कोणताही सिनेमा रिलीज होणार असला की सगळ्यात जास्त चर्चा आहे त्यातील सीन्सची. सिनेमाचा जॉनर कोणताही असो कलाकार, गाणी, कथानक याची चर्चा होते. पण त्यानंतर रंगतो तो सीन्सचा खेळ. त्यातूनही सिनेमात बोल्ड सीन्सचा भरणा असेल तर मग मात्र चर्चेला उधाण येतं.
पुर्वीच्या काळी सिनेमातील बोल्ड सीन्स दोन फुल एकत्र येण्यात किंवा हिरो हिरॉईन झाडामागे लपण्यापर्यंत सिमीत असायचे. पण सिनेमा जस जसं फॉरवर्ड होत गेला तसं या सीनचा ठळकपणाही वाढत गेला. खरं तर चार भिंतीच्या आत असलेल्या गोष्टी थेट पडद्यावर आणताना शुटिंग कसं केलं जात असावं याचं कुतुहल मात्र प्रत्येक चाहत्याला असतंच.
पण तुम्हाला माहिती आहे का? सिनेमाचा जसा दिग्दर्शक असतो त्याच प्रमाणे इंटिमेट सीन शुट करण्यासाठी इंटिमसी दिग्दर्शक असतो. असे सीन देण्यासाठी कलाकारांच्या मर्जीचाही विचार केला जातो.
अनेक कलाकार पडद्यावर असे सीन देण्यास उत्सुक नसतात. किंवा थेट सीन दिले जात नाहीत. मग क्रोमा तंत्रज्ञानाचा वापर करुन हे सीन शुट केले जातात. किंवा अनेकदा दोन व्यक्तींच्या मध्ये उशी किंवा शीट्सचा वापर केला जातो.
अलीकडेच चर्चेत असलेल्या दीपिका आणि शाहीदच्या आगामी ‘गेहराईया’ या सिनेमाच्या पोस्टर रिलीज दरम्यान पहिल्यांदाच इंटिमसी दिग्दर्शकाचं नाव चर्चेत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एखाद्या इंटिमसी दिग्दर्शकाला क्रेडिट दिलं जात असल्याचं बोललं जात आहे.
याचा सिनेमा पाहणा-या प्रेक्षकावर काय परिणाम होईल हे सांगता येत नसलं तरी सेटवर होणा-या छुप्या शोषणाला नक्कीच आळा बसेल अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही.