वाटपपत्र म्हणजे नेमके काय? ।। तहसीलदाराने चुकीचा निर्णय दिल्यास काय करावे?।। खरेदीखताशिवाय झालेला फेरफार रद्द करता येईल का?।। एखाद्या फेरफार मध्ये बदल करता येतो का?।। 99 वर्षाच्या कराराची सातबारा वरती नोंद करता येईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

प्रश्न 1:-वाटपपत्र म्हणजे नेमके काय?: उत्तर:- जेव्हा एखादी मालमत्ता ही संयुक्त मालकीची किंवा वडिलोपार्जित मालकीचे असते तेव्हा त्या मालमत्तेमध्ये एकापेक्षा अधिक व्यक्तींचा विभाजित किंवा अविभाजित हक्क आणि हिस्सा हा निश्चितपणे असतो.

सहाजिकच अशा मालमत्तेबाबत या मालमत्तेचे सगळ्या हिस्सेदारांना जर आपला हक्क हिस्सा किंवा क्षेत्रफळ स्वतंत्र करून हवा असेल तर आपला हिस्सा मिळवण्यासाठी आपल्याला त्या मालमत्तेची वाटणी करण्याची आवश्यकता भासते. या मालमत्तेची वाटणी करण्याकरता जो सर्वात सोपा मार्ग आहे तो म्हणजे त्या मालमत्तेची नोंदणी पत्र किंवा वाटप पत्र बनविणे.

वाटप पत्र म्हणजे असा दस्त किंवा असा करार ज्या योगे एखाद्या मालमत्तेचे त्या मालमत्तेच्या सह हिस्सेदारांमध्ये त्यांच्या हक्क किंवा हिस्स्याच्या प्रमाणामध्ये किंवा ते सहसा ठरवतील त्याप्रमाणे वाटणी होते. या वाटप पत्रामुळे असे होते कि जे मालमत्तेचे सहहिस्सेदार आहेत त्यांचा हक्क, हिस्सा आणि क्षेत्रफळ किती आहे याची माहिती होते.

त्याच प्रमाणे प्रत्येक सहहिस्सेदाराचा हक्क आणि क्षेत्रफळ वाटपपत्र नुसार ठरल्यामुळे त्याबद्दल वाद उद्भवण्याची शक्यता राहत नाही. तसेच प्रत्येक सहहिस्सेदार आपल्या मालकीच्या हिस्स्याचा निर्णय घेण्यासाठी मोकळा होतो. थोडक्यात एखाद्या मालमत्तेचा त्याच्या सह हिस्सेदारांमध्ये वाटप करण्याकरिता जो दस्त केला जातो त्याला वाटणीपत्र असे म्हणतात.

प्रश्न 2:- तहसीलदाराने चुकीचा निर्णय दिल्यास काय करावे? उत्तर:- तहसीलदार किंवा कोणताही अधिकारी जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या विरोधात निर्णय देतो तेव्हा त्या व्यक्तीला त्या निकालाविरोधात अपील करण्याचा कायदेशीर हक्क आपल्या न्यायव्यवस्थेत दिलेला आहे.

सहाजिकच जर एखादा निर्णय चुकीचा आहे असे आपल्याला वाटत असेल किंवा एखादा निर्णय योग्य नाही त्याला आव्हान दिले पाहिजे असे आपल्याला वाटत असेल तर त्या निर्णयाविरोधात आपण अपील प्राधिकरणामध्ये, अपील न्यायालयामध्ये किंवा अपील अधिकार्‍याकडे अपील दाखल करू शकतो.

ते अपील दाखल केल्यानंतर एकंदर सर्व प्रकरणाच्या गुणवत्तेनुसार खालचा निकाल कायम राहिल किंवा तो निकाल ठेवला जाऊन नवीन निर्णय देणे किंवा एखाद्या प्रकरणाची फेरसुनावणी करण्याकरता ते प्रकरण पुन्हा खालच्या अधिकाऱ्याकडे पाठवणे यापैकी एखादी गोष्ट अपिलामध्ये होऊ शकते. थोडक्यात काय एखादा निर्णय आपल्याला मान्य नसेल तर त्याच्या विरोधात अपील करण्याचा अधिकार आपल्याला आहे आणि आपण आवश्यकतेनुसार त्या अधिकाराचा निश्चितपणे वापर करू शकतो.

प्रश्न 3:- खरेदीखताशिवाय झालेला फेरफार रद्द करता येईल का? उत्तर:- निश्चितपणे रद्द करता येईल. महसुली अभिलेख आणि नोंदणीकृत करार या दोन्ही पूर्णतः भिन्न बाबी आहेत. मात्र कोणत्याही नोंदणीकृत किंवा वैध्य कराराची वसुली अभिलेखा मध्ये नोंद करणे अत्यंत आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे कोणत्याही अशा वैध्य कराराची अभिलेखा मध्ये अशी नोंद करण्यात आली तर ते अयोग्य किंवा अवैध आहे असे म्हणता येणार नाही. सहाजिकच त्या नोंदी ला आव्हान देऊन ती नोंद रद्द करून घेणे निश्चितच शक्य आहे. मात्र त्याकरता आपल्याला ज्या फेरफाराला आव्हान द्यायचे आहे त्याचे प्रांत अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करणे आवश्यक आहे.

एखादा फेरफार मग तो कितीही चुकीचा किंवा अवैध्य किंवा बेकायदेशीर असला तरी तसा नुसता आरोप करून काही होत नाही, तर त्याच्या विरोधात आपल्याला सक्षम अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करून फेरफार नोंद रद्द करून घेणे आवश्यक असतं.

आपण अपील दाखल केलं आणि गुणवत्तेनुसार आपल्या प्रकरणाची आपण बाजू सिद्ध करू शकलो जी अशा बाबतीत सिद्ध होणे हे निश्चितपणे शक्य आहे तर जसा अवैदध्य किंवा चुकीचा फेरफार करण्यात आला आहे तो फेरफार निश्चितपणे रद्द करून घेता येईल.

प्रश्न 4:- एखाद्या फेरफार मध्ये बदल करता येतो का? उत्तर:-फेरफारमध्ये बद्दल किंवा कोणत्याही महसूल अभिलेखा मध्ये बदल हे मुख्यतः दोन प्रकारे असु शकततात. एक आहे ते म्हणजे त्या नोंदीमध्ये काहीतरी तांत्रिक चूक झालेली आहे, जसे की शेत्रफळ चुकले आहे, नाव चुकले आहे.

असं काही जर असेल तर ती चूक दुरुस्त करण्याकरिता आपण जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांकडे किंवा त्या अधिकाऱ्याने नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्याकडे अर्ज करू शकतो आणि त्या अर्जानुसार सुनावणीनंतर महसूल अभिलेखात किंवा फेरफार नोंद हे दुरुस्त होऊ शकते.

दुसरी चूक आहे म्हणजे कायदेशीर चूक. आपण मागच्या प्रश्नामध्ये बघितलं की खरेदीखत शिवाय समजा फेरफार नोंदवला गेला किंवा वारस नोंदी मध्ये काही वारसांना वगळले गेले अशी काही पण कायदेशीर चूक झाली असेल तर त्याकरता मात्र अशी तक्रार करून उपयोग नाही.

तर त्याच्या विरोधात आपल्याला महसुली आणि दिवाणी न्यायालयामध्ये अपील दावा दाखल करून ती चूक आहे ती रद्द करून घ्यावी लागेल किंवा ती चुकीची नोंद आहे ती रद्द करून घ्यावी लागेल. कायदेशीर चुकीची दुरुस्ती करता अपील किंवा दावा दाखल करणे हा एकच मार्ग आहे.

कायदेशीर चुकीची दुरुस्ती ही केवळ अर्ज करून करता येणार नाही. त्यामुळे एखाद्या फेरफारमध्ये नक्की काय चुकलं आहे ?ती चूक कशा स्वरूपाची आहे? हे आधी आपण लक्षात घेतल पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण कुठलीही कारवाई करणे योग्य ठरेल त्या कारवाईला आपण सुरुवात केली पाहिजे.

प्रश्न 5:- 99 वर्षाच्या कराराची सातबारा वरती नोंद करता येईल का? उत्तर:- जेव्हा 99 वर्षाचा करार केला जातो किंवा मग तो कोणत्याही स्वरूपाचा असेल त्या योग्य त्या मालमत्तेमध्ये कोणतेही हक्क निर्माण झालेले असले तरीही त्या मालमत्तेचा प्रत्यक्ष हस्तांतरण होत नाही.

उदाहरणार्थ एखादी जागा भाडेतत्त्वावर दिलेली असेल तरीसुद्धा त्या जागेची मालकी जी आहे ते त्याच मालकाकडे कायम राहते. अशा करांमध्ये जर काही अनामत रक्कम जर आपण दिलेली असेल तर तेवढ्या रकमेचा बोजा आपण त्या जमिनीच्या सातबारा वर टाकू शकतो किंवा इतर अधिकारांमध्ये अशा बोजा ची नोंद करू शकतो.

तसा जर बोजा किंवा अनामत रक्कम आपण दिली नसेल तर केवळ भाडेकरार याची सातबारावर नोंद घेणे हे कठीण आहे. एखादी रक्कम जर आपण दिलेली असेल तर त्याचा बोजा आपल्याला सातबारावर टाकता येईल, पण केवळ साठे करार केलेला आहे पण रक्कम काही दिलेली नाही

किंवा फक्त भाडेकरार केलेला आहे पण त्याची अनामत रक्कम दिलेली नाही अशा परिस्थितीमध्ये सातबारा वरती त्या करायची नोंद घेता येण हे काहीशी कठीण आहे. थोडक्यात काय तर जेव्हा एखाद्या सातबारावर आपण आर्थिक बोजा टाकण्याची आपली क्षमता असेल तर आपण त्या कराराची नोंद त्या जमिनीचा सातबारा वर करून घेऊ शकतो. अन्यथा अशी नोंद घेणे काहीसे कठीण आहे.

सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

5 thoughts on “वाटपपत्र म्हणजे नेमके काय? ।। तहसीलदाराने चुकीचा निर्णय दिल्यास काय करावे?।। खरेदीखताशिवाय झालेला फेरफार रद्द करता येईल का?।। एखाद्या फेरफार मध्ये बदल करता येतो का?।। 99 वर्षाच्या कराराची सातबारा वरती नोंद करता येईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

  1. अंकुश रामभाऊ निकम.मुपो.सय्यद‌ पिंपरी तालुका.जिल्हा नाशिक.पिन.न(.४२२००३) says:

    अंकुश रामभाऊ निकम व आमचे चुलत भाऊ तर आमच्या मध्ये असे ठरले आहे की आम्ही गट.(१०२९)हा गट क्रमांक माझा आहे व चुलत भाऊ यांचा गट न.(१०००) आहे तर आम्ही दोघांनी आप आपसात मोबदला करावयाचा म्हणजे वरील पैकी गट नंबर (१०२९)हा त्यांच्या नावावर व गट नंबर (१०००)हा माझ्या नावांवर करावयाचा आहे तर आम्हाला माहिती द्यावी
    ………. अंकुश रामभाऊ निकम

  2. आमची जमीन आजोबा च्या नावाने आहे आणि ती आता माझ्या आईच्या नावे करायची आहे म्हणजे सुनेच्या नावे करायची आहे तर काय करावे लागेल वाटणी पत्र का बक्षिस पत्र किंवा खरेदी करून
    घ्यावी

  3. माझ्या आजोंबांची जमीन होती. ती आम्हाला गेली २३ वर्ष माहित नव्हतो. माझ्या आजोबांच्या भावाने ती जमीन त्याच्या नाव केली आहे पण त्यात माझ्या वडिलांचे नाव आहे . मी माज्या आजोबांच्या भावाचे नाव काढू शकतो का ?

    1. तुमच्या वडिलांच्या नंतर आत्ता तुम्ही तुमची नावे देखील 7/12 वर लावून घ्या. तुम्ही तुमच्या आजोबांच्या भावाचे नाव काढू शकत नाहीत कारण ते सह हिस्सेदार आहेत.

  4. आमच्या वडिलोपाजित मिळकती मध्ये 7/12 वरती नामंजूर फेरफार आहे परंतु त्यांची अंमलबजावणी 7/12 दप्तरी तसीच आहे तर या नामंजूर फेरफारची अंमलबजावणी स्थगित करण्यासाठी काय करावे लागेल.

Comments are closed.