नितांतसुंदर, तरीही गूढ वर्तुळांची चित्र काढतं कोण? जाणून घ्या

नितांतसुंदर, तरीही गूढ वर्तुळांची चित्र काढतं कोण? जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

निसर्ग हा स्वतः एक चित्रकार आहे याचा प्रत्यय आपण नेहमीच घेत असतो. निसर्गातील प्रत्येक घटक, जसं झाडे, पानं, फुलं, फांद्या, इत्यादींचे विविध आकार, रंग आणि पोत, हे सगळंच अचंबित करणारे आहे. त्याला किनार लाभते छाया-प्रकाशाच्या खेळाची. कधी सूर्याची सोनेरी किरणे झाडा-पानांमध्ये लपंडाव खेळतात, तर कधी चंद्र प्रकाशाची शीतलता स्थिर पाण्यातून पाझरते. त्याचं सूर्याची किरणे वाळवंटात मात्र उष्ण लहरी निर्माण करतात आणि रात्रीच्या अंधारात हलणाऱ्या सावल्यांचा खेळ भीती निर्माण करतो.

निसर्गाच्या विविध अंगांनी, त्यातील चमत्कृतीपूर्ण विभ्रमांनी आपण विस्मयचकित होऊन जातो आणि त्याच्या विराट रुपापुढे नतमस्तक होतो. निसर्गातील अशाच एका चमत्कृतीपूर्ण आकारांचा धांडोळा घेऊया.

क्राॅप सर्कल, अर्थात शेतांमध्ये गूढपणे अवतीर्ण होणारे गोल आकार. बऱ्याच वर्षांपूर्वी जगातील विविध देशांमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये काही विचित्र आकार सापडू लागले. ते अधिक करून गोलाकार होते म्हणून त्यांना ‘क्राॅप सर्कल’ हे नांव प्रचलित झाले. ते गोलाकार शेतांमध्ये रात्री तयार होत असावेत, कारण बऱ्याच शेतकऱ्यांना ते आदल्या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत दिसले नव्हते. सुरुवातीला ही क्राॅप सर्कल युनायटेड किंगडममध्ये अधिक प्रमाणात दिसत होती, परंतु नंतर मात्र इतर काही देशांमध्ये देखील ती दिसू लागली. शेतांमध्ये गूढपणे दिसणाऱ्या ह्या विचित्र आकारांमुळे लोकांमध्ये गोंधळ, संशय आणि संभ्रम निर्माण झाला. क्राॅप सर्कलच्या रहस्याने असंख्य पुस्तके, ब्लॉग, संशोधक आणि अगदी हॉलीवूड चित्रपटांना देखील प्रेरणा मिळाली आहे.

अनेक दशकांपासून अभ्यास करूनही, एक प्रश्न मात्र अनुत्तरित आहे; क्राॅप सर्कल कोण बनवत आहे?

खूप वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातील टुली या गावातील एका शेतकऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याने एक उडणारी तबकडी दलदलीच्या भागातून उडताना पाहिली. जेव्हा तो तपासासाठी गेला तेव्हा त्याला गवताचा ढोबळ गोलाकार भाग दिसला. मुळातच उडत्या तबकड्या आणि परग्रहावरील माणसं हा अनेकांच्या आवडीचा विषय आहे, त्यात या शेतकऱ्याने तबकडी सदृश काहीतरी उडताना पाहिलं. पोलीस तपासात मात्र त्याची ही कहाणी खोटी ठरली.

आधुनिक युगातील क्राॅप सर्कल

खरं सांगायचं तर ज्याची दखल घ्यावी लागेल अशी क्राॅप सर्कल १९७० पर्यंत दिसली नाहीत. आधी युरोपमधील काही गावांमध्ये वर्तुळं दिसू लागली, आणि १९८० ते १९९० च्या दशकात त्यांची संख्या आकस्मिकरित्या वाढली. जेव्हा कठीण गणितीय समीकरणे दर्शविणारी अधिक मोठी आणि पसरट वर्तुळं सापडू लागली, तेव्हा त्या वर्तुळांची चर्चा सर्वसामान्यांपासून समाजाच्या अनेक स्तरांपर्यंत होऊ लागली.

जुलै १९९६ मध्ये जगातील सर्वात जटिल आणि नेत्रदीपक क्राॅप सर्कलपैकी एक इंग्लंडमध्ये, विल्टशायर गावातील जगप्रसिद्ध स्टोनहेंज स्मारकापासून बरेच अंतर व्यापून दिसू लागले. ज्युलिया सेट नावाचा तो फ्रॅक्टल पॅटर्न किंवा गुंतागुंतीचा भूमितीय आकार होता. त्यात काही साधी किंवा ओबडधोबड वर्तुळे होती, जी एखाद्या विचित्र हवामान बदलाच्या परिणामांमुळे झाली असावीत असं म्हणतात. परंतु त्यातील गुंतागुंतीचा भूमितीय आकार मात्र निःसंशयपणे एखाद्या बुद्धिवान माणसाचं काम असावं. प्रश्न एवढाच होता की ती बुद्धिमत्ता पृथ्वीवरील माणसाची आहे की एक्स्ट्रा-टेरेस्ट्रियल, किंवा परग्रहावरील.

ती क्राॅप सर्कल दिवसा दिसल्यामुळे अधिकच रहस्यमय बनली. कारण तोपर्यंत कोणतीही क्राॅप सर्कल दिवसा दिसली नव्हती. नंतर मात्र असे आढळून आले की त्या दिवशीच्या पहाटे लोकांची थट्टा करण्याच्या हेतूने तीन जणांनी ती हाताने काढली होती, आणि दुसर्‍या दिवशी दुपारी एका विमानातून ती दिसली.

क्राॅप सर्कल ही परग्रहावरील एलियन्सची कलाकारी आहे असं मानणारे बरेच लोक आहेत. त्यांच्या मते एलियन हे वर्तुळाकार स्वतः स्पेसशिपमधून बनवतात, ज्यासाठी ते अंतराळातील अदृश्य ऊर्जेचा वापर करतात. इतरांचा मात्र असा विश्वास आहे की हा संपूर्णपणे मानवी आविष्कार आहे, आणि लोकांची थट्टा करण्याच्या हेतूने काही लोकांनी ती काढली आहेत. तरीदेखील काही क्राॅप सर्कल अशी आहेत, ज्यांचं स्पष्टीकरण विज्ञानाला देखील देता येत नाही.

क्राॅप सर्कलबद्दल काही बाबी ठळकपणे समोर येतात.

काही अपवादात्मक क्राॅप सर्कल सोडली तर, जवळपास सर्व क्राॅप सर्कल एकाच प्रकारची असतात. क्रॉप सर्कल नावाप्रमाणेच, जवळजवळ नेहमीच वर्तुळाकार असतात – जरी काही रचनांमध्ये सरळ किंवा वक्र रेषा असल्या, तरी क्वचितच त्रिकोण, आयत किंवा चौरस आकार दिसून येतो. कदाचित हेदेखील शक्य आहे, की जे लोक
थट्टा करण्याच्या हेतूने अशी वर्तुळं काढतात, त्यांच्यासाठी वर्तुळ काढणं अधिक सोपं असेल.

बहुतेक क्राॅप सर्कल दिवसा निदर्शनास येतात. रात्रीच्या अंधारात सर्वांच्या नजरा चुकवून आणि भरघोस वाढलेल्या पिकांमध्ये लपून अशी वर्तुळं काढणं सोपं जात असेल. त्याचमुळे क्राॅप सर्कल काढताना प्रत्यक्ष कुणीच पाहिलेलं नाही आणि ती काढत असतानां कुणाचा फोटो देखील काढू शकलेलं नाही.

क्रॉप सर्कल कशामुळे निर्माण होतात याबद्दल अनेक सिद्धांत आहेत, जसं की परग्रहवासीयांची कलाकारी, रहस्यमय भोवरे, विचित्र हवामान बदलांचा परिणाम इत्यादी. परंतु त्या सर्वांमध्ये एक महत्त्वाचा घटक दिसत नाही; ठोस पुरावा. क्रॉप सर्कलचे एकमेव ज्ञात कारण म्हणजे मानव. कदाचित एके दिवशी क्रॉप सर्कलसाठी एक गूढ, अज्ञात स्त्रोत शोधला जाईल, पण तोपर्यंत त्याचे गूढ न उलगडणारे कोडे आहे एव्हढं मात्र नक्की.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा

Team News Feed

अशाच माहितीसाठी आपल्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा !

error: Content is protected !!