गेली दोन वर्ष तुम्हाला आम्हाला एकाच भितीने ग्रासलं आहे ती म्हणजे कोविड-19. करोनाच्या या भस्मासुराने जग व्यापलं आहे. जगातील प्रत्येक प्रदेशात त्याने आपलं जाळं पसरलं आहे. 2020 मध्ये आलेला हा नकोसा पाहुण्याचे जाण्याचे अजिबात नाव घेताना दिसत नाही. प्रत्येक नवीन वर्षी त्याचा कहर नव्याने होताना दिसतो.
पहिल्या लाटेत प्रबोधन, काळजी यातून लोकांमध्ये जागृती केली होती. दुस-या लाटेसाठी लोक ब-यापैकी सावरले असल्याने लसीकरणावर जास्त भर देण्यात आला. लसीकरणाविषयी लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणं, लोकांना लस घेण्यासाठी प्रेरित करणं यावर भर दिला गेला. यामध्ये सेलिब्रिटीही बरेच आघाडीवर होते. अनेक सेलिब्रिटींनी पुढे येऊन चाहत्यांना लस घेण्याचं आवाहन केलं.
पण आता तिस-या लाटेतील नवा व्हेरिएंट लोकांच्या चिंतेत भर टाकतो आहे. यामुळे आताही निर्धास्त न राहता काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. पण करोनाची तिसरी लाटही हळू हळू उग्र रुप धारण करताना दिसते आहे. दोन डोस पुर्ण झाले असूनही अनेक सेलिब्रिटीही तिस-या लाटेतील संसर्गाला बळी पडत आहेत. मराठी सेलिब्रिटींची संख्याही लक्षणीय आहे. पुढील मराठी सेलिब्रिटी करोनाला संसर्गाने ग्रस्त आहेत.
लता मंगेशकर – 93 वर्षांच्या लता मंगेशकर यांना करोना संसर्ग आणि न्युमोनियाची लागण झाल्याचं समोर येत आहे. भारताच्या या गानकोकिळेसाठी संपुर्ण देश प्रार्थना करताना दिसत आहे. सध्या ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये लतादीदींवर उपचार सुरु आहेत.
अंकुश चौधरी- हॅण्डसम अभिनेता अंकुश चौधरी यालाही करोनाची लागण झाली आहे. अंकुशने त्याच्या ट्वीटर अकाउंटवरुन ट्वीट शेअर करत ही माहिती दिली आहे. कोविडनंतर पुन्हा त्याच जोमाने कामाला लागण्याचं त्याने ठरवलं आहे.
मिथिला पालकर – बबली गर्ल मिथिलाही कोविडच्या जाळ्यात सापडली आहे. सोशल मिडिया स्टोरीमधून मिथिलाने हे शेअर केलं आहे. या वेब क्वीनचा 11 जानेवारीला वाढदिवस झाला. पण वाढदिवस असूनही तिला तो साजरा करता आला नाही. यावेळी व्हर्च्युअली साजरा केल्याचं तिने शेअर केलं आहे. वाढदिवसाच्या आठवड्यातच मिथिलाला करोनाची लागण झाल्याचं तिने शेअर केलं आहे.
जितेंद्र जोशी- अभिनेता, निर्माता जितेंद्र जोशीला करोनाची लागण झाली आहे. यावेळी जितेंद्रने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्यांची चाचणी करुन घेण्याच आवाहन केलं आहे.