सर्वे नंबर / गट क्रमांक / भूमापन क्रमांक / खासरा क्रमांक यांच्यातील फरक काय? ।। जमीन मोजणीचा यांच्याशी संबंध काय? याबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणून घ्या !

शेती शैक्षणिक

अनेकदा कागदपत्रात आपण सर्वे नंबर, गट नंबर, भूमापन क्रमांक असा उल्लेख वाचतो. वस्तुतः सर्वे नंबर, गट नंबर, भूमापन क्रमांक या संज्ञांचा वापर विशिष्ट योजना दरम्यान केला गेला आहे. त्यामुळे त्या त्या विशिष्ट योजनांचा उल्लेख करताना त्या त्या विशिष्ट संज्ञेचा वापर करणे अपेक्षित आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.

1.बंदोबस्त योजने दरम्यान: सर्वे नंबर खसरा क्रमांक (नागपुर भागात)(स.न.) या संज्ञांचा वापर करण्यात आला आहे. 2.पुनर्मोजणी योजने दरम्यान: भूमापन क्रमांक(भू. क्र.) या संज्ञांचा वापर करण्यात आला आहे. 3.एकत्रीकरण योजने दरम्यान: गट नंबर(ग.न.)या संज्ञेचा वापर करण्यात आला आहे.

तर मित्रांनो या तीन योजना आहेत, यामधील फरक काय आहे आणि याचा अर्थ काय होतो? त्याचा गाव सर्वे नंबर चा किंवा गट नंबरचा जो नकाशा असतो,यावर काय परिणाम पडतो त्याची काय व्याखा आहे हे आपण पाहू या. 1.बंदोबस्त योजना: महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 प्रकरण-6 मधील कलम 90 ते 107 मध्ये जमा बंदी बाबत तरतूद आहे.

जी कार्यपद्धती अवलंबून जमाबंदी अधिकारी जमीन महसुलाची रक्कम ठरवितो तिला जमाबंदी म्हणतात. कलम 93 अन्वये जमाबंदी ची मुदत 30 वर्षे असते. त्यानंतर पुन्हा जमाबंदी अपेक्षित असते. इंग्रजांच्या काळामध्ये राबविण्यात आलेली बंदोबस्त योजना अथवा करण्यात आलेली जमाबंदी,तत्कालीन इंग्रज सरकारच्या कायद्यानुसार पार पाडण्यात आली होती.

पहिली रिविजन सेटलमेंट 1889 ला, तर दुसरी रिविजन सेटलमेंट नागपूर मध्ये साधारणता 1910 ते 1920 दरम्यान राबविण्यात आली. या बंदोबस्त योजने दरम्यान प्रत्यक्ष जागेवर जाऊन ऑफसेट,शंकू,साखळी द्वारे शेतजमिनीची मोजणी करण्यात आली, त्याच प्रमाणे जमिनीचा सारा,आकार, जमा निश्चित करण्यात आला

व त्या अनुषंगाने अभिलेख नकाशे,आकार, बंद, बंदोबस्त मिसळ, जीवन,पी 1,पी 2,पी 9 वगैरे तयार करण्यात आले. बंदोबस्त नकाशे 16 इंचास एक मैल(1:4000) या परिमाणात आहेत. बंदोबस्त योजनेमध्ये प्रत्यक्ष सविस्तर मोजणी सोबतच शेत जमिनीचे क्षेत्रफळ व मालकी हक्काबाबत चौकशी करण्यात आली. त्यामुळे या योजनेमध्ये क्षेत्र नकाशा नावांमध्ये चूक झाल्याबाबत तक्रारी नगण्य आहेत.

1.1 बंदोबस्त नकाशा: बंदोबस्त नकाशा हे सन 1910 च्या आसपास राबविलेल्या बंदोबस्त योजने दरम्यान तयार करण्यात आलेले नकाशे होत. हे नकाशे 16 इंचास 1मैल या परिमाणात तयार करण्यात आले आहेत. ज्या गावांमध्ये अद्यापही बंदोबस्त योजना प्रचलित आहे तेथे बंदोबस्त नकाशाचे चार पट करून मोजण्याची कार्यवाही केली जाते.

बंदोबस्त नकाशातील शेताच्या दर्शक क्रमांक, सर्वे नंबर (नागपूर भागात )(खसरा क्रमांक) असे म्हणतात. याचा असा अर्थ होतो मित्रांनो की सातबारावरील सर्वे नंबर किंवा खसरा क्रमांक( जर नागपूर भागात असेल तर) हा तुमच्या पूर्वजांपासून चालत आलेला आहे,जुना कोणताही सातबारा जर काढला तर त्यावर एक सर्वे नंबर असेल किंवा खसरा क्रमांक असेल.

तुमची जमिनीची मोजणी जी कोणती होईल, ते सर्वे नंबर किंवा खसरा क्रमांक याच्या आधारावर होणार आहे.त्याचे परिणाम जे दिले आहे ते आहे 1:4000.असे नकाशे दिले आहेत. भरपूर जुने नकाशे काढायचे असतील तर पुण्याच्या अभिलेख ऑफिस मधून तुम्हाला ते मिळू शकतात.

2.पुनर्मोजणी योजना: महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 प्रकरण-5 मधील कलम 79 अन्वये पुनर्मोजणी योजना राबवली जाते. इंग्रजांच्या काळात राबविण्यात आलेल्या बंदोबस्त योजनेनंतर राज्यात बंदोबस्त योजना जमाबंदी राबविण्यात आलेली नाही. शासनाने सन 1975 च्या आसपास बंदोबस्त योजने ऐवजी पुनर्मोजणी योजना राबविण्याचे प्रयत्न झाले होते.

पुनर्मोजणी योजने मध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन संबंधित शेतकरी त्याच्या शेतीची वहिवाट दाखवेल त्याचप्रमाणे मोजण्याची कार्यवाही करण्यात आली.परंतु पुनर्मोजणी योजनेमध्ये जमिनीचा सारा/आकार नव्याने निश्चित करण्यात आला नाही,तसेच जमिनीच्या मालकी हक्क व क्षेत्रफळ याबाबतही चौकशी करण्यात आली नाही.

धारकांची नाव जुन्या योजनेतील अभिलेखावरूनच कायम करण्यात आले,त्यामुळे या योजनेमध्ये बर्‍याच चुका झाल्याच्या तक्रारी आहेत. पुनर्मोजणी योजने दरम्यान तयार झालेला अभिलेख म्हणजे आकारबंद गुणाकार, बुक, पुरवणी आकारफोड पत्रक,सविस्तर मोजणी नकाशे,ग्राम नकाशे ही आहेत.

पुनर्मोजणी योजनेमधील सविस्तर मोजणी नकाशे 1:1000 या परिमाणात, गाव नकाशे 1:5000 या परिमाणात आहेत. राज्यात पुनर्मोजणी योजना 1975 ते 1995 पर्यंत सुरू होती,याच दरम्यान शासनाने एकत्रीकरण योजना राबविण्यास सुरुवात केल्यामुळे पुनर्मोजणी योजना व एकत्रीकरण योजना ओव्हरलॅप झाली,

त्यामुळे एकच तालुक्यातील काही गावांमध्ये पुन्हा पुनर्मोजणी योजना तर काही गावांमध्ये एकत्रीकरण योजना प्रचलित आहे तर काही गावांमध्ये दोन्हीपैकी कोणतीही योजना नसल्यामुळे बंदोबस्त योजनाच असल्याचे दिसून येते. 2.1पुनर्मोजणी नकाशा: पुनर्मोजणी नकाशा सविस्तर मोजणी शीट (पी. टी. शीट) प्लेन टेबल शीट: हे 1:1000 या परिमाणात असून प्रत्यक्ष जागेवर जाऊन खातेदाराने दाखविल्याप्रमाणे वहिवाटीप्रमाणे मोजणी करून तयार केलेले नकाशे आहेत.

ज्या गावात पुनर्मोजणी योजना प्रचलित आहे तेथे पुनर्मोजणी नकाशांच्या आधारित मोजण्याची कार्यवाही केली जाते. पुनर्मोजणी ग्राम नकाशे मात्र 1:5000 या परिमाणात आहेत. सविस्तर मोजणी शिटला 1/5 या प्रमाणात कमी करून ग्राम नकाशे तयार केलेले आहेत.सविस्तर मोजणी शीट उपलब्ध नसल्यास ग्राम नकाशा मधील विशिष्ट भूमापन क्रमांकाच्या नकाशा ला पाचपट करून मोजणी ची कार्यवाही केली जाऊ शकते. पुनर्मोजणी योजनेमधील शेताच्या दर्शक क्रमांकाला भूमापन क्रमांक असे म्हणतात.

३.एकत्रीकरण योजना: देशाची वाढती लोकसंख्या,वारसहक्क कायदे, खरेदी-विक्री व्यवहार इत्यादी कारणांमुळे जमिनींचे लहान लहान तुकडे पडले. अशा लहान तुकड्यांवर शेती करून उत्पादन घेणे शक्‍य होत नव्हते. त्यामुळे हजारो हेक्टर जमीन पडीत राहू लागली. या तुकड्यांचे एकत्रीकरण करून जमिनीची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण कायदा 1947 अस्तित्वात आला.

या कायद्यानुसार प्रत्येक विभाग,जिल्हा, तालुका येथील स्थानिक परिस्थिती, जमिनीचा प्रकार, पीक पद्धती, सिंचन पद्धती इत्यादी लक्षात घेऊन प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्यात आले. एकत्रीकरण योजना राबविताना प्रत्यक्ष जागेवर जाऊन प्रत्येक शेतजमिनीची मोजणी करण्यात आली. फक्त ज्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त जमिनीचे एकत्रीकरण करण्यात आले अशा जमिनींची प्रत्यक्ष मोजणी करण्यात आली.

एकत्रीकरण योजनेदरम्यान तयार झालेला अभिलेख म्हणजे एकत्रीकरण पत्रक 9(1) आणि 9(2) चे नकाशे आणि आकार बंद हे आहेत.एकत्रीकरण योजनेतील नकाशे 1:5000 या परिमाणात तयार केलेले आहेत. त्यामुळे त्या आधारे मोजणी करताना नकाशाला पाचपट करून प्रत्यक्ष जागेवर मोजणी करावी लागते.

3.1 एकत्रीकरण नकाशा: एकत्रीकरण नकाशा हे 1:5000 या परिमाणात असतात.या नकाशांमध्ये 9(1) आणि 9(2) असे दोन प्रकार असतात. 9(1),9(2) हे मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण नियम 1959 मधील नियम क्रमांक आहेत. 9(1) चा नकाशा म्हणजे एकत्रीकरण पूर्वीचा नकाशा आणि 9(2) चा नकाशा म्हणजे एकत्रीकरण यानंतरचा नकाशा.

कार्यालयात हे दोन्ही नकाशे एकाच पत्रकावर एकमेकांवर ओव्हर लॅप झालेले असतात यावर काळ्या शाईने असलेले शेत नंबर, दर्शक क्रमांक एकत्रीकरण योजने पूर्वीचा तर लाल शाईने असलेले शेत नंबर,दर्शक क्रमांक एकत्रीकरण योजनेत दिलेला गट नंबर असतो.

एकत्रीकरण योजनेत पूर्वीच्या दोन किंवा अधिक सर्वे नंबर भूमापन क्रमांकांचे एकत्रीकरण करून एकत्रीकरण योजनेमध्ये एकच गट क्रमांक तयार झाला असल्यास अशी दुरुस्ती नकाशावर लाल शाईने केलेली असते. ज्या गावात एकत्रीकरण योजना प्रचलित आहे तेथे एकत्रीकरण नकाशांच्या पाचपट करून मोजणी ची कार्यवाही केली जाते.

एकत्रीकरण योजने पूर्वीचा पुनर्मोजणी योजनेमधील विशिष्ट शेताचा नकाशा कोणताही बदल न होता एकत्रीकरण योजनेनंतर येत असल्यास पुनर्मोजणी योजनेमधील सविस्तर मोजणी नकाशा च्या आधारे मोजण्याची कार्यवाही करणे अपेक्षित आहे. कारण एकत्रीकरण योजनेमधील 1:5000 या परिमाणात असलेला नकाशा पाचपट करण्यामध्ये चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकत्रीकरण योजनेतील ग्राम नकाशा सुद्धा 1:5000 या परिमाणात असतो. एकत्रीकरण योजनेमधील शेताच्या दर्शक क्रमांकास गटनंबर असे म्हणतात. या माहितीवरून तुमचे बऱ्याचशा शंकांचे निरसन झाले असेल, परंतु तरीही तोंडी सांगायचे झाल्यास सर्वे नंबर किंवा खसरा नंबर हा इंग्रजांच्या काळापासूनचा दर्शक क्रमांक आहे.

त्यानंतरही एकत्रीकरण योजना यामध्ये गट क्रमांक आणि भूमापन क्रमांक या योजना आलेल्या आहेत. तुम्हाला जर जमिनीची मोजणी करायची असेल तर सर्वप्रथम सर्वे नंबर नुसार मोजणी करावी लागेल. त्यानंतर त्याच्या मध्ये एकत्रीकरण योजनेमधील गट नंबर किंवा सर्वे नंबर एकत्र झालेले असतील किंवा तुमचे भूमापन क्रमांक एका सर्वे नंबर वरून 4-5 झालेले असतील अशा प्रकारे या योजनांचा क्रम आहे.

सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “सर्वे नंबर / गट क्रमांक / भूमापन क्रमांक / खासरा क्रमांक यांच्यातील फरक काय? ।। जमीन मोजणीचा यांच्याशी संबंध काय? याबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणून घ्या !

  1. सखोल आणि परिपूर्ण मार्गदर्शन आपण केले आहे. शेतकऱ्यांना हि माहिती उपयुक्त ठरेल.

    विचारणा:
    पॅराग्राफ 1.1 च्या शेवटी आपण सांगितले आहे कि, खूप जुने नकाशे पाहिजे असतील तर ते पुण्याच्या अभिलेख कार्यालयातून नकाशे मिळतील. त्या कार्यालयाचे पूर्ण नाव समजू शकेल का ?
    तसेच महाराष्ट्रातील कोण कोणत्या जिल्याचे नकाशे पुणे अभिलेख कार्यालयात मिळतील ?

    भूषण वारद
    मो.9403013378

Comments are closed.