आण्णा हजारे ८३ वर्षाचा तरुण ।। पद्मश्री, पद्मभूषण, अमेरीका, साऊथ कोरिया, कॅनडा अशा पुरस्कारांनी सन्मानित व्यक्ती !!

बातम्या लोकप्रिय शैक्षणिक

जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे हे आपल्याला सर्वांना माहित आहेत, अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी हे त्यांचं मूळ गाव. आण्णा आपल्या एका भाषणात सांगतात, माझ्या लहानपणी माझे मामा मला शिक्षणासाठी मुंबई ला घेऊन गेले पण माझ्या आईचे माझ्यावर संस्कार होते, लबाडी करायची नाही, चोरी करायची नाही, खोट बोलायचं नाही, समाजाचं नेहमी चांगलं करायचं, नाही चांगलं करता आलं तर वाईट तरी करायचं नाही.

या शिकवणीमुळे माझ मन हे सामाजिक कार्यासाठी तयार होत गेलं, पुढे ते सांगतात जेव्हा मी मुंबईत आलो, तेव्हा काही पोलीस फुटपाथ वरील भाजीवाल्यांना, फळविक्रेत्यांना पैसे मागत होते नाही दिले तर त्यांच्याशी भांडत होते, त्यांना मारहाण करत होते. जेव्हा हे लोक माझ्याकडे आले त्यांनी मला त्यांची व्यथा सांगीतली, मी पोलिसांना समजवायला गेलो तेव्हा ते माझ्यावर ही दादागिरी करू लागले, मी त्याच पोलिसांची काठी घेतली आणि त्यांना मारहाण केली.

त्या पोलिसाला डोक्याला आठ टाके पडले, माझा उद्देश फक्त समाजाची सेवा करणे होता, त्यावेळी माझ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव होता, समाजावर होणारा अन्याय मी बघू शकत नाही, ते भाजीवाले फळवाले माझे कोणी नातेवाईक नव्हते पण ते समाजाचा एक भाग होते आणि त्यांच्यावर होणारा अन्याय, अत्याचार मी पाहू शकलो नाही. यानंतर अण्णांना अटक झाली, ते भूमिगत झाले, यात त्यांचं खूप नुकसान झालं.

1962 साली भारत पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं, यामध्ये भारताचे खूप जवान शहीद झाले, 1963 साली सरकारने तरुणांना आवाहन केलं स्थल, जल, आणि वायू सेनेमध्ये तरुणांची गरज आहे, अण्णांचं मन आधीच समाजासाठी त्याग करायला तयार झालं होतं, त्याची वृत्ती बनली होती, त्यांनी सैन्यामध्ये प्रवेश केला आणि फौजी झाले. एक वर्ष त्यांनी पंजाब मध्ये सैन्याच प्रशिक्षण घेतलं, १९६५ साली चीन आणि भारत यांच्यात युद्ध झालं.

तेव्हा ते सीमेवर लढत होते, चीनने भारतीय जवानांवर हवाई हल्ले केले, आण्णा च्या सोबतचे सर्व जवान शहीद झाले, त्यांनी आजूबाजूला बघितलं तर सर्व सोबती मरण पावले होते, मात्र अण्णांना काहीही झालं नाही, ते सुखरूप होते, देवाने नक्कीच आपल्याला काहीतरी मोठं काम करण्यासाठी जीवंत ठेवलं अस त्यांना वाटत होतं, आणि तेव्हा त्यांनी प्रण घेतला, या समाजाला वाहून घ्यायचं , लग्न केलं तर घर चालवण्यात गुंतून जाईल, म्हणून गावासाठी, समाजासाठी, देशासाठी लग्न करायचं नाही.

आज ते ८३ वर्षांचे आहेत, गावाकडे त्यांची शेती आहे, घर आहे, भाऊ आहेत, पण ते परत घराकडे फिरकले नाहीत. ते सांगतात की त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले, पद्मश्री, पद्मभूषण, अमेरीका, साऊथ कोरिया, कॅनडा अशा ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात आलं, हे पुरस्कार कोटींच्या भावात होते, परंतु मी ते सर्व पैसे ट्रस्ट ला देऊन टाकले. आण्णा सांगतात की ते देवळात राहतात, झोपण्यासाठी एक बिस्तर आहे.

आणि जेवायला एक ताट आहे,तरी मी खूप आनंदी आहे, एवढा आनंद की कोणी लखपती करोडपती देखील इतका आनंदी असू शकत नाही. आण्णा तरूणांना संबोधित करताना म्हणतात की युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे ती जागी झाली तर उज्ज्वल भविष्य दूर नाही. अण्णांनी १५ वर्ष सैन्यात नोकरी केली, जेव्हा ते गावात परत आले तर त्यांनी पाहिलं की गावातल्या लोकांची हालत खूप खराब आहे, गावात प्यायला पाणी नाही, जेवायला अन्न नाही.

गावातील लोक दूर खडी फोडायला जातात, गावात ४० दारूच्या भट्ट्या चालू होत्या. त्यांनी ठरवल आपल्या गावापासून सुरुवात करायची, ज्या गावात आधी ४० दारूच्या भट्ट्या होत्या त्या गावात आता बिडी, सिगारेट, तंबाखू हे मिळतं सुद्धा नाही. ज्या गावात ८०%लोक अर्धपोटी झोपत होते त्या गावातून आज शंभर सव्वाशे ट्रक कांदा, भाजीपाला निर्यात होतो आणि साडेसहा हजार लिटर दुध बाहेर जातं.

फक्त कारखाने उभारून बेरोजगारी मिटणार नाही तर तरुणांनी जर शेती कडे लक्ष दिलं, दुग्ध व्यवसाय केले तर मात्र हा प्रश्न सुटू शकतो, राळेगण सिद्धी मधील सत्तर लाख रुपये किमतीची इमारत गावकऱ्यांनी स्वतः घाम गाळून उभी केली. आण्णा म्हणतात, माझं शिक्षण फार झालं नाही तरी मी जर हे करु शकतो तर आजच्या काळात शिकलेले तरुण खूप काही करू शकतात, त्यांनी पुढे यावे आणि समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घ्यावं.

स्वतःसाठी जगणारी माणस ही कायमची मरतात पण जी माणसं गावासाठी, देशासाठी मरतात ती खऱ्या अर्थाने जगतात. तरुणांना जर समाजकार्य करायचं असेल तर या पाच गोष्टीच पथ्य पाळवं, १.स्वतःच चारित्र्य जपावं २.शुद्ध आचार असावेत ३.शुद्ध विचार असावेत ४.जीवन निष्कलंक पाहीजे, ५.जीवनात त्याग असावा.

आण्णा म्हणतात हे पाच गुण जर तुमच्यात असतील तर माझ्या पेक्षा मोठं काम तुम्ही करू शकता. तरुणांना उद्देशून ते म्हणतात, ध्येयवादी व्हा, ध्येयवादी झालात की मंजिल दिसेल, चालत रहा, संकट येतील, विरोध होईल, लोक निंदा करतील, तुम्ही चालत रहा, मरण हातावर घेऊन चालत रहा, एक दिवस त्या मंजिल वर तुम्ही पोचलेले असाल. दाण्यांनी भरलेली कणसं आपण पाहतो पण त्या पूर्ण कणसासाठी एका दाण्याने स्वतःला जमिनीत गाडून घेतलेलं असत.