प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) 2021 ।। मुद्रा लोन कसे मिळवावे? ।। लाभार्थी कोण असू शकतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

तुमच्यासारख्या होतकरू उद्योजकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी आणि देशभरात उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. त्यापैकीच एक म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना. प्रधानमंत्री मुद्रा योजने मार्फत तुम्हाला छोट्या व मध्यम स्वरूपाच्या व्यवसायासाठी 50 हजार ते दहा लाखापर्यंत कर्ज मिळू शकतो. या योजनेअंतर्गत तीन श्रेण्या मोडतात.1) 50 हजार पर्यंतच्या कर्जासाठी शिशु योजना 2) पन्नास हजार ते पाच लाखापर्यंतच्या कर्जासाठी किशोर योजना 3) 5लाख ते दहा लाखापर्यंत अशा कर्जासाठी तरुण योजना.

आता कोणाला या योजनेचा लाभ घेता येतो ते पाहूया: या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय किमान 18 वर्ष आवश्यक आहे. जर तुमचा व्यवसाय लघु व मध्यम स्वरूपाच्या व्यवसायामध्ये मोडत असेल, जसे की अन्नधान्य, भाजीपाला, पशुसंवर्धन यांची विक्री किंवा व्यापार शेती आणि त्या संबंधित उद्योग आणि व्यापार, वाहतूक दळणवळण या संबंधित व्यापार, खाद्यपदार्थ संबंधित व्यवसाय, लघु उद्योग व कारखाने या आणि यासारख्या कोणत्याही स्वरूपाचा असेल तर तुम्हाला या योजनेचा नक्कीच लाभ मिळू शकतो.

या योजनेअंतर्गत कर्जाची मागणी करण्यासाठी तुम्हाला नजीकच्या बँकेमध्ये जाऊन रीतसर अर्ज करता येऊ शकतो. ही सुविधा जवळपास सर्वच बँकांमध्ये उपलब्ध आहे. अगदी ग्रामीण भागांमध्ये सुद्धा. तसेच उद्यमी मित्र या वेबसाइटवरून तुम्ही कर्जाची मागणी करू शकता.

बँकेकडून प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाचा व्याजदर निश्चित केला जातो. कर्जाची मागणी करताना तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. जसे की ओळखपत्र, राहत्या जागेचे हमीपत्र आणि व्यवसाय, तसेच मिळकती संदर्भातील कागदपत्र इत्यादी.

ओळखपत्रासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड ,मतदान ओळखपत्र वाहन चालकाचा परवाना यापैकी कोणतेही वैध धरले जाते. त्याबरोबर वर सांगितल्याप्रमाणे रहात्या जागेचे हमीपत्र त्यासाठी आधार कार्ड,वाहन चालकाचा परवाना किंवा कुठलेही ग्राह्य हमीपत्र.

हि योजना व्यवसायासाठी लागणाऱ्या कर्जासंबंधित असल्यामुळे व्यवसाय संबंधित हमी देणाऱ्या कागदपत्राची बँकेकडून विचारणा केली जाते. त्यानंतर त्याची शहानिशा करून बँक तुमच्या व्यवसायाची खात्री करून घेते. सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर बँक तुम्हाला हवी असलेली रक्कम व्यवसायासाठी उपलब्ध करून देते. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी भांडवलाची गरज असेल तर या योजनेचा लाभ अवश्य घ्या.

प्रश्न उत्तरे ज्याद्वारे तुमच्या शंकांचे समाधान होईल: मुद्रा म्हणजे काय? उत्तर : मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लि. (मुद्रा ), भारत सरकार द्वारा स्थापित एक वित्तीय संस्था आहे जी सूक्ष्म उद्योगांना वित्त पुरवठा करणेसाठी कार्य करणाऱ्या वित्तीय संस्थांना पुनर्वित्त उपलब्ध करून देते.

मा. वित्तमंत्र्यांनी 20१६ च्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना या योजनेची घोषणा केली. मुद्राचा उद्देश बॅंका, Non Banking Finance companies (NBFC) आणि Micro Finance Institution (MFI) सारख्या विविध संस्थाद्वारे नॉन-कॉपोर्रेट लघु उद्योग क्षेत्राला निधी पुरवणे आहे.

मुद्राची स्थापना का केली आहे? उत्तर : नॉन कार्पोरेट लघू क्षेत्रातील व्यवसायासाठी पुरेसा वित्त पुरवठा उपलब्ध नसणे, ही एक मोठी अडचण आहे. 90% पेक्षाही अधिक उद्योग क्षेत्रातील व्यवसायांसाठी पुरेसा वित्त पुरवठा उपलब्ध नसल्याचे दिसून येते. नॉन कार्पोरेट क्षेत्रासाठी पुरेसा वित्तीय पुरवठा उपलब्ध करुन या क्षेत्राला मुख्य प्रवाहात आणण्याच्या उदात्त हेतूने केंद्र शासनाने “मुद्रा” ची स्थापना केली आहे. यासाठी केंद्र शासनाने प्रलंबित मुद्रा बँक कायदा मंजूर करुन Small Industries Development Bank of India (SIDBI) च्या अंतर्गत नॉन बँकींग वित्तीय कंपनी “मुद्रा लिमिटेड” ची स्थापना करण्यात आली आहे.

मुद्राची भूमिका व जबाबदाऱ्या काय आहेत? उत्तर : सुक्ष्म/लघु क्षेत्रातील उत्पादन करणाऱ्या, व्यापार करणाऱ्या व सेवा क्षेत्रातील व्यवसायासाठी वित्त पुरवठा करीत असलेल्या सर्व नॉन बँकींग, वित्तीय संस्था, सेक्शन & अंतर्गत नोंदणीकृत व्यापारी संस्था, अनुसूचित ग्रामीण बँका यांना पुनर्वित्त देण्यासाठी बांधील आहे. याच बरोबर राज्यस्तरीय‍ / विभागीय स्तरावरील वित्तीय संस्थांकडून लघू उद्योगांना वित्त पुरवठा होणेसाठी भागीदारी करेल.

मुद्रा अंतर्गत उपलब्ध योजना कोणत्या आहेत? मुद्रा कसे कार्य करते? उत्तर : प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत शिशू, किशोर व तरुण या तीन गट प्रकारामध्ये कर्ज सुविधा उपलब्ध आहे. लघू उद्योगाची कर्जाची निकड व‍ टप्याटप्याने उद्योगाच्या वाढीनुरुप व गरजेनुरुप आवश्यक कर्जपुरवठा बँकांकडून उपलब्ध करण्याच्या दृष्टीने वरीलप्रमाणे कर्जाचे 3 गटप्रकार केले आहे.

अ) शिशू गटांतर्गत रु.50,000/- च्या मर्यादेत, ब) किशोर गटांतर्गत रु.50,000/- च्या पुढील व रु.5 लाखाच्या खालील कर्ज, क) तरुण गटांतर्गत रु.5 लाखावरील परंतु रु.10 लाखाच्या मर्यादेत कर्जाची सुविधा विविध बँका व वित्तीय संस्थांकडून उपलब्ध केली आहे.

मुद्रा अंतर्गत लाभार्थी कोण? मुद्रा अंतर्गत कोणत्या प्रकारचे लाभार्थी सहाय्यासाठी पात्र आहेत? उत्तर : नॉन कार्पोरेट लघुउद्योग क्षेत्रातील प्रोप्रायटर, भागीदारी फर्म ज्यामध्ये उत्पादीत युनिट्स, सेवा क्षेत्रातील युनिट्स, ट्रक ऑपरेटर, अन्न सेवा युनिट, दुरुस्ती दुकाने, मशिन ऑपरेटर, कारागिर, खाद्य प्रक्रिया उद्योग आणि इतर ग्रामीण व शहरी क्षेत्रातील लघूउद्योग हे मुद्राचे लाभार्थी आहेत.

कर्ज नामंजूर झाल्यास बँक अधिकाऱ्यांविरुध्द तक्रार करण्याची यंत्रणा काय आहे? उत्तर : बँकेच्या अधिकाऱ्यांकडून कर्ज मंजूरीमध्ये चूक झाल्यास त्याबाबत संबंधित बँकेच्या वरिष्ठांकडे उदा.संबंधित बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक / विभागीय व्यवस्थापक यांचेकडे तक्रार नोंदविता येऊ शकते.

संजय नावाच्या एका तरुणाला भाजी विक्रीचा व्यवसाय चालू करायचा असल्यास त्याला प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ मिळू शकेल का? उत्तर : होय. व्यवसायासंबंधी भांडवल या योजनेमार्फत निश्चित मिळू शकते.

सुनीताला मसाल्याच्या कारखान्यासाठी छोटी जागा व काही उपकरणे विकत घेण्यासाठी लागणारी रक्कम प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत मिळू शकते का? उत्तर : होय.सुनीताच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या रकमेची सोय प्रधानमंत्री मुद्रा योजना के अंतर्गत होऊ शकते.

मुद्रा योजनेच्या अधिक माहितीसाठी तसेच फॉर्म डाउनलोड करण्यासाठी पुढील वेबसाईटचा व हेल्पलाइन नंबरची मदत घेऊ शकता. वेबसाईट: https://www.mudra.org.in हेल्पलाईन नंबर: १८०० १८० ११११ / १८०० ११ ०००१ याव्यतिरिक्त अन्य प्रश्नांसाठी https://mahamudra.maharashtra.gov.in/1004/FAQ याठिकाणी माहिती घेऊ शकता !

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.