व्याज उत्पन्नावर किती कर आहे?जाणून घ्या!!

अर्थकारण

बँकेच्या मुदत ठेवींमधून मिळणारे व्याज हे सामान्य लोकांसाठी पूर्णपणे करपात्र असते म्हणजेच पूर्णपणे कराच्या कक्षेत असते.
ज्याप्रमाणे तुमच्या उत्पन्नावर कर आकारला जातो, त्याचप्रमाणे व्याज उत्पन्नावरही कर आकारला जातो. कोट्यवधी लोक बचत खाती, मुदत ठेवी, पोस्ट ऑफिस योजना, आवर्ती ठेवी म्हणजे आरडी आणि बाँडमध्ये गुंतवणूक करतात, या गुंतवणुकीवर व्याज मिळते आणि व्याजातून मिळणारा पैसा कराच्या कक्षेत येतो. मात्र, बहुतांश करदात्यांना याची माहिती नसते.

यामुळेच ते त्यांच्या रिटर्नमध्ये हे उत्पन्न दाखवत नाहीत. व्याजाच्या कमाईवर कसा कर आकारला जातो? हे जाणून घेण्यापूर्वी, आयटीआरमध्ये व्याजाची कमाई दाखवणे आवश्यक आहे का? हे जाणून घेऊया.. जवळजवळ प्रत्येक व्यक्तीकडे बचत खाते असते, लोकांकडे अनेक बचत खाती असतात. अशा स्थितीत बचत खात्यात ठेवलेल्या पैशांवरील व्याज खूप जास्त असू शकते.

आयकर कायद्याच्या कलम 80TTA अंतर्गत, एका आर्थिक वर्षात बचत खात्यातून मिळणारे 10,000 रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त आहे. कपातीची ही मर्यादा प्रत्येक बँक खात्यासाठी वेगळी नाही परंतु सर्व बचत खात्यांमधून मिळालेल्या व्याजाची रक्कम समाविष्ट आहे. ही वजावट 60 वर्षांखालील लोकांसाठी आणि HUF म्हणजेच हिंदू अविभक्त कुटुंबासाठी आहे.

बचत खात्यावरील व्याज 10,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास, 10,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेवर कर आकारला जाईल. तसेच करदात्याला आयटीआरमधील ‘अन्य स्त्रोतांकडून मिळकत’ विभागात आर्थिक वर्षात सर्व बचत खात्यांमधून मिळालेल्या व्याजाची रक्कम दाखवावी लागेल. व्याजाची रक्कम तुमच्या एकूण उत्पन्नात जोडली जाईल. टॅक्स स्लॅबनुसार तुम्हाला कर भरावा लागेल.

तसेच बँकेच्या मुदत ठेवींमधून मिळणारे व्याज म्हणजेच FD हे व्यक्तींसाठी म्हणजे सामान्य लोकांसाठी म्हणजे पूर्णपणे कराच्या कक्षेत असते. ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक बचत खाते आणि FD मधून मिळणाऱ्या व्याजावर 50,000 रुपयांपर्यंतच्या कपातीचा दावा करू शकतात. कपातीचा लाभ घेण्यासाठी, ITR मध्ये व्याज दाखवावे लागेल आणि कलम 80TTB अंतर्गत वजावट घेतली जाऊ शकते. 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना 80TTB चा लाभ मिळत नाही.

तसेच FD व्याज एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असल्यास, बँका 10 टक्के दराने TDS देखील कापतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी, ही मर्यादा 50,000 रुपये आहे आणि गैर-ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजेच 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी ही मर्यादा 40,000 रुपये आहे. व्याजासह तुमचे एकूण उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा कमी असल्यास, तुम्ही फॉर्म 15G/15H भरून TDS कापला जाण्यापासून रोखू शकता.

तसेच जुन्या कर प्रणालीमध्ये, 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या करदात्यांची मूळ सूट मर्यादा 2.5 लाख रुपये आहे. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 3 लाख रुपये आहे, तर अति ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे 80 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी ही मर्यादा 5 लाख रुपये आहे. आर्थिक वर्ष 2023-24 पासून, नवीन कर प्रणालीमध्ये मूलभूत सूट मर्यादा 3 लाख रुपये आहे.

तसेच आवर्ती ठेवी जसे की, RD, किसान विकास पत्र (KVP) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) सारख्या लहान बचत योजनांमधून मिळणारे व्याज देखील करपात्र आहे. व्याजाची रक्कम तुमच्या कमाईमध्ये जोडली जाईल आणि तुम्ही ज्या उत्पन्नाच्या स्लॅबमध्ये येत आहात त्यानुसार तुम्हाला कर भरावा लागेल.

त्याचप्रमाणे, ज्येष्ठ नागरिक बचत योजना म्हणजेच SCSS ही ज्येष्ठ नागरिकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्यात गुंतवणूक केल्याने त्यांना नियमित अंतराने व्याज मिळते. या योजनेत मिळणाऱ्या व्याजावरही कर आकारला जातो, व्याजासह एकूण उत्पन्न जर मूळ सूट मर्यादेपेक्षा कमी असेल तर त्यावर कोणताही कर लागणार नाही.

याचबरोबर, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF ही अशा काही बचत योजनांपैकी एक आहे, जी EEE म्हणजेच एक्झम्प्ट-एक्झम्प्ट-एक्झम्प्ट श्रेणीमध्ये येते. याचा अर्थ पीपीएफमध्ये जमा केलेली मूळ रक्कम, व्याज आणि परिपक्वता रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे.
एवढेच नाही तर सरकार, सरकारी आणि खाजगी कंपन्यांनी जारी केलेल्या रोख्यांवर मिळणाऱ्या व्याजावरही कर आकारला जातो.

तथापि, करमुक्त रोख्यांवर मिळणारे व्याज आयकर कायद्यांतर्गत करमुक्त आहे. सार्वभौम गोल्ड बॉण्ड म्हणजेच SGB वरून मिळणारे वार्षिक व्याज देखील करपात्र आहे. तसेच आयकर रिटर्नमध्ये व्याजाचे उत्पन्न दाखवणे का आवश्यक आहे? आणि त्यावर कसा कर आकारला जाईल? हे समजले असेल. तुम्हाला वार्षिक माहिती विवरणपत्रात म्हणजे AIS मध्ये व्याज कमाईची माहिती मिळेल.

तुम्ही जुनी कर व्यवस्था निवडल्यास, तुम्ही व्याजासह एकूण उत्पन्नावर 80TTA, 80TTB, 80C आणि 80D सारखी वजावट घेऊ शकता. नवीन कर प्रणालीमध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही, परंतु कराचे दर नक्कीच कमी आहेत.