पहिले मराठी बांधकाम उद्योजक बी.जी.शिर्के ।। बालेवाडी स्टेडियम, हिंजवडी IT पार्क, इत्यादी महत्वाच्या बांधकामाचे निर्माते !!

अर्थकारण बातम्या लोकप्रिय शैक्षणिक

पद्मश्री बाबुराव गोविंदराव शिर्के यांचा जन्म वाई येथील पसरणी गावात १ ऑगस्ट १९१८ रोजी झाला.त्यांच्यामुळे त्यांच्या गावातला प्रत्येक तरुण परदेशात जाऊ शकला चांगले पैसे कमवू शकला, नोकरीतून घर संसार उभा करू शकला. पसरणी गावातील प्रत्येक माणूस बी जी शिर्के यांचं नाव मोठया अभिमानाने घेतो. महाराष्ट्राच्या छोट्याश्या गावात जन्मलेल्या या मुलांन स्वतः कंपनी सुरू करुन देश परदेशात काम मिळवली.

वीर धरण, बालेवाडी स्टेडियम, कर्नाटक मधील विधानभवन, हिंजवडी मधील IT पार्क, बंगलोर मधील IT पार्क, सरंक्षण मंत्रालयाची इमारत, मुंबई बंगलोर हायवे अशा कित्येक वास्तू वर बी.जी.शिर्के यांचा शिक्का बसला आहे. शेतकरी कुटुंबातले बाबुराव शिर्के यांच ऐतिहासिक ठेवा असणार वाई जवळील पसरणी हे गाव. कमवा व शिका या पद्धतीने वाईतील  द्रविड शाळेत त्यांनी शिक्षण घेतलं. पुढे पुण्याचं फर्ग्युसन कॉलेज व नंतर COEP मधून त्यांनी सिव्हिल इंजिनीअर पूर्ण केलं ते साल होत १९४३.

त्या काळात पूर्ण गावातच काय तर पूर्ण तालुक्यात इंजिनीअर झालेले ते पहिले व्यक्ती होते. त्याकाळातील शिक्षणातून नोकरी या पद्धतीप्रमाणे नाशिक मधील ‘ते जयुका’ या कंपनीत त्यांनी नोकरी केली. परंतु स्वतःची कंपनी व स्वतः उद्योग सुरू करण्याची त्यांची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि म्हणूनच ९ सप्टेंबर १९४४ साली दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुप्रीम कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी त्यांनी सुरू केली. कंपनी तर सुरू झाली पण काम मिळणं महत्वाचं होत, नुकत्याच इंजिनीअर झालेल्या आणि अनुभव नसलेल्या व्यक्तीला काम मिळणं कठीण होत. अशावेळी उपयोगाला आला तो त्यांचा प्रामाणिकपणा.

पुण्यातील लष्करी छावणीला संरक्षक भिंत घालायची असल्याची माहिती त्यांच्या कानावर आली. हे काम मिळवायचं या उद्देशाने ते लष्करी अधिकाऱ्याला जाऊन भेटले व काम देण्याची विनंती केली, तेव्हा त्या लष्करी अधिकाऱ्याला दिसला तो त्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांनी ते काम शिर्के यांना दिल. हे भिंतीच केलेलं काम हे सुप्रीम कन्स्ट्रक्शन या कंपनीच पहिलं काम. कामाच्या शोधात शिर्के संपूर्ण पुणे सायकलने पालथं घालत.

१९४५ साली त्यांना कोल्हापूरच्या कारागृहाच्या बांधकामच कंत्राट मिळालं, एवढ्या नवख्या व्यावसायिकांला मिळालेल हे एक मोठं काम होत परंतु त्यांनी मोठया कमालीने ते काम  पार पाडल. इतकं मोठं काम एका नवख्या तरुणाने पूर्ण केल्यामुळे त्यांचा नावाचा चांगलाच दबदबा निर्माण झाला. सुरुवातीला चेष्टेत घेणारे मोठे मोठे बांधकाम व्यावसायिक त्यांचं नाव आदराने घेऊ लागले. याच काळात त्यांचं लग्न झालं. १९५३साली पुणे विद्यापीठाच्या केमिस्ट्री डिपार्टमेंट ची इमारत पूर्ण केली. याच दरम्यान वीर धरणाच्या बांधकामाची निविदा निघाल्याच त्यांना समजलं, त्यांची निविदा मंजूर झाली व हे ही काम त्यांना मिळालं.

किर्लोस्कर कंपनीच्या शंतनुराव किर्लोस्कर यांना शिर्के यांच्याबद्दल कळलं आणि किर्लोस्कर कंपनीतील सर्व काम विना निविदा त्यांना मिळण्याची सोय त्यांनी केली. बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख निर्माण झालीच पण हा व्यवसाय एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी सिपोरेक्स नावाची कंपनी सुरू केली. बांधकामासाठी लागणार साहित्य तयार करणारी ही कंपनी होती मात्र ही कंपनी सुरू करताना बऱ्याच अडचणी आल्या.

बी जी शिर्के यांनी इंदिरा गांधी यांच्या सह अनेकांना पत्र लिहिले, कोणतीही कंपनी सुरू करताना भारतात असणारा भ्रष्टाचार आणि काळा पैसा  यावर ताशिरे उडतात. सरकारी कामातील भ्रष्टाचार, लाच अशा गोष्टीना थारा न देता १९७२ च्या दरम्यान सिपोरेक्स कंपनी उभी राहिली. कंपनी उभी राहिली पण पून्हा काम मिळणे ही महत्त्वाची गोष्ट होती, त्याकाळात दुबई प्रचंड वेगाने बदलत होती, दुबईत बांधकाम क्षेत्र विस्तारत होत, व यासाठी अडचण होती ती मनुष्यबळाची, या काळात दुबईच मोठ्ठ काम शिर्के यांच्या कंपनीकडे चालून आलं, लागणार बांधकाम साहित्य आणि मनुष्यबळ ह्या दोन्ही गोष्टी शिर्के कडे उपलब्ध होत्या.

आज दुबई मध्ये ७० ते ८० च्या काळातील ज्या इमारती, मशिदी दिसतात त्यातल्या बहुतांश काम शिर्के यांनी केलं आहे. त्याकाळात जे मनुष्य बळ हवं होतं त्यासाठी त्यांनी पसरणी गावातील तरुणांना संधी दिली. गावातील घरातील एक तरुण फॉरेन मध्ये जाऊ लागला, डॉलर मध्ये पैसे कमाऊ लागला. शिर्के यांच्या कंपनीत तरुणांना काम मिळालं, आपल्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी फ्री फॅब नावच तंत्र विकसित केलं. या तंत्रज्ञानामुळे विक्रमी वेळेत बांधकाम होऊ लागलं, या तंत्रज्ञानाने जगभरात १,५०,००० घर त्यांनी बांधली.

१९९४ साली पुण्यातील बालेवाडी येथे  माळरानावर शिव छत्रपती क्रीडांगण बांधण्याचं ठरवण्यात आलं, एका वर्षाच्या आत शिर्के यांनी क्रीडांगणाच काम पूर्ण केलं. तसेच प्रमाणिकपणाच्या भरवश्यावर त्यांनी अनेक कामे पार पाडली. २००३ साली बाबुराव शिर्के यांचा पद्मश्री अवॉर्ड देऊन सत्कार करण्यात आला. १४ऑगस्ट २०१० रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी पुण्यामध्ये बी जी शिर्के यांचा मृत्यू झाला. आपणही अशीच जिद्द आणि चिकाटी दाखवली तर आपली ध्येय गाठू शकता.