहे, त्या मुलाच नाव आहे कैलास काटकर. पुण्याच्या असणाऱ्या कैलास काटकर यांची गोष्ट हेच सांगते की आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर भविष्यातील संभावना ओळखून पावलं उचलली पाहिजेत. ठरलेल्या दिशेने जर आपण चालत राहिलो तर एक दिवस नक्की यशाचं शिखर गाठू शकतो.

कैलास काटकर यांच मूळ गाव सातारा जिल्ह्यातलं रहिमतपूर. पुण्यातील नरवीर तानाजीवाडी येथे ते राहत असत. वडील फिलिप्स कंपनीत हेल्पर होते, आई घरकाम करत असे, एक लहान भाऊ आणि बहीण अस हे पाच जणांच कुटुंब होत. कैलास घरातील थोरले असल्यामुळे सर्वांना त्यांच्या कडून अपेक्षा होत्या, वडिलांनी पुण्यातील मराठी माध्यम शाळेत त्यांना घातलं होत, पुस्तक घ्यायला पैसे नाही, फी भरायला पैसे नाही अशा परिस्थितीत कस बस रडत पडत १० वी पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं.

आणि नंतर पुस्तकी शिक्षणाला राम राम ठोकला व खऱ्या व्यवहारिक शिक्षणाला सुरुवात केली. तस कैलास यांना लहानपणापासूनच घरातील बिघडलेल्या वस्तू सोबत खटाटोप करायची सवय होती, वडिलांचं पाहून ते हे सगळं करत असत, सहावीला असतानाच त्यांनी रेडिओ दुरुस्त केला होता, त्या संबंधीचा एक महिन्याच्या कोर्स देखील त्यांनी केला होता. दहावीच्या निकालाची वाट न बघता कैलास यांनी नोकरी शोधण्यास सुरुवात केली एक दिवस वर्तमानपत्रात त्यांनी एक कंपनीत कॅलकुलेटर दुरुस्त करणाऱ्या व्यक्ती ची गरज असल्याची जाहिरात पहिली.

कैलास यांनी कधी कॅलकुलेटर पहिला देखील नव्हता तरी त्यांनी अर्ज केला आणि योगायोगाने २५ जणांमधून त्यांची निवड झाली. कैलास कॅलकुलेटर दुरुस्त करायला तर शिकले त्याचबरोबर बँकेतील फॅक्स मशीन, प्रिंटर यासारखे उपकरणे देखील दुरुस्त करायला शिकले. पण धडपडया असलेल्या कैलास यांच काही तिथे मन स्थिर राहील नाही, आणि त्यांनी नोकरी सोडली व मंगळवार पेठेत स्वतःच दुकान चालू केल, सोबत एक काम करणारा मुलगा पण ठेवला त्या दोघांची दिवसभर मशीन सोबत खटाटोप चालायची.

एकदा त्यांना एका बँकेत एक वेगळच मशीन दिसलं त्यांनी चौकशी केली तर त्यांना कळलं की ते कॉम्प्युटर आहे, त्या व्यक्तीने त्यांना सांगितले की पुढे कॉम्प्युटरचच युग येणार आहे. कैलास विचारात पडले, पुढील जग जर कॉम्प्युटरच आहे तर आपल्याला ते शिकायला पाहिजे, पण शिकायचं कुठे, कॉम्प्युटर प्रचंड महाग होतं, कुणी त्यांना कॉम्प्युटर जवळ देखील येऊ देत नव्हत, एकदा फर्ग्युसन कॉलेज रोड वरील टाईम्स ऑफ इंडियाच ऑफिसमधील दोन प्रिंटर बंद पडलेले, ते फेकून देण्याचा तयारीत होते, योगायोगाने कैलास तिथे पोहचले, त्यांनी पैजेवर ते प्रिंटर दीड तासात दुरुस्त करून दाखवले.

टाइम्स ऑफ इंडिया च्या ऑफिस ने त्यांना प्रिंटर च नव्हे तर कॉम्प्युटर देखील दुरुस्ती करण्याचा दोन वर्षांचा करार केला. त्यांचं बघून बाकीच्या कंपन्या पण त्यांना काम देऊ लागल्या, हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर दुरुस्ती मध्ये कैलास काटकर हे नाव प्रसिद्ध झाल. स्वतःच शिक्षण अपूर्ण राहील असल तरी त्यांच्या भावा-बहिणीच्या शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी हलगर्जीपणा केला नाही. त्याकाळी नव्याने व्हायरस इन्फेक्टड झालेले बरेच कॉम्प्युटर कैलास यांच्याकडे येऊ लागले.

लोक ते कॉम्प्युटर कैलास यांच्या कडे आणून तुम्हीच ते दुरुस्त करा असे सांगायचे, कैलास काहीतरि करून ते कॉम्प्युटर दुरुस्त करून द्यायचे. त्यांच्या लहान भावाने संजयने या वारंवार येणाऱ्या विषाणू वर एक उपाय शोधला होता. ते ग्राहकांना खूप आवडल. त्याचवेळी कैलास यांच्या डोक्यात विचार आला की हा अँटी व्हायरस बनवण्याचा व्यवसाय चांगले पैसे मिळवून देऊ शकतो म्हणून त्यांनी त्यांच्या लहान भावाला एक कॉम्प्युटर घेऊन दिला व न.ता.वाडी तील एका खोलीत बसून अँटी व्हायरस बनवायला सांगितले.

त्याला दीड वर्ष लागली पण मराठी माणसाच स्वतः च अस अँटी व्हायरस तयार झालं.त्याला नाव देण्यात आलं Quick Heal, ते १९९५ हे साल होत. त्यांनी त्याच पॅकेजिंग तयार केलं, लोगो बनवला, कंपनीच्या दारोदारी जाऊन ते आपलं प्रोडक्ट विकू लागले पण अँटी वायरस कॉम्प्युटर साठी किती महत्वाचे आहे हे पटवून देताना त्यांना नाकीनौ येऊ लागलं पण त्यांनी जिद्द सोडली नाही. त्याकाळात पुण्यात बऱ्याच IT कंपन्या सुरू होत होत्या, IT पार्क बनत होत.

अशावेळेस या कंपन्यांना परदेशी अँटी वायरस विकत घेण्यापेक्षा हे अँटी वायरस विकत घेणे स्वस्त पडलं. तर अनेक कंपन्यांनी quick heal बरोबर वर्षाचे करार केले. पुण्याबरोबरच मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी त्यांनी टीम उभी केली, या प्रवासाचा त्यांना बराच फायदा झाला, गुणवत्तेच्या बाबतीत देखील Quick Heal अँटी वायरस ने सर्वांना मात दिली. एक छोट्याश्या खोलीत उभं राहिलेलं Quick heal कधी एक लाख चौ फूट च्या ऑफिस मध्ये रूपांतरित झालं कळलं देखील नाही.

आज Quick Heal हे भारतीय आहे आणि पुण्यात तयार झालंय यावर कुणी विश्वास च ठेवणार नाही. आज तिथे १३०० हुन अधिक कर्मचारी काम करतात, देशातच नव्हे परदेशात देखील त्यांनी त्यांची ऑफिस उघडली आहेत, जगातील ८० देशांमधील कॉम्प्युटर मध्ये QUICK HEAL अँटी वायरस वापरलं जातं. हे सगळं साम्राज्य उभं केलय एका दहावी पास विद्यार्थ्यांने, विशेष म्हणजे हा उद्योजक मराठी माध्यमातून शिकला होता हे आजकालच्या पालकांनी लक्षात घ्यावे.