पाककलेला समर्पित असलेलं रोम मधील संग्रहालय, पाहा फोटो

प्रवास

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

प्राचीन काळातील कला, संस्कृती आणि परंपरा याबद्दल बरीचशी माहिती उत्खननात सापडलेल्या वस्तू, नाणी तसेच शिल्प यामधून मिळू शकते, परंतू त्या काळात लोक काय खात असतील, विविध प्रकारचे अन्न पदार्थ कसे बनवत असतील याबद्दल फारशी माहिती किंवा संशोधन झालेलं नाही. किंवा त्याला विशेष महत्त्व देखील दिलं गेलेलं ऐकिवात नाही. आतां मात्र हे शक्य झाले आहे.

गारम – म्युझिओ डेला क्युसिना, रोममधील नवीनतम पाककला लायब्ररी आणि संग्रहालय रोम आणि इटलीचे अन्न पदार्थ आणि स्वयंपाकाच्या इतिहासाला समर्पित आहे. प्राचीन युगातील आइसक्रीमचे साचे, ५०० वर्ष जुनी पाककलेची पुस्तके असणारी लायब्ररी, वेगवेगळ्या पाककृतींकरीता लागणारे साहित्य असं बरंच काही इथे पहायला मिळेल.

या संग्रहालयाचे गारम हे नांव प्राचीन ग्रीसच्या पाककृती मधील एका महत्वाच्या घटकावरुन देण्यात आले आहे. गारम हा एक आंबवलेला फिश सॉस आहे जो फिनिशिया, प्राचीन ग्रीस, रोमच्या पाककृतींमध्ये मसाला म्हणून वापरला जात असे.

पंधराव्या शतकापासून आतापर्यंत रोम आणि इटली मधील लोकांच्या जेवणामध्ये कसे स्थित्यंतर होत गेले आणि ५०० वर्षांमध्ये वेगवेगळे अन्न पदार्थ कसे विकसित झाले आणि त्या काळात पदार्थ कसे बनवले जात, याची इत्यंभूत माहिती ह्या संग्रहालयात उपलब्ध आहे.

पॅलाटिन हिलवरील हे संग्रहालय बाहेरील बाजूस रोमच्या आकर्षक पॅलाझीसारखे दिसते, आणि त्याचे प्रवेशद्वार रोमन सैनिकांच्या पुतळ्यांनी आणि सजावटीच्या कलशांनी नटलेले आहे.

या संग्रहालयात प्रवेश केल्यावर मात्र लक्षात येते की हा सर्वसाधारण रोमन व्हिला नाही. इथे काचेच्या कॅबिनेटमध्ये स्वयंपाकाची शेकडो साधने प्रदर्शित केलेली आहेत: १९व्या शतकातील अवजड पास्ता मशीन, इटालियन भिक्षूंनी फक्त एकदांच वापरलेले २२० वर्ष जुने कटोरे आणि उत्कृष्ट इटालियन रेसिपी, स्टीलची भांडी आणि बरंच काही. पहिल्या दृष्टिक्षेपात जे मध्ययुगीन चिलखतासारखे दिसतात, ते खरं तर ५०० वर्ष जुने धातूचे मोल्ड होते; काही बेकिंगसाठी, तर काही चॉकलेट किंवा आईस्क्रीम बनवण्यासाठी.

कासा आर्टुसी हे देशातील सर्वात प्रतिष्ठित कुकबुक लेखक पेलेग्रिनो आर्टुसी यांना समर्पित आहे. आर्टुसीचे १८९१ मधील “सायन्स इन द किचन अँड द आर्ट ऑफ ईटिंग वेल” हे इटालियन खाद्यपदार्थांचे पुस्तक पूर्वी देशातील उच्चभ्रू लोकांसाठी राखीव होते. आतां मात्र या संग्रहालयामध्ये ते सर्वांसाठी उपलब्ध आहे.

पेलेग्रिनो आर्टुसी हा त्या काळातील एखाद्या फूड ब्लॉगरसारखा होता. त्याने स्थानिक, हंगामी आणि दर्जेदार उत्पादने वापरण्याची सूचना केली आहे. कच्चा माल म्हणून तुम्ही नेहमीच उत्कृष्ट घटक निवडले पाहिजेत, कारण ते तुम्हांला चटकदार खाद्य पदार्थ बनवण्यास सहाय्य करतील असं तो म्हणतो. त्याच्या कूकबुक मध्ये पाककृतींच्या इतर काही पुस्तकांप्रमाणे रंगीबेरंगी चित्र नाहीत, पण त्याची लेखन शैली मात्र वाचकांना नक्कीच बांधून ठेवते.

मे २०२२ मध्ये सुरू होणाऱ्या म्युझिओ डेला क्युसिना ह्या संग्रहालयातील “ट्रिशिआंट” हे कूकबुक पाककृतींच्या १२० पुस्तिकांपैकी एक आहे. “अनेकदा छपाई झालेले हे पहिले कूकबुक जवळजवळ ५५० वर्षांपूर्वी प्रकाशित झाल्यापासून अनेक इटालियन पाककृती नष्ट झाल्या आहेत, किंवा जुन्या ग्रंथांमध्ये दडुन रहात आहेत” असे संग्रहालयाचे संचालक मॅटेओ घिरिघिनी यांनी सांगितले. आतापर्यंत अंधारात राहिलेल्या आणि समाजातील विशिष्ट वर्गासाठी राखीव असलेल्या जुन्या पाककृतींना सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचे काम म्युझिओ डेला क्युसीना करणार आहे.

एका ऐतिहासिक जागेवर हे संग्रहालय असणं हा योगायोग नक्कीच नाही. हे संग्रहालय रोमच्या दोन सर्वात महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांच्या मध्यभागी आहे – २६०० वर्षे जुने स्टेडियम सर्कस मॅक्सिमस आणि पॅलाटिन हिल, जिथे रोमची स्थापना झाली होती. समकालीन इतिहास वाचण्याचा आणि समजून घेण्याचा पाककला हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. विशिष्ट काळातील स्वयंपाक हा त्या काळातील प्रथा, विचार पद्धती, आर्थिक आणि राजकीय परिस्थितींबद्दल बरेच काही सांगू शकतो.

गारम – म्युझिओ डेला क्युसिना हे रोम मधील प्राचीन पाककलेला समर्पित असलेले संग्रहालय एकमेवाद्वितीय आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा