मागील दोन वर्ष आपण करोनासारख्या अदृश्य पण भयंकर संकटाशी झुंज देत आहोत. मनोरंजनाचे क्षेत्रही जणू ठप्प झालं होतं. ओटीटी माध्यमातील सिनेमे पाहूनच समाधान मानून घ्यावं लागत होतं. ओटीटी प्लॅटफॉर्म हा मागील काही वर्षात सशक्त कंटेंटचा प्लॅटफॉर्म म्हणून समोर आला आहे.
ओटीटी वर बॉलिवूडसह इतर प्रादेशिक भाषांचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रेक्षकवर्ग बॉलिवूडसहितच इतरही पर्यायांकडे वळताना दिसतो आहे. मागील वर्ष ख-या अर्थाने गाजवलं ते रिजनल सिनेमांनी.
तमिळ, तेलुगु या सिनेमांना प्रेक्षकांनीही अक्षरश: डोक्यावर घेतलं. नेहमी पेक्षा वेगळी धाटणी, दर्जेदार अभिनय आणि मातीशी सतत जोडलेलं राहणं यामुळे रिजनल सिनेमा मागील काही वर्षात अधिक प्रगल्भ झाला आहे. मागील वर्षी हे सिनेमे होते प्रेक्षकांचे खास आवडते-
कर्णन: परिस्थिती समोर न हारता तिच्या डोक्यावर पाय ठेवून उभं राहणं हे कर्णनमध्ये अगदी परिणामकारकरित्या दाखवलं आहे. हा सिनेमा तमिळ भाषेत आहे.
जय भीम : जय भीम सिनेमाला सर्वच वर्गातील प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. कायदा सामान्य माणसांसाठी असतो. पण कायद्याचे रक्षकच भक्षक बनायला लागले तर कशी परिस्थिती निर्माण होते हे या सिनेमात दाखवलं आहे. हा सिनेमा तमिळ भाषेत आहे.
द ग्रेट इंडियन किचन : किचनशी प्रत्येक स्रीचं भावविश्व जोडलेलं असतं. पण ही आवड लादण्याची गोष्ट नाही हे ग्रेट इंडियन किचन या वेबसिरीजमध्ये दाखवलं आहे. मल्याळम सिनेमामधील काही मोजक्या चांगल्या सिनेमांपैकी हा आहे.
मास्टर: विजय सेतुपति आणि थलपति विजय या दमदार कलाकरांच्या अभिनयाने सजलेला सिनेमा म्हणजे मास्टर. या सिनेमातील दोन कलाकारांच्या अॅक्शनपॅक्ड अंदाजाला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला.
जोजी: साधा व्यक्ती ज्यावेळी चुकिच्या मार्गाने जिद्दीला पेटतो त्यावेळी काय घडतं हे जोजी सिनेमात दिसेल. मल्याळम सिनेमातील गुणी कलाकार फहाद फासिलचं या भूमिकेसाठी खुप कौतुक झालं आहे.
कालिरा अतीत: आपल्या माणसाला भेटण्याची, गावी येण्याची ओढ प्रत्येकालाच असते. पण गावी आल्यावर आपलं गावच नाहीसं झालं असेल तर……. नेमकी हीच गोष्ट या ओडिसी भाषेतील सिनेमात आहे. एका वादळाने आणलेली भीषणता आणि त्यात एका माणसाचा तग धरुन राहण्याचा थरार या सिनेमात दिसला आहे.