बॉलिवूड हे अजब समीकरण आहे. इथे एकमेकांचे मित्र असणारे कधी एकमेकांचे स्पर्धक बनतील सांगता येत नाही. तर स्पर्धक कधी मित्र बनतील सांगता येत नाही. इथे नात्यांची समीकरणं कपड्याइतकीच वेगाने बदलली जात असतात. पण बॉलिवूडला कितीही नावं ठेवा स्वप्न विकणा-या या दुनियेचे चाहतेही खुप आहेत.
यातील कित्येक चाहत्यांची एक इच्छा मात्र अजूनही अपुरी राहिली आहे ती म्हणजे सलमान, शाहरुख आणि आमीर या तीनही खान्सना स्क्रीन शेअर करताना पाहायची. हे तीनही खान अजूनही एकत्र झळकले नाहीत. त्यामुळे या तिघांनाही एकत्र पाहण्याची मनीषा चाहते बाळगून आहेत. ओम शांती ओम या सिनेमाच्या वेळी दिग्दर्शक फराह खानने एका गाण्यात जवळपास अर्ध्याहून अधिक बॉलिवूडला बोलवलं होतं.
या गाण्यात रेखापासून धर्मेंद्र यांच्यापर्यंत अनेक कलाकार झळकले आहेत. ‘जॉन जॉनी जनार्दन’ या गाण्यावर बेतलेल्या या कॅमिओने त्यावेळी कमालीची लोकप्रियताही मिळवली. पण या गाण्याच्या निमित्ताने फराहचं आणि प्रेक्षकांचं एक स्वप्न अपुरं राहिलं ते म्हणजे तीनही खान्सना स्क्रीन शेअर करताना पाहायचं.
फराहने सलमान आणि आमीरची या कॅमिओसाठी मनधरणी केली होती. यावेळी सलमान या कॅमिओ साठी तयार झाला होता. पण मिस्टर परफेक्शनिस्ट असलेल्या आमीरने मात्र फराहला टाळण्यासाठी कारणांचे डोंगर उभे केले.सर्वात शेवटी ‘तारे जमीन पर’ सिनेमाचं एडिटींग आणि पोस्ट प्रोसेसिंग कामाचं कारण देत आमीरने या प्रोजेक्टमधून काढता पाय घेतला होता. 2007 मध्ये रिलीज झालेल्या ‘ओम शांती ओम’ ने त्यावेळी प्रेक्षकांना दखल घ्यायला भाग पाडलं. याशिवाय शाहरुखच्या सिक्स पॅक्स अॅब्जचीही चांगलीच चर्चा रंगली होती.