ऐकावं ते नवलच ! हाँगकाँगमध्ये प्राणी पाळायचा आहे ? करावा लागेल प्रायव्हेट जेटचा खर्च
कुणाचं नशीब कधी उघडेल सांगता येत नाही. म्हणतात ना नशिबाने साथ दिली तर माणूस राजाचा रंकही होऊ शकतो किंवा रंकाचा राजा. अनेकदा काही घटना अशा घडतात की त्याच्याशी संबंधित नसलेल्या व्यक्तींनाही त्याचा फायदा मिळतो. सध्या अशीच काहीशी गत हाँगकाँगमधील पाळीव श्वानांचीही झाली आहे. प्राणीप्रेमींचं प्राणीप्रेम जगविख्यात आहे. अनेक पालक आपल्या प्राण्यांना स्वत:च्या मुलांप्रमाणे सांभाळताना दिसतात.
हाँगकाँगमध्येही सध्या प्राणीप्रेमाचा वेगळाच अध्याय रंगताना दिसून येत आहे. करोनाकाळात बरेचसे लोक हाँगकाँगमधून जपान, सिंगापूर, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशात निघून गेले. पण जीव वाचवण्यासाठी जाताना या लोकांनी आपले पाळीव प्राणी मात्र हाँगकाँगमध्येच ठेवले. आता करोनाचा कहर जगभरात कमी होत असला तरी हाँगकाँगमधील या पाळीव प्राण्यांच्या मालकांना मात्र वेगळीच चिंता सतावते आहे.
याला कारण आहेत हाँगकाँगमधील क्वारंटाईनबाबत असलेले कठोर नियम. परदेशातून हाँगकाँगमध्ये आलेल्या प्रवाशांना 21 दिवसांसाठी महागड्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन व्हावं लागतं. या प्रवाशांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी त्यांना कंपलसरी क्वारंटाईन व्हावंच लागतं. हा सगळा खर्च अर्थातच स्वत:च्या पैशातून करावा लागतो.
अशा वेळी या पाळीव प्राण्यांच्या मालकांनी एक युक्ती शोधली.
ते आपल्या पाळीव प्राण्यांना सोबत आणण्यासाठी प्रायव्हेट जेटची सोय करताना दिसत आहेत. त्यांच्यामते, हाँगकाँगमध्ये महागड्या हॉटेलमध्ये राहून बिल भरण्यापेक्षा प्रायव्हेट जेटने पेटला सोबत आणणं खुपच स्वस्त वाटत आहे. अनेकदा फ्लाईटमध्ये पाळीव प्राणी नेताना सहप्रवाशांची नाराजी सहन करावी लागते.
हे सगळं टाळण्यासाठी पाळीव प्राण्यांचे मालक सोपा आणि तुलनेने स्वस्त रस्ता अवलंबताना दिसत आहेत. यावेळी ते एक प्रायव्हेट जेट भाड्याने घेऊन आपल्या लाडक्या प्राण्याशी असलेले रियुनियन करत आहेत. विशेष म्हणजे केवळ श्रीमंत व्यक्तीच नव्हे तर अनेक मध्यमवर्गीय प्राणीप्रेमीही या पर्याय वापरताना दिसत आहेत.
सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे या सगळ्यासाठी हाँगकाँगमध्ये कित्येक महिन्यांचं वेटींगही आहे. एकेएका प्राण्यासाठी प्राणीप्रेमी लोक पैशाची थैली ट्रांसपोर्ट कंपनीकडे मोकळी करताना अजिबात कचरताना दिसत नाहीत.