तुम्ही अनेक चोर पहिले असतील मात्र आज असा एक चोर बघूया ज्याने चक्क ‘आयफेल टॉवर’ विकला होता !
नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
जर तुमच्यासमोर एखादा सुटाबुटातील माणूस आला ज्याने केस अगदी चापुनचोपुन बसविले आहेत, चकाचक दाढी केली आहे, उंची परफ्यूम लावलेला आहे, आणि अस्खलित इंग्रजी भाषेमध्ये तुमच्यासह वार्तालाप करत आहे, तर तो ठग किंवा चोर असेल ह्यावर तुम्ही विश्वास ठेवाल?
कोणत्याही देशातील सरकारी मालमत्तेचे कोणतेही व्यवहार करण्याचा हक्क त्या सरकारच्या स्वाधीन असतो. इतर कुणालाही त्या मालमत्तांच्या व्यवहारात सहभागी होता येत नाही. तरीदेखील व्हिक्टर लस्टिग ह्या अत्यंत सुसंस्कृत दिसणाऱ्या ठगाने फ्रान्स देशाची शान, ऐतिहासिक वारसाहक्क असलेला आणि जगभरातील लोकांचा अत्यंत आवडता असलेला आयफेल टॉवर चक्क विकला, तोही एकदा नव्हे तर दोनदा! आता बोला!
व्हिक्टर लस्टिग एखाद्या गर्भश्रीमंत व्यक्तिसारखा पोशाख करत असे. त्याला पांच भाषा अस्खलितपणे बोलता येत होत्या आणि तो सर्वगुणसंपन्न असल्याचा आव आणत असे; अर्थात खरं बघायला गेलं तर त़ो ‘सर्वअवगुणसंपन्न’ होता! आपल्या व्हिक्टर लस्टिग ह्या नांवाच्या मागे तो ‘काउंट’ असं बिरुद लावत असे.
काउंट म्हणजे परदेशी कुलीन व्यक्ती. उच्चभ्रू लोकांमध्ये सहज मिसळता यावं म्हणून काउंट ह्या बिरुदाचा चांगला उपयोग होत असे. न्यूयॉर्क टाइम्सने संपादकीयात लिहिले होते: तो स्त्रियांचे हाताने चुंबन घेणारा काउंट नव्हता—त्यासाठी तो विशेष उत्सुक नसे. तो नाटकी ढंगाने स्वतःची ओळख करून देत नसे, तर एक भिडस्त, प्रतिष्ठित माणूस अशी त्याची ओळख होती.
किशोरवयातच त्याने छोटे गुन्हे करण्यास सुरुवात केली. खिसा कापणे, घरफोडी करणे, रस्त्यातून जाणाऱ्या माणसांना धमकावून लुटणे असे गुन्हे करत त्याने मोठे गुन्हे करण्यापर्यंत मजल गाठली. तो जरी दिवसाढवळ्या गुन्हे करत असला आणि पोलिसांना त्याच्या कारवायांबद्दल कुणकुण असली, तरी कायद्याच्या कचाट्यात न सापडण्याची पुरेपूर काळजी तो घेत असे. पोलीसांच्या म्हणण्यानुसार त्याने हातात कधी बंदुकही घेतली नसेल.
लोकं त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत आणि त्याच्या योजनांमध्ये पैसे गुंतवत. रुढार्थाने तो एक “व्हाइट काॅलर” गुन्हेगार होता. त्याने एकूण ४७ खोटी नांव धारण केली आणि डझनभर बनावट पासपोर्ट बाळगले. त्याने खोट्याचे जाळे इतके बेमालूम विणले, की आजही त्याची खरी ओळख गूढतेने वेढलेली आहे. त्याच्या अल्काट्राझ तुरुंगाच्या कागदपत्रांवर, तुरुंगाधिकाऱ्यांनी त्याला “रॉबर्ट व्ही. मिलर” असे संबोधले, जे त्याचे आणखी एक टोपणनाव होते.
अनेक वर्ष त्याने कायद्याला गुंगारा दिला आणि विविध नावांनी लोकांना फसविण्याचे आपले उद्योग सुरू ठेवले. या फसव्या माणसाने कायम युरोपातील किल्ल्यांचे मालक असलेल्या अभिजात परिवारातील असल्याचा दावा केला असला, तरीही नव्याने सापडलेल्या दस्तावेजांनी त्याचं खरं रूप उघडकीस आले आहे.
तुरुंगातील चौकशी अधिकाऱ्यांना त्याने सांगितले की त्याचा जन्म ऑस्ट्रिया-हंगेरी शहरात ४ जानेवारी, १८९० रोजी झाला होता. त्याने अनेकांसमोर बढाई मारली होती की त्याचे वडील लुडविग हे शहराचे महापौर होते. पण नुकत्याच उघड झालेल्या तुरुंगातील कागदपत्रांमध्ये, त्याने त्याच्या आई-वडीलांचे “अतिशय गरीब शेतकरी” असे वर्णन केले आहे ज्यांनी त्याला दगडांच्या पडीक घरात वाढवले.
व्हिक्टर लस्टिग म्हणतो की त्याने जगण्यासाठी चोरी केली, परंतु केवळ लोभी आणि अप्रामाणिक लोकांना लुटले. त्याचा हा दावा म्हणजे त्याला गरीबांची किती दया होती हे सांगण्याचा प्रयत्न असावा. १९२५ मध्ये त्याने आपला मोर्चा वळवला अमेरिकेतील श्रीमंतांकडे. अशी लोकं, ज्यांना आपले पैसे दुप्पट किंवा तिप्पट करण्याची हाव होती.
“रुमानियन मनी बॉक्स” ही त्याच्या सुपीक डोक्यातून निघालेली अशीच एक स्कीम. तो लोकांना देवदाराच्या लाकडापासून तयार केलेला एक छोटा बॉक्स दाखवत असे, ज्यात गुंतागुंतीचे रोलर्स आणि पितळी डायल होती. लस्टिगने दावा केला की ते यंत्र “रेडियम” वापरून डाॅलरच्या नोटांचे डुप्लिकेशन करु शकते आणि अधिक पैशाची हाव असलेल्या लोकांनी त्यावर विश्वास ठेवला.
अर्थातच त्यांना लुबाडुन हा गायब झाला. अशा अनेक स्कीम करुन व्हिक्टर लस्टिग प्रचंड श्रीमंत झाला. पण एव्हढ्यावर थांबतोय तर तो ठग कसला? त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली, आणि तो १९२५ च्या मे महिन्यात पॅरिस येथे दाखल झाला. प्लेस द ला कॉनकॉर्डवरील हॉटेल द क्रिलॉनमध्ये त्याने प्रवेश केला आणि फ्रेंच सरकारचा अधिक्रुत प्रतिनिधी अशी बतावणी केली. हाॅटेलच्या रिसेप्शनवर त्याने फ्रेंच सरकारचा शिक्का असलेले लेटरहेड सादर केले.
तेथून सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून, त्याने फ्रेंच मेटल स्क्रॅप उद्योगातील प्रतिष्ठित लोकांना पत्र लिहून त्यांना हॉटेलमध्ये भेटीसाठी आमंत्रित केले. फ्रेंच सरकारचा अधिक्रुत प्रतिनिधी अशी आपली ओळख करून दिल्यामुळे अनेक जणांनी त्याचे निमंत्रण स्वीकारले. जमलेल्या लोकांसमोर त्याने अत्यंत शांतपणे सांगितले, की आयफेल टॉवर मधील इंजिनिअरिंग त्रुटी, महागडी दुरुस्ती आणि राजकीय दबावामुळे तो पाडण्यात येणार आहे,
पण जर कुणी तो विकत घेत असेल, तर त्याला विकण्याचा फ्रेंच सरकारचा विचार आहे. हा टॉवर सर्वाधिक बोली लावणाऱ्याला विकला जाईल, असे त्याने जाहीर केले. जमलेले लोक मंत्रमुग्ध झाले आणि त्यांनी आपापली बोली लावली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे व्हिक्टर लस्टिगने आयफेल टॉवर एकदाच नव्हे तर दोनदा विकला.
अनेक गुन्हेगारांप्रमाणेच, त्याचा लोभ त्याला नडला. ११ डिसेंबर १९२८ रोजी बिझीनेसमॅन थॉमस केर्न्सने गुंतवणुकीवर चर्चा करण्यासाठी व्हिक्टर लस्टिगला त्याच्या मॅसॅच्युसेट्सच्या घरी आमंत्रित केले. तर ह्याने वरच्या मजल्यावर जाऊन ड्रॉवरमधून $१६,००० चोरले आणि पळून गेला. जो मोठमोठ्या रकमांची फसवणूक करतो, त्याने अशा प्रकारची चोरी करायची म्हणजे जरा अतीच झालं.
थॉमस केर्न्सने पोलिसांत तक्रार दाखल केली. नंतर बनावट नोटांचा एक्स्पर्ट विल्यम वॉट्सशी हातमिळवणी करून, लस्टिगने खोट्या नोटा बनविल्या ज्या इतक्या खऱ्या दिसत होत्या, की बँक टेलरही फसले. वेष बदलण्यात तो इतका वाकबगार होता, की काही क्षणात तो पाद्री, वेटर किंवा एखाद्या विक्रेत्याचा पोशाख करून चुटकीसरशी पळून जाऊ शकत असे.
सरतेशेवटी १९३६ मध्ये व्हिक्टर लस्टिग ह्याला बनावट नोटांच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली, आणि न्यूयॉर्कमधील न्यायाधीशांनी त्याला २० वर्षांची शिक्षा सुनावली. अल्काट्राझच्या तुरुंगात १९४५ साली त्याचं निधन झालं.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.