या रहस्यमयरित्या गायब झालेल्या विमानाच्या प्रतिक्षेत आजही आहेत अनेक कुटुंबं

आंतरराष्ट्रीय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

८ मार्च २०१४ च्या चांदण्या रात्री १२ वाजून ४८ मिनिटांनी मलेशिया एअरलाइन्सचे बोईंग ७७७-२००ईआर ह्या विमानाने क्वालालंपूर येथून उड्डाण केले आणि ३५,००० फूट उंची गाठल्यावर त्याला बीजिंगच्या दिशेने वळविण्यात आले. फर्स्ट ऑफिसर फारिक हमीद हे त्या विमानाचे पायलट होते. ते २७ वर्षांचे होते. त्यांच्यासाठी हे प्रशिक्षणाचे शेवटचे उड्डाण होते, आणि त्यांना लवकरच पूर्णपणे प्रमाणित वैमानिक केले जाणार होते. ५३ वर्षांचा झहरी अहमद शाह हा त्याचा ट्रेनर पायलट इन कमांड होता, जो मलेशिया एअरलाइन्समधील सर्वात वरिष्ठ कॅप्टनपैकी एक होता.

विमानाच्या केबिनमध्ये १० फ्लाइट अटेंडंट होते जे सर्व मलेशियन होते. त्या विमानात २२७ प्रवासी होते ज्यापैकी पाच लहान मुले होती. बहुतेक प्रवासी चिनी होते; उर्वरित, ३८ मलेशियन होते आणि इतर इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, भारत, फ्रान्स, युनायटेड स्टेट्स, इराण, युक्रेन, कॅनडा, न्यूझीलंड, नेदरलँड्स, रशिया आणि तैवान या देशातील होते. त्या रात्री कॉकपिटमध्ये फर्स्ट ऑफिसर फारिक विमान चालवत होता आणि कॅप्टन झहरी रेडिओ सांभाळत होता. झहरीचे रेडिओ प्रसारण रूढीप्रमाणे नव्हते. पहाटे १:०१ वाजता त्याने रेडिओ मेसेज केला की विमान ३५,००० फुटांवर पोहोचले आहे. वास्तविक पाहता विमानाने किती उंची गाठली आहे यापेक्षा ते किती उंचीच्या वर पोहोचले आहे, ह्याची नोंद करणे आवश्यक असते. १:०८ वाजता विमानाने मलेशियाचा किनारा ओलांडला आणि दक्षिण चीन समुद्र ओलांडून व्हिएतनामच्या दिशेने निघाले. झहरीने पुन्हा विमानाची उंची ३५,००० फूट नोंदवली.

अकरा मिनिटांनंतर व्हिएतनामी हवाई-वाहतूक अधिकारक्षेत्राच्या जवळ विमान आल्यावर क्वालालंपूर केंद्राच्या नियंत्रकाने रेडिओ मेसेज केला, “मलेशियन तीन-सात-शून्य, हो ची मिन्ह एक-दोन-शून्य-दशांशशी संपर्क साधा – शुभ रात्री.” झहरीने उत्तर दिले, “शुभ रात्री. मलेशियन तीन-सात-शून्य.” खरं तर त्याने रेडिओ फ्रिक्वेन्सी वाचायला हवी होती, पण वाचली नाही. मलेशिया एअरलाइन्सच्या बोईंग ७७७-२००ईआर ह्या विमानाकडून आलेला तो शेवटचा संदेश होता.

विमानाने व्हिएतनामी हवाई वाहतूक क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर चाळीस सेकंदांनंतर ते मलेशियाच्या हवाई वाहतूक नियंत्रणाच्या रडारवरुन गायब झाले. वेळ होती १:२१, म्हणजे टेकऑफ नंतर ३९ मिनिटे झाली होती. क्वालालंपूरमधील नियंत्रक त्याच्या स्क्रीनवर इतर रहदारी हाताळत होता आणि विमान गायब झाल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. जेव्हां त्याच्या लक्षात आले, तेव्हां त्याने असे गृहीत धरले की विमान त्याच्या क्षेत्राच्या पलीकडे कुठेतरी हो ची मिन्हच्या हवाई क्षेत्रात आहे.

दरम्यान व्हिएतनामी नियंत्रकांनी विमान त्यांच्या हवाई क्षेत्रात पाहिले पण नंतर ते रडारवरून गायब झाले. खरं तर त्यांनी क्वालालंपूरच्या कंट्रोलला ताबडतोब कळवायला हवे होते, तसं न करता त्यांनी विमानाशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी क्वालालंपूरला माहिती देण्यासाठी फोन केला, पण तोपर्यंत विमान गायब होऊन १८ मिनिटे उलटून गेली होती. हा तर गोंधळ आणि अक्षमतेचा कळस झाला होता. विमान बेपत्ता झाल्यानंतर एक तासाच्या आत क्वालालंपूरच्या एरोनॉटिकल रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरला सूचित करणे आवश्यक होते, पण दुपारचे २:३० वाजले तरी त्यांना कळविण्यात आले नव्हते. ६:३२ वाजता जेव्हां आणीबाणीची परिस्थिती उद्भवली, तोपर्यंत आणखी चार तास निघून गेले होते.

त्या वेळेदरम्यान विमान बीजिंगमध्ये उतरायला हवे होते. त्याचा शोध सुरुवातीला मलेशिया आणि व्हिएतनाममधील दक्षिण चीन समुद्रात घेण्यात येत होता. सात वेगवेगळ्या देशांतील ३४ जहाजे आणि ७ देशांची २८ विमाने त्या गायब झालेल्या विमानाचा शोध घेत होती. मात्र त्या विमानाचा माग लागत नव्हता. काही दिवसातच हवाई वाहतूक नियंत्रण संगणकांवरून प्राथमिक रडार रेकॉर्ड शोधण्यात आली, आणि मलेशिया हवाई-दलाच्या डेटाद्वारे असे अनुमान काढण्यात आले, की ते विमान रडारवरून गायब होताच झपाट्याने नैऋत्येकडे वळले, आणि मलाय द्वीपकल्प ओलांडून पेनांग बेटाकडून मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या वायव्येकडे गेले. तिथून मात्र ते अस्पष्ट होत दिसेनासे झाले. तितकं अंतर जाण्यासाठी एका तासापेक्षा जास्त वेळ लागला असणार, त्यामुळे हे अपहरणाचे प्रकरण नव्हते असा निष्कर्ष काढण्यात आला.

विमान रहस्यमयरित्या गायब झाल्यामुळे लोकांचा अत्याधुनिक यंत्रणेवरील विश्वास उडाल्यासारखा झाला आणि मानवी जीवनाची अनिश्चितता अधोरेखित झाली. अनेक कुटुंबे तर उद्ध्वस्त झालीच, पण सर्व प्रकारे सुरक्षित असलेले विमान गायब कसे काय होऊ शकते असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला. त्या रात्री जे काही घडले त्याची पुनर्रचना करून काही अंदाज बांधण्यात आले, परंतू ते विमान नक्की कुठे कोसळले ते खात्रीशीररित्या कुणालाच सांगता आले नाही.

२३९ प्रवासी असलेले मलेशिया एअरलाइन्सचे विमान बेपत्ता होणे हे विमान क्षेत्रामधील जगातील सर्वात मोठे रहस्य आहे. मलेशियन सरकारने बेपत्ता झालेल्या विमानाचा ठावठिकाणा शोधण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत, पण पाच वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर देखील त्याचा नेमका ठावठिकाणा अज्ञात आहे. मात्र एका रिचर्ड गॉडफ्रे ह्या ब्रिटीश वैमानिक अभियंत्याचा दावा आहे की, त्याचा शोध ह्या अगम्य घटनेच्या मूळाशी पोहचेल.

रिचर्ड गॉडफ्रेचा विश्वास आहे की बोइंग ७७७ पर्थ, पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेला २,००० किमी अंतरावर हिंदी महासागरात कोसळले, ज्याचा डेटा गणनेद्वारे निर्धारित केलेला अचूक बिंदू हिंद महासागरात सुमारे ३३ अंश दक्षिण आणि ९५ अंश पूर्व असा आहे. ह्या शोध मोहिमेसाठी आतापर्यंत लाखो डॉलर्स खर्च झाले आहेत आणि कुटुंबातील सदस्यांकडून त्यांच्या प्रियजनांना शोधण्याची सतत मागणी होत आहे. रिचर्ड गॉडफ्रेचा निष्कर्ष काय असेल याची उत्सुकता साऱ्या जगाला आहे.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा