न आवडणाऱ्या व्यक्तीशी ऍडजेस्ट कसे व्हायचे? जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

लोकप्रिय शैक्षणिक

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. तो समाजाशिवाय एकटा जगू शकत नाही. समाज म्हटले की व्यक्तींचा समूह आला. व्यक्ती म्हटले की त्याचा स्वभाव आला. त्याचे इतर गुण अवगुण आले. एकंदरीत काय तर त्याचे व्यक्तिमत्त्व आले. माणूस आवडणे किंवा न आवडणे, पटणे किंवा न पटणे हे त्याच्या व्यक्तिमत्त्वावर पूर्णपणे अवलंबून असते. एखाद्याला एखाद्या माणसाचे बाह्य व्यक्तिमत्त्व आवडत नाही.

तर एखाद्याला त्याचा स्वभाव किंवा त्याचे अंतर्गत व्यक्तिमत्व आवडत नाही. जो व्यक्ती आपल्याला आवडत नाही किंवा पटत नाही त्याला टाळणे हा एकमेव उपाय त्यावर असू शकतो. पण जर दैनंदिन जीवनात त्या व्यक्तीला टाळणे शक्य नसेल तेव्हा मात्र नाईलाज होतो व न आवडणाऱ्या व्यक्तीसह इच्छा नसतानाही राहावे लागते. शेजारी असो ऑफिस असो कंपनी असो किंवा आपलं घर असो.

ज्या ठिकाणी आपण काम करतो किंवा राहतो अशा ठिकाणी आपल्या अवतीभवती विविध व्यक्तिमत्वाचे स्वभावाचे भिन्न लोक राहत असतात. आणि त्या सगळ्यांशी आपलं जमेलच असं नाही. अशा न आवडणाऱ्या लोकांना सोडून जाणे किंवा टाळणे कधी कधी शक्य होत नाही.

मग अशा वेळेस त्यांच्या सहवासात त्यांचे तोंड पहात त्यांचे बोलणे ऐकत त्यांचे ते वागणे सहन करीत जगावं लागतं. मग तिथे आपण आनंदी नसतो, उत्साही नसतो आणि समाधानी पण नसतो. त्याचाच परिणाम आपण करीत असलेल्या कामाच्या क्वॉलिटी वर होतो, आपल्या जगण्यावर होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आरोग्यावरही होतो.

अशा संघटनेत, कंपनीत, ऑफिस किंवा कार्यालयात किंवा आपल्या घरामध्ये भावनिक नातं पारदर्शक न राहता संशयी बनते. उत्साह संपुन नैराश्य येते. एकमेकांबद्दल आदर न राहता मने दूषित होतात. त्याचा उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन सगळ्यांचाच लॉस होतो.

अशा ह्या कठीण व गुंतागुंतीच्या प्रश्नावर तोडगा काढताना मला असं सांगावंसं वाटतं की नक्कीच आपण या समस्येतून सहज बाहेर निघू शकतो. फार अवघड नाहीये, पण यासाठी आपण थोडं आपल्या विचारांची व मनाची कक्षा विस्तारीत करून घेणे आवश्यक आहे. म्हणजेच आपण आपलं मन मोठं करणं जरुरीचं आहे. या मानवी जगात निसर्गाने प्रत्येकाला त्याच्या स्वभावाप्रमाणे जगण्याचा अधिकार बहाल केला आहे.

त्यानुसार प्रत्येक जण आपापल्या स्वभावानुसार त्याच्या गुणवैशिष्ट्यांसह जगत आहे. त्यात आपणही आलोच. प्रत्येकाला स्वभावाचा पॅटर्न असतो. त्या पॅटर्ननुसार तो आपल्या जीवनात जगत असतो. आपल्याला जर कोणी म्हटले की तुझा हा स्वभाव मला आवडत नाही तर आपल्याला समोरच्या व्यक्तीचा राग येतोच ना. तसंच आपल्याला न आवडणाऱ्या व्यक्तीला आपण जर असे म्हटले तर त्यालाही सहाजिकच राग येईल.

म्हणून प्रत्येक जण आपल्या स्वभावाचे किंवा व्यक्तिमत्त्वाचे मालक असतात हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आता तुम्हाला न आवडणाऱ्या व्यक्तीला डोळ्यासमोर आना. त्याच्यातील कोणते गुण किंवा स्वभाव तुम्हाला आवडत नाहीत ते आठवण्याचा प्रयत्न करा. कोणतीही व्यक्ती कोणालाही पूर्णपणे कळालेली नसते. सहवासाने व अनुभवाने थोडीफार कळेल मात्र 100 टक्के कळालेली व्यक्ती ही आपल्याला शंभर टक्के आवडेलच याची खात्री देता येत नाही.

जशी आपल्याला कोणतीही व्यक्ती 100 टक्के पर्फेक्ट वाटत नाही तसेच आपणही इतर लोकांना 100 टक्के आवडू याची खात्री देता येत नाही. कोणताही माणूस शंभर टक्के आदर्श नसतो. म्हणून तुम्हाला न आवडणारा माणूसही 100 टक्के आदर्श नाही हे तुम्हाला स्वीकारावे लागेल. कारण तुम्ही सुद्धा 100% आदर्श नाहीयेत. इथे तुम्हाला असं वाटतं की मी त्याच्या एवढा वाईट नाहीये. बरोबर आहे कारण हे आपल्याला वाटतं. हे वाटणं हे त्याला वाटलं पाहिजे.

दुसरा मुद्दा: Accept as he is or accept as she is. न पटनाऱ्या व्यक्तीशी ऍडजेस्ट करताना दुसरी पायरी म्हणजे समोरची व्यक्ती जशी आहे तशी त्याचा स्वीकार करावा. आपल्या मनाला हे खडसावून सांगा की तो माणूस जसा आहे तसाच राहणार आहे. मी त्याला बदलू शकत नाही.

कारण ते कुत्र्याचे शेपूट आहे कोणतीही नळी त्याच्या उपयोगाची नाही. जो पर्यंत तुम्ही हे स्वीकारणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा त्रास होणारच आहे. तो समोर दिसला की तुमच्या कपाळावर आठ्या उमटनार, तुमचा बीपी वाढणार आणि म्हणून स्वीकार हा यावर सर्वोत्तम उपाय आहे.

एकदाचे त्या महाशयाला तुम्ही स्वीकारले की मनात त्याचे एक काल्पनिक कार्टून बनवा. म्हणजे तो दिसला की आता त्याचा राग न येता तुम्हाला त्याचं हसू येईल व आपण आनंदी जगू. कार्टून चा स्वभाव तसा विचित्रच असतो हे आपलं मन आता स्वीकारायला लागेल.

न आवडणाऱ्या व्यक्तीला ऍडजस्ट होण्याचा अजून एक पुढील टप्पा म्हणजे एखादा छंद जोपासा: दैनंदिन जीवन शैली मध्ये आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी मध्ये मन गुंतवा जेणेकरून रिकाम्या वेळेत त्या व्यक्तीच्या ऐवजी आपल्या मनात आपण जोपासलेल्या छंदाबद्दल विचार येतील. जोपासता येण्यासारखे छंद म्हणजे व्यक्तिमत्व विकास, मेडिटेशन क्रिएटिव्ह रायटिंग, वाचन, पेंटिंग, ऑनलाइन बिजनेस वगैरे वगैरे.

हळूहळू आपण आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी एवढे बिझी होउ की त्या व्यक्तीचा विचार करायलासुद्धा आपल्याजवळ वेळ नसेल अशी परिस्थिती आपण निर्माण करू. असा एखादा छंद जोपासा की त्याचे रूपांतर कदाचित अर्निंगमध्ये बदलू शकेल. जेव्हा त्या छंदातून तुमची अर्निंग सुरू होईल तेव्हा तुमच्या पुढे पर्याय उपलब्ध होतील. तेव्हा निर्णय हा तुमच्या हातात असेल.

परिस्थिती तुमच्या नियंत्रणात असेल. परिस्थिती जोपर्यंत आपल्या हातात नसते तोपर्यंत आपण हात घाईने निर्णय घेऊ नये. त्याने आपण आर्थिक अडचणीत सापडण्याची भीती असते. आपण जर थोडा आत्मविश्वासाने घेतलं तर नक्कीच कोणाशीही ऍडजेस्ट होऊ शकतो याची खात्री बाळगा.

माणूस हा मुळातच क्रिएटिव्ह असतो त्याच्यात कोणती ना कोणती कौशल्य असतात. पण ती सुप्त अवस्थेत असतात. आपण जे काम किंवा व्यवसाय करतो त्याच्याशी रिलेटेड काही स्किल्स जर आपण जाणीवपूर्वक डेव्हलप केले किंवा त्यावर मास्टरी मिळवली की आपला आत्मविश्वास वाढतो. आणि एकदा का आत्मविश्वास वाढला की मग भल्याभल्यांना ऍडजस्ट करण्याची आपली क्षमता विकसित होते.

म्हणून मित्रांनो डोळसपणे थोडं चौफेर पहा. या कार्टून पेक्षा आपण आपले स्किल्स वाढवून त्याच कंपनीत प्रभावी ठरू शकतो व सहज प्रमोशन मिळवू शकतो. कारण एका कुशल व आत्मविश्वास व्यक्तीसाठी जगात सगळीकडे करिअरची दारही सतत उघडे असतात. आणि तसेच अशा व्यक्तीची प्रतिमा समाजात व कुटुंबात नेहमी उच्च स्थान प्राप्त करून इतरांना प्रेरणा देत असते.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.