पोटखराब क्षेत्र म्हणजे नक्की काय? ।। पोटखराब क्षेत्राचे प्रकार ।। पोटखराब क्षेत्राची लागवडीयोग्य क्षेत्रात रूपांतरित करण्याची प्रक्रिया काय असते ?

मित्रांनो आपल्याला सातबारा उतार्‍यावर पोटखराब क्षेत्र अशी नोंद पाहायला मिळते तर हे पोटखराब क्षेत्र म्हणजे नक्की काय ?कुठल्या प्रकारच्या पोटखराब क्षेत्राला शेतकरी लागवड योग्य शेतीमध्ये आणू शकतो आणि कुठल्या प्रकारच्या पोटखराब क्षेत्राला लागवडीयोग्य क्षेत्रामध्ये आणू शकत नाही हे आज आपण पाहणार आहोत.

2018 मध्ये पोटखराब संदर्भाचा खूप महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे पोटखराब क्षेत्र हे लागवडी योग्य क्षेत्र खाली आणले असेल तर सातबारा उतारा मध्ये पोट खराब क्षेत्राची लागवडी योग्य क्षेत्र अशी नोंद करता येणार आहे. तर या नोंदीचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे.

तसेच पोटखराब क्षेत्र हे लागवडीखाली आणले असून देखील सातबारा उताऱ्यावर त्याची नोंद पोटखराब क्षेत्र अशीच असेल तर शेतकऱ्याला त्यामुळे कुठले नुकसान आहे, याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत तसेच पोटखराब क्षेत्राचे लागवड योग्य क्षेत्र करण्यासंदर्भात ची माहिती टप्प्याटप्प्याने आपण आज पाहणार आहोत.

इंग्रजांनी 1919-20 मध्ये जमिनीची मोजणी केली त्यावेळेस जमिनीचा ज्यासाठी वापर करण्यात येत होता, त्याप्रमाणे त्याची सातबारावर नोंद करण्यात आली जितक्या क्षेत्रावर लागवड केली आहे ते क्षेत्र लागवडीखाली असे सातबारा उताराऱ्यात नोंदविण्यात आले. तर पोटखराब क्षेत्र म्हणजे ज्या जमिनीच्या क्षेत्रात लागवड करणे शक्य होत नाही असे लागवडीसाठी योग्य नसलेले व पडीक ठेवलेले क्षेत्र म्हणजे पोटखराब क्षेत्र होय अशा क्षेत्राची नोंदणी पोटखराब क्षेत्र अशी नोंदविण्यात येते.

पोटखराब क्षेत्र याचे दोन प्रकार पडतात. 1. पोटखराब वर्ग अ आणि 2.पोटखराब वर्ग ब. यातील 1.पोटखराब वर्ग अ: ‌ पोटखराब वर्ग अ म्हणजे खडकाळ, नाली ,खंदक आणि इत्यादीने व्याप्त असलेले क्षेत्र.‌ पोट खराब वर्ग अ खाली येणाऱ्या क्षेत्रावर महसुलाची आकारणी करण्यात आलेली नसते.‌

पोटखराब वर्ग अ खाली येणारी जमीन शेतकऱ्यास कोणत्याही लागवडी खाली आणता येऊ शकते, जरी अशी जमीन शेतकऱ्यांनी कोणत्याही लागवडीखाली आणली तरी अशी जमीन आकारणीस पात्र असणार नाही. या प्रकारा खाली येणाऱ्या क्षेत्राची आकारणी करायची असेल, तेव्हा त्याबाबतचा प्रस्ताव तहसीलदारांमार्फत

माननीय जमाबंदी आयुक्तांना सादर करून आदेश प्राप्त करावा लागतो आणि अशा आदेशानंतरच या प्रकारा खाली येणाऱ्या क्षेत्रावर आकारणी करता येते. तथापि अशा जमिनीत शेतकऱ्यांनी काही पिके घेतली असतील तर तलाठी यांना अशा पिकांची नोंद घेता येते.

२.पोटखराब वर्ग ब: सार्वजनिक प्रयोजनार्थ राखून ठेवलेली जमीन, रस्ता, मान्यपथ इत्यादीसाठी ची जमीन तसेच पिण्यासाठी किंवा घरगुती प्रयोजनासाठी वापरण्यात येणारे तलाव किंवा ओढा यांनी व्यापलेली जमीन कोणत्याही जाती जमाती कडून स्मशामभूमी किंवा दफन भूमी म्हणून वापरण्यात येणारी जमीन तसेच गावातील कुंभार, कुंभार कामासाठी अभिहस्तांतरण केलेली जमीन पोटखराब वर्ग ब या क्षेत्रात येते.

या सर्व जमिनीवर कोणत्याही प्रकारची महसूल आकारणी करण्यात येत नाही. पोटखराब वर्ग ब, हे महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 कलम 43 नुसार लागवडीखाली आणता येत नाही. मित्रांनो बरेच शेतकऱ्यांनी त्यांचे जे पोटखराब वर्ग मधील क्षेत्र होते ते क्षेत्र पोटखराब म्हणजे सुधारणा करून लागवडीखाली आणले आहे,

मात्र याची नोंद सातबारा उताऱ्यावर लागवडी योग्य क्षेत्र अशी होत नसल्यामुळे शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागते. याबाबत शेतकऱ्याचे पोटखराब क्षेत्र लागवडीखाली वर्ग करून जिल्हाधिकारी व जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडे अर्ज प्राप्त होत असतात, याबाबत शासनाकडे सादर केलेला प्रस्तावाप्रमाणे शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम 1968 मधील नियम 2(2) नियमांमध्ये बदल करून पोटखराब क्षेत्र लागवडीलायक शेतामध्ये रूपांतरित करण्यास मान्यता दिली आहे.

त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोटखराब क्षेत्र लागवडीलायक क्षेत्रामध्ये रूपांतरित केल्यानंतर त्याचे काय फायदे होतात हे पहा: पोट खराब क्षेत्राची किंमत ही लागवडीलायक क्षेत्राच्या तुलनेत खूपच कमी असते. असे क्षेत्र लागवडीखालील क्षेत्रांमध्ये रूपांतरित केल्यास त्याची किंमत वाढते,

त्या क्षेत्रावर घेण्यात येणाऱ्या पिकांचा पीक विमा काढण्यात येऊ शकतो ,पीक कर्ज मिळते ,नैसर्गिक आपत्तीत लोकांच्या होणाऱ्या नुकसानाचा मोबदला मिळू शकतो अशा जमिनीचे शासकीय कामासाठी शासनाद्वारे भूसंपादन केले गेल्यास मोबदला चांगला मिळू शकतो, खरेदी विक्रीतील मोबदला सुद्धा चांगला मिळतो.

आता आपण पाहुयात पोटखराब क्षेत्राची लागवडीयोग्य क्षेत्रात रूपांतरित करण्याची प्रक्रिया काय आहे: ती एक सोपी आणि सुटसुटीत अशी प्रक्रिया आहे त्यासाठी शेतकऱ्याने तलाठ्याकडे एक साधा अर्ज करायचा असतो, तलाठी खातेदारांसमक्ष व पंचांसमक्ष क्षेत्राची पाहणी करेल व एक नकाशा तयार करेल

आणि त्या मध्ये हे पोटखराब क्षेत्र दाखवेल आणि त्याच बरोबर रुपांतरीत केल्याचा पंचनामा देखील करेल त्याचा एक रिपोर्ट मंडळ अधिकाऱ्यांमार्फत तहसीलदारांना पाठवेल. तहसीलदार त्या प्रस्तावावर भूमिअभिलेख अधिकाऱ्यांकडून एक अभिप्राय घेतील की ही जमीन रूपांतरित करण्याजोगी आहे का,

म्हणजेच हे क्षेत्र जे आहे ते पोटखराब क्षेत्र वर्ग अ याअंतर्गत आहे का आणि त्या जमिनीला किती आकार हा बसावा यातील तांत्रिक सल्ला भूमिअभिलेख विभाग यांना देईल आणि जर काही ठिकाणी ह्या पोटखराब क्षेत्र विभागणी ची जर गरज असेल म्हणजेच पोटखराब क्षेत्र खातेदारांना मध्ये विभागले गेलेले नसेल

जर सर्व खातेदारांनी संमती दिली तर त्यांच्या समान हिस्स्याने किंवा जर गरज भासली तर याची मोजणी देखील केली जाऊ शकते आणि हा प्रस्ताव परत तहसीलदारांकडे येऊन त्याला प्रांत अधिकारी मान्यता देतील आणि अशा जमिनीला सर्वसाधारण जमीन महसूल जो आहे तो आकारला जाईल आणि अशी जमीन लागवडीयोग्य जमिनीत समाविष्ट केली जाईल

आणि तशा प्रकारचे बदल सातबारा उतार्‍यावर देखील केले जातील. तर अशा पद्धतीने पोटखराब क्षेत्र लागवड क्षेत्रात रूपांतरित करून शेतकरी आपले लागवडीयोग्य क्षेत्र वाढवू शकतात ,आपल्या जमिनीची किंमत वाढू शकतात आणि त्याच प्रमाणे पोटखराब क्षेत्राचे लागवडी युक्त क्षेत्रात रूपांतरित करून शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ देखील घेऊ शकतात.

1 thought on “पोटखराब क्षेत्र म्हणजे नक्की काय? ।। पोटखराब क्षेत्राचे प्रकार ।। पोटखराब क्षेत्राची लागवडीयोग्य क्षेत्रात रूपांतरित करण्याची प्रक्रिया काय असते ?”

  1. Deepak Balasaheb Makar

    आम्ही सगळा पोटखराब जमीन विकून टाकली आहे त्या जागी लोकांनी घरे बांधून राहत आहेत तरीही ते क्षेत्र लागवडी साठी योग्य क्षेत्र म्हणून करता येईल का

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *