मृत्यूपत्र म्हणजे काय? ।। मृत्युपत्र का करावे आणि कोणी करावे? ।। मृत्युपत्र कधी करावे आणि त्याचे फायदे अशा अनेक विषयावर अतिशय मुद्देसूद माहिती !

शेती शैक्षणिक

आपण कायदया मध्ये नमूद केलेल्या अनेक तरतुदींचा फार कमी वेळा गांभीर्याने विचार करतो. आणि काही जण तर ही तरतूद आपल्यासाठी नाहीच, अशी पक्की धारणा मनामध्ये बाळगुन जगत असतात. पण जेव्हा तरतुदींचे महत्त्व समजते तेव्हा मात्र त्याबद्दल गांभीर्याने विचार हा केला जातो. मृत्युपत्र म्हणजेच इच्छापत्र हे कायद्याने दिलेले एक वरदान आहे. याचे महत्त्व समजून घेतले तर आपल्याला असे लक्षात येते की ही तरतुद जी आहे ती प्रत्येका साठी आहे. मृत्युपत्र हे कायदेशीर कागदपत्र आहे. यामध्ये आपल्या मृत्युपश्चात आपल्या मालमत्तेचा व आपल्या अल्पवयीन मुलांचा ताबा कोणा कडे द्यायचा? या विषयीची तरतूद नमूद केलेली असते.

आणि अनेकांच्या मनात येणारे प्रश्न म्हणजे मृत्युपत्र करण्याची गरज आपल्याला आहे काय? मृत्युपत्राचा नेमका उपयोग काय? तसंच अनेकांचा असा गैरसमज आहे कि मृत्युपत्र हे फक्त उद्योगपती किंवा श्रीमंत लोकांचा यांनीच केलं पाहिजे. खरं तर प्रत्येक माणसाला त्याच्या मालमत्तेचे त्याच्या मृत्यूपश्चात वर्गीकरण करण्याचा अधिकार आहे. मृत्युपत्र हा तुमच्या आर्थिक योजनेचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. थोडक्यात आपल्या पश्चात आपली मालमत्ता योग्य व्यक्तीच्या हातात जावी. या हेतूने कायदे नुसार तयार केलेला कागदपत्र म्हणजेच इच्छापत्र किंवा मृत्युपत्र असते.

यामध्ये आपण माहिती घेणार आहोत की, मृत्युपत्र म्हणजे काय? मृत्युपत्र का करावे? मृत्युपत्र करणे आवश्यक आहे का? मृत्युपत्र कोण कोणत्या मालमत्तेचे करता येते? व कोण कोणत्या मालमत्तेचे करता येत नाही? मृत्युपत्र एखाद्या स्त्रीला करायचे असेल तर? मृत्युपत्राचे प्रकार? मृत्युपत्र नोंदणीकृत असावे का ? मृत्युपत्र बदलता येते का? मृत्युपत्र व नॉमिनेशन मधिल फरक काय? मृत्युपत्र कधी करावे? मृत्यू पत्रासाठी दोन साक्षीदार अनिवार्य आहे का ? मृत्यु पत्रासाठी डॉक्टरचे मेडिकल सर्टिफिकेट पाहिजेच का? मृत्युपत्राची अंमलबजावणी? मृत्युपत्रा संबंधी प्रोबेट म्हणजे काय?

मृत्यूपत्राबाबत चे महत्वाचे मुद्दे व त्यासंदर्भात पडणारे प्रश्न. १.मृत्यू पत्र म्हणजे काय?: आपल्या संपत्तीचे आपल्या मृत्यू नंतर स्वतःच्या इच्छे नुसार वाटप व्हावे यासाठी इच्छा पत्र केले जाते. यालाच मृत्युपत्र असे म्हटले जाते. मृत्युपत्र म्हणजे व्यक्तीने त्याच्या पश्चात त्याच्या मालमत्तेच्या वाटाप या संदर्भात केलेला कायदेशीर दस्त ऐवज भारतीय वारसा कायदा 1925 सेक्शन 2 ह अन्वये मृत्युपत्र म्हणजे मृत्युपत्र करणाऱ्याने त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावावी या संबंधीची कायदेशीर रीतीने घोषित केलेली इच्छा होय.

मृत्यूपत्र का करावे?: माणसाने कितीही नाहीं म्हटलं तरी स्वतःच्या मालकीच्या प्रत्येक गोष्टी बाबत माणूस खूप भावूक व जागरूक असतो. आपल्या मालमत्तेचे आपल्या पश्चात काय होणार? हा प्रश्न प्रत्येक माणसाला आयुष्यात कधी ना कधी पडतोच. अनेक लोक म्हणतात कुठे घेऊन जाणार आहे हा पैसा? तसंही आपल्या पश्चात आपल्या मालमत्तेचे काय होतं ? हे कुठे बघायला आपण तर नसणारच.

एका अर्थी हे बरोबर आहे पण जर आपण नसलो तरी आपण आपल्या पश्चात आपल्या मालमत्तेचे काय काय करायचं हे मात्र ठरवू शकतो. आपण आपल्या मालमत्तेच इच्छापत्र / मृत्यूपत्र बनवून ठेवलं. तर आपण आपल्या इच्छेनुसार आपल्या संपत्तीची विभागणी करू शकतोच, पण पुढे त्या संपत्तीसाठी होणारे अनेक वादही टाळू शकतो. मृत्युपत्रा मुळे तुम्ही कुटुंबातील सदस्यांना ही तुमच्या पश्चात येणाऱ्या अडचणी पासून सुरक्षित करू शकता.

मृत्युपत्र करणे आवश्यक आहे का?: कायद्याने मृत्युपत्र करणे आवश्यक नाही. पण भविष्यात आपल्याच वारसदार मध्ये भांडणे लावून त्यांचे संबंध बिघडू नयेत, म्हणून मृत्यूपत्र केलेले केव्हाही चांगलेच असतात. एकदा माणूस गेल्यावर त्याचे वारसदार कसे वागतील हे कोणाच्या हातात नाही. पण कमीत कमी मृत्युपत्र आहे म्हटल्यावर भांडण्याची शक्यता कमी होऊ शकते.

माणूस आयुष्यभर अधिकाधिक संपत्ती मिळवण्याच्या मागे असतो. काही ठिकाणी तो नामांकन देखील करतो. पण तेवढेच पुरेसे नसते माणूस गेल्यावर त्याच्या संपत्तीची त्याच्या इच्छेप्रमाणे विभागणी आणि तीही कमी खर्चात करण्या करायचे काम मृत्युपत्र करते. त्याचप्रमाणे ज्यांना त्या संपत्तीतील हिस्सा मिळणार असतो त्यांचे हे काम सोपे होते तसेच कायदेशीर कामाला लागणारा वेळही वाचू शकतो.

मृत्युपत्र कोण कोणत्या मालमत्तेचे करता येते व कोणत्या नाही?: मृत्युपत्र केवळ आपल्या स्व कष्टार्जित चल /अचल संपत्ती चे करता येते किंवा वारसा हक्काने आलेल्या चल/अचल संपत्तीच्या केवळ न केवळ स्वतःच्या निहित हिस्यचेच करता येते. कायदेशीर रित्या या संपत्तीची आपल्या कडे मालकी आहे अशाच चल/ अचल संपत्तीचा मृत्युपत्र मध्ये समावेश करता येतो. एकत्र कुटुंबाच्या मिळकती वर सर्व वारसांचा अधिकार असतो. त्यामुळे एकत्र कुटुंबाची सर्व मिळकत मृत्युपत्रा ने देण्याचा अधिकार नसतो.

जरी असे मृत्युपत्र केले तरी, मृत्यू पत्रातील असा भाग अवैध ठरले. वारसा कायदा 1925 कलम 152 अन्वये एकत्र कुटुंबा तील स्वतःचा त्याची मिळकत मृत्युपत्र आणि देता येऊ शकेल. सर्व स्थावर जंगम दिसणारी व अदृश्य मालमत्ता, सिंगल व संयुक्त नावाने असलेली मालमत्ता, संपत्ती येणे असणारी रक्कम, देणे असणारी रक्कम यांचे मृत्युपत्र करता येते. जंगम मालमत्तेत नगदी रक्कम, दागिने, एफडी, बँके तील खाते, बीमा पॉलिसी, वाहने तर स्थावर मालमत्तेत तुमच्या मालकीच्या जमिनीचे, प्लॉटचे, फ्लॅटचे, इमारतीचे मृत्युपत्र करता येते.

मृत्युपत्र कोण करू शकतो आणि कोण करू शकत नाही?: कायद्या नुसार 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती मृत्युपत्र बनवू शकते. कुठलीही व्यक्ती ही संतुलित मनस्थितीत आहे, सज्ञान आहे ती मृत्युपत्रा च्या मदतीने आपली संपत्ती कोणाच्याही नावे ठेवून जाऊ शकते. अंध, मुक किंवा बहिर्या व्यक्तींना जर त्यांच्या कार्याचे परिणाम आणि कायदेशीर परिणाम समजत असतील तरच ते सुद्धा मृत्युपत्र बनवू शकतात.

सामान्य पणे असंतुलित असलेला मनुष्य मृत्युपत्र बनवू शकतो. पन जेव्हा तो संतुलित स्थितीत असेल. मात्र जर एखाद्या व्यक्तीला आपण काय करतो आहोत हे कळत नसेल तर अशा मनस्थितीत ती व्यक्ती मृत्युपत्र बनवू शकत नाही. जर एखादी व्यक्ती व्यसनाधीन असेल अथवा अशा मानसिक स्थितीत असेल जी आजारातून किंवा अन्य काही कारणांनी अनुभवली असेल ज्यामुळे तिला आपण काय करत आहोत याचे भान नसेल तर ती मृत्युपत्र /इच्छापत्र करण्यास अपात्र ठरते.

मृत्युपत्र एखाद्या स्त्रीला करायचे असेल तर?: स्त्रीला वडिलो पार्जित संपत्ती ची भावाच्या बरोबरीने मिळणारा हिस्सा, त्याच प्रमाणे स्वतः कमावलेले पैसे किंवा स्वतः कमावलेल्या पैशातून खरेदी केलेले दागिने, वस्तू, घर, जमीन यासारखी मालमत्ता आहे ती, पतीने, मुल-मुलांनी, सासर/ माहेरच्या नातेवाईकांनी किंवा मित्र-मैत्रिणी नी बक्षीस म्हणून दिलेल्या वस्तू वगैरे संपत्ती ही स्त्रीची स्वतःच्या मालकीची संपत्ती आहे. अशा संपत्तीचे स्त्री स्वतःच्या मर्जीने इच्छापत्र करू शकते. इच्छापत्र किंवा मृत्युपत्र करण्यासाठी स्त्रीला तिचा पती, मुले, आई, वडील वगैरे यांची संमतीची आवश्यकता नाही.

मृत्यू पत्रांचे प्रकार? दोन प्रकारचे मृत्युपत्र असतात: 1. विशेषाधिकार असलेले आणि 2. विशेषाधिकार नसलेले. विशेषाधिकार असलेले मृत्युपत्र हे मोहिमेवर किंवा प्रत्यक्ष युद्धात असलेले सैनिक किंवा वैमानिक किंवा खलाशी यांचे अनौपचारिक मृत्युपत्र असते. तर इतर सर्व मृत्युपत्र ह्यांना विशेषाधिकार नसलेले मृत्युपत्र म्हणतात. पहिल्या प्रकारचे मृत्युपत्र तोंडी किंवा लिखित असू शकते. आणि आपले आयुष्य धोक्यात टाकणाऱ्या व्यक्ती हे शेवटच्या क्षणी बनवितात. दुसऱ्या प्रकारच्या मृत्युपत्रा साठी सर्व औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात.

मृत्युपत्र नोंदणीकृत असावे का?: मृत्यूपत्रास कोणताही स्टॅम्प लागत नाही, त्यामुळे खरेदीखत, बक्षीस पत्र इत्यादी दस्ता च्या तुलनेत मृत्युपत्र तुलनेने खूपच कमी खर्चाचा दस्त आहे. तसेच मृत्युपत्राची नोंद ही करणेही कायद्याने बंधनकारक नाही. परंतु भविष्यात कोणतेही वाद किंवा गोंधळ होऊ नयेत यासाठी रजिस्ट्रेशन करणे चांगले. रजिस्ट्रेशनचा एक फायदा असतो, तो म्हणजे जर तुमचे मृत्युपत्र हरविले तर तुम्हाला त्याची कॉपी मिळू शकते.

मृत्युपत्राचे रजिस्ट्रेशन सब रजिस्टार ऑफिस मध्ये होते. नोंदणी कायदा 1908 मध्ये मृत्युपत्रा बद्दल काही विशेष तरतुदी आहेत ती म्हणजे, मृत्युपत्र केल्यानंतर कधीही नोंदविता येत, त्याचप्रमाणे मृत्युपत्र करणार्‍याच्या मृत्युनंतर देखील ते नोंदवता येते. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला त्याचे मृत्युपत्र हे नोंदणी अधिकाराच्या ताब्यात सीलबंद लखोट्या मध्ये देखील कस्टडी सारखे ठेवता येते. आणि संबंधित व्यक्तीला किंवा त्याच्यातर्फे माहितीगार इसमास मृत्युपत्र अर्ज करून मागे घेता येतो.

मृत्युपत्र बदलता येते का?: होय. एकदा केलेल्या मृत्युपत्रात तुम्ही कधीही बदलू शकता. किंवा त्यामध्ये दुरुस्त्या किंवा सुधारणाही करता येतात. मालमत्तेची खरेदी, विक्री, लग्न किंवा घटस्फोट, मृत्युपत्र मध्ये नमूद केलेल्या व्यक्तीचा मृत्यू, मुलांचा किंवा नातवंडाचा जन्म इत्यादी यासारख्या अनेक कारणांमुळे मृत्युपत्र बदलण्याची गरज पडते. मृत्युपत्र बदलण्याची प्रक्रिया आगधी सहज शक्य आहे. पहिले मृत्युपत्र रद्द करून दुसरे मृत्युपत्र करता येते किंवा मृत्युपत्राला नवीन पुरवणी कधीही जोडता येते. नवीन पुरवणी जोडताना मृत्युपत्रा प्रमाणेच साक्षी दारासमोर सही करावी लागते. तसेच त्यावर साक्षीदाराची सही, तारीख, वार व वेळ व स्थळ याचा उल्लेख असणे आवश्यक आहे. तसेच एकाच व्यक्तीने एका पेक्षा जास्त मृत्युपत्र केलेली असतील, तर कायद्यानुसार सर्वात शेवटी केलेले मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते.

मृत्युपत्र व नॉमिनेशन ?: आपल्या जवळ फारशी संपत्ती नाही किंवा जी संपत्ती आहे त्याचे नॉमिनेशन तर दिलेले आहे अशा भावनेतून अनेक जण मृत्युपत्र बनवीत नाहीत. अशा प्रकारे नॉमिनेशन देऊन ते मृत्युपत्राला महत्त्व देत नाहीत. नॉमिनी हा केवळ एक विश्वस्त असतो. सोसायटी, शेअर्स, विमा अशा ठिकाणी नॉमिनेशन करावी लागते. मात्र नॉमिनी व्यक्तीस काही मालकी हक्क मिळत नाही. ती एक तात्पुरती सोय असते. जेणेकरून मृत व्यक्तीच्या मिळकती संदर्भात पत्र व्यवहार इत्यादि. करता यावा.

नॉमिनेशन हा काही वारसा हक्काचा तिसरा कायदा होऊ शकत नाही. असे मुंबई उच्च न्यायालयाने अनेक निकाल मधून स्पष्ट केले आहे. उलट वारसांनी संपत्ती मागितली तर ती त्यांना सुपूर्त करावी लागते. शेवटी जर तुमची संपत्ती तुमच्या एखाद्या प्रिय माणसाला द्यायची असेल तर फक्त नॉमिनेशन करून काम भागणार नाही तर त्यासाठी मृत्युपत्र लिहिणे आवश्यक आहे. मृत्युपत्र तयार केल्या मुळे आपल्या मना प्रमाणे आपली संपत्तीची वाटणी वारसांना देता येते.

मृत्युपत्र कधी करावे?: बऱ्याच लोकांचा असा गैर समज आहे की खूप म्हातारे झाल्या शिवाय मृत्युपत्र करायची गरज नाही किंवा मृत्युपत्र केले म्हणजे आपल्या मृत्यूच जवळ आलं असे अनेकांना वाटते. एक तर मृत्यू निश्चित असला तरी त्याची वेळ सर्वात अनिश्चित असते. सबब आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम असतानाच मृत्यूपत्र करणे इष्ट आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात तर ते लवकरात लवकर करावे. कुठल्या दिवशी मृत्यूपत्र करावे असाही प्रश्न लोकांना पडतो आणि त्याबद्दल काही कायद्यात तरतूद नाही.

दोन साक्षीदार असणे अनिवार्य आहे का?: मृत्युपत्र कायदेशिर ठरण्यासाठी मृत्युपत्रा वर दोन सज्ञान साक्षीदारांनी सही करणे कायद्याने गरजेचे आहे. मृत्युपत्र करणाऱ्याने आणि दोन साक्षीदारांनी एकमेकां समोर मृत्युपत्रा वर सही करणे गरजेचे आहे. अर्थात दोन साक्षीदारांनी एकाच वेळी सही केली पाहिजे, असे काही नाही. त्याच प्रमाणे साक्षीदारांना मृत्युपत्रात काय लिहिले आहे हे माहिती असणे अपेक्षित नाही. मृत्यु पत्रातील लाभार्थ्यांना मात्र साक्षीदार होता येत नाही.

मृत्युपत्र बनवत असताना डॉक्टरचे सर्टिफिकेट गरजेचे आहे काय?: मृत्यू पत्राच्या शेवटी मृत्युपत्र करणाऱ्यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम होती, अशा आशयाचे डॉक्टरचे सर्टिफिकेट आपण बघितले असेल मात्र, असे सर्टिफिकेट असणे कायद्याने सक्तीचे नाही आणि केवळ ते नाही म्हणून मृत्युपत्र बेकायदेशीर ठरत नाही. पण प्रॅक्टिकली असे सर्टिफिकेट असणे चांगले.

प्रोबेट म्हणजे काय?: आपल्या पैकी अनेकांनी प्रोबेट हा शब्द ऐकला असेल. कोर्टाने प्रोबेट सर्टीफिकेट देणे, म्हणजे संबंधित मृत्यूपत्र हे अस्सल आहे. आणि कायदेशीर पणे अमलात आणलेले आहे, अशी पुष्टी देणे. आणि एकदा का हा प्रोबेट मिळाले की ते सर्वां वर बंधन कारक असते. मात्र मृत्युपत्राचे प्रोबेट घेणे हे फक्त मुंबई, चेन्नई आणि कोलकत्ता या मेट्रोपॉलिटन शहरांमध्येच गरजेचे आहे. इतर ठिकाणी अजिबात नाही. या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयाचे अनेक निकाल आहेत. उदाहरणार्थ पुण्यात मृत्युपत्र केले असल्यास आणि मिळकत आणि मिळकत देखील पुण्यात असल्यास प्रोबेट ची गरज नाही.

मृत्युपत्राची अंमलबजावणी: मृत्युपत्राचा अंमलबजावणी करता एक किंवा अधिक व्यवस्थापक म्हणजेच एक्झिक्युटर्स नेमता येतात. मात्र असे करणे कायद्याने बंधन कारक नाही. मृत्युपत्र तयार झाल्या नंतर ते कायदेशीर सल्लागारा कडे किंवा योग्य त्या अधिकाऱ्या कडे सुपूर्त करावे. त्यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हा ते मृत्युपत्र सादर केले जाऊ शकते.

भारतीय नोंदणी कायदा 1908 अंतर्गत मृत्युपत्र सुरक्षित ठेवण्याची तरतूद आहे. मृत्युपत्र असलेले सील बंद पाकीट, त्यावर मृत्युपत्र करणार्‍याचे नाव किंवा त्याच्या एजंटचे नाव लिहून कुठल्याही निबंधकाकडे सुरक्षित ठेवण्या साठी देता येते. कायद्या प्रमाणे मृत्युपत्र कोठेही सुरक्षित ठेवता येते, पण ते अशा जागी ठेवावे की त्याला कोणीही हात लावू शकणार नाही आणि तुमच्या मृत्यू नंतर ते तुमच्या परी जणांना सहजपणे मिळेल. त्याच प्रमाणे अनेक बँका व आर्थिक संस्था मृत्युपत्र सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्या कस्टडी सेवा देतात. तेथे मृत्युपत्र ठेवता येते.

मृत्यूपत्रा बाबत महत्त्वाचे मुद्दे: अविवाहित व्यक्तीने विवाहा पूर्वी केलेले मृत्युपत्र विवाह झाल्या वर आपो आप रद्द होते. त्याच प्रमाणे मृत्युपत्रात परस्पर विरोधी मजकूर असल्यास, शेवटचा मजकूर ग्राह्य धरण्यात येतो. मृत्युपत्रात उल्लेखिलेल्या संपत्ती पैकी मृत्युपत्र करणार्‍याच्या निधनाच्या वेळेस केवल शिल्लक संपत्ती केवळ विचारात घेतली जाते. मृत्युपत्रा मध्ये अल्पवयीन अथवा मानसिक दृष्ट्या अस्थिर मुलांच्या पालन पोषणाची भविष्याची तरतूद करून ठेवता येते. तसेच विवाहा पूर्वी अथवा विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या अपत्यांच्या (अल्पवयीन अथवा सज्ञान) नावेही मृत्युपत्रा द्वारे मालमत्ता करता येते.

मृत्युपत्रा द्वारे व्यक्तीच्या मालकीची संपूर्ण मालमत्ता दान करता येते. अथवा एखाद्या संस्थेच्या नावावर ही करता येते. जेव्हा व्यक्ती मृत्यूपत्र करून ठेवते तेव्हा त्या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात संपत्तीचे वाटप हे इंडियन सक्सेशन अॅक्ट 1925 म्हणजेच भारतीय वारस अनुक्रम कायदा 1925 मधील तरतुदी नुसार केले जाते. परंतु मृत्युपत्र अभावी मात्र व्यक्तींच्या संपत्तीचे वाटप हिंदू वारसा हक्क कायदा 1956 च्या तरतुदीनुसार केले जाते.

टैक्स च्या दृष्टिकोनातून विचार केल्यास ज्या माल मत्तेसाठी मृत्युपत्र झालेले आहे अशा मालमत्तेची टॅक्स लायबिलिटी (कर दायित्व) तुलनेने कमी असते. मृत्युपत्र करणारी व्यक्ती जर स्वाक्षरी करण्यास असमर्थ असेल तर इतर कोणतीही व्यक्ती मृत्युपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या निर्देशा नुसार मृत्युपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या समक्ष मृत्युपत्रावर स्वाक्षरी करू शकते. मृत्यू पत्रात उल्लेखित मिळकती बाबत पुरेसे आणि निश्चित वर्णन मृत्युपत्रात असावे.

मृत्युपत्रात उल्लेखित मिळकती मृत्युपत्र करणाऱ्या कडे कशा आल्या आणि मृत्यू नंतर त्या मिळकतीची विल्हेवाट कोणी व कशी लावावी, याबाबत स्पष्ट उल्लेख असावा. मृत्युपत्रा वर शेवटी किंवा स्वतंत्र पणे मृत्युपत्र करणारी व्यक्ती मृत्युपत्र करणाऱ्यास शारीरिक व मानसिक रित्या सदृढ आहे असा उल्लेख असलेले डॉक्टरचे प्रमाणपत्र असावे. असे प्रमाणपत्र मृत्युपत्राचा सहभाग असावा यामुळे पुढे कायदेशीर अडचणी उद्भवत नाहीत. कोणतीही मृत्युपत्र हे मृत्यू करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यू नंतरच अमलात येऊ शकते.

मृत्यूपत्रा बाबत पडणारे प्रश्न: १.आणखी कोणत्या मालमत्तेचा व संपत्तीचा उल्लेख मृत्युपत्रात करता येईल?: उत्तर -पाळीव प्राण्यांचा, पेंटिंगच, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा, फर्निचरचा, त्याच प्रमाणे बौद्धिक संपत्ती जसे ट्रेडमार्क, पेंट्स, कॉपीराईट्स, लायसन्स, वैयक्तिक पुस्तके, वैयक्तिक गोष्टी यांचा उल्लेख मृत्युपत्रात करता येतो. २. नवरा बायको एकत्र जॉईंट मृत्युपत्र बनवू शकतात का? उत्तर- होय, या ठिकाणी दोघांनीही एकमेकांच्या नावाने मालमत्ता लिहून दिलेली असते आणि शेवटी ती परिवाराला व नातलगांना जॉईंट म्हणजेच एकत्र मृत्युपत्राद्वारे लिहून दिली जाते. पण हे जॉईन मृत्युपत्र दोघांचाही मृत्यू होईल तेव्हाच लागू होते.

३.मृत्युपत्र बनविताना वकिलांची मदत घेणे गरजेचे आहे का?: उत्तर – नाही, एक साधे मृत्युपत्र बनविताना तुम्ही स्वतः योग्य ती काळजी घेऊन ते बनवू शकता. फक्त तसे करताना योग्य ते शब्द काळजी पूर्वक वापरले पाहिजे. त्यात कुठलाही विरोधाभास किंवा अस्पष्टता असता कामा नये, ज्यामुळे नातलगा मधे गैर समज व तंटे होणार नाहीत. ४. मृत्युपत्राची नोंदणी तलाठी घेऊ शकतात काय? किंवा त्यासाठी वरिष्ठांचा आदेश आवश्यक आहे का? उत्तर – मृत्युपत्राची नोंदणी तलाठी घेऊ शकतात वरिष्ठांचा आदेश आवश्यक नाही.

५.परदेशातील मालमत्तांचा मृत्युपत्रात उल्लेख केला जाऊ शकतो का? उत्तर – होय, परदेशात असणाऱ्या मालमत्तांवर तेथील स्थानिक नियम लागू होतात आणि तेथील मृत्युपत्र अमलात आणण्याची प्रणाली भारतातील प्रणाली पेक्षा वेगळे असू शकते, त्यामुळे भारतातील व परदेशातील मालमत्ते संदर्भात दोन वेगवेगळी मृत्युपत्र बनवणे इस्ट राहते. अशा मृत्युपत्रांना कन्कंरंट मृत्युपत्र म्हणतात. जर ती एकमेकांना लिंक नसतील तर स्वतंत्रपणे ट्रीट केली जातात. तर आज आपण अशा प्रकारे मृत्युपत्रा बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलीत. त्या बाबतीत असणारे समज, गैरसमज, प्रश्न, उत्तरे हे सविस्तर पणे पाहिलेत.

4 thoughts on “मृत्यूपत्र म्हणजे काय? ।। मृत्युपत्र का करावे आणि कोणी करावे? ।। मृत्युपत्र कधी करावे आणि त्याचे फायदे अशा अनेक विषयावर अतिशय मुद्देसूद माहिती !

  1. सात बारा मध्ये सावत्र भाऊ नाव टाकले ते नाव कशै कमी करता यईल…??

  2. मला मृत्युपत्र करायचे आहे. जे doctors चे certificate आवश्यक असते ते sarkari doctor चे असावे का खाजगी doctor चे चालते. कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती. माझा मोबाईल no 739195 08 22 आणि 9766 45 99 42

  3. शासन kadun मीलालेली जागे चे मृत्यु पत्र करता येते काय… काबील कस्तकारी जागा

  4. आईवडिलांची स्वकष्टार्जित संपत्ती आहे दोघेही वारले आईने दोघांच्या नावे असणार्या संपत्ती चे ईच्छा पत्र आईने लिहून ठेवले होते प्रोबेट मंजूर झाला आहे परंतु विधवा भावजयीने अपिल दाखल केले आहे त्यांना काहीही दिले नाही

Comments are closed.