बचत गट म्हणजे काय? बचत गटाची स्थापना कशी करायची? सदस्य संख्या किती असावी लागते? भाग 1

लोकप्रिय शैक्षणिक

महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होत आहेत हे आपण सर्व जाणून आहोत. स्त्रीशक्ती जर एकत्र आली तर त्यांची खऱ्या अर्थाने प्रगती होईल आणि या सगळ्यांसाठी महिला बचत गट खऱ्या अर्थाने वरदान ठरेल. बऱ्याच स्त्रियांना अशा प्रकारचे बचत गट सुरू करायचे असतात पण ते नेमके कसे स्थापन करायचे, त्यात काय काम करायचे, बचत गटाचे नियम काय असतात, कशा पद्धतीने काम करायचे असे सर्व प्रकारचे प्रश्न या महिलांपुढे असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे खूप महत्त्वाचे असते. जेणेकरून त्या स्वावलंबी बनू शकतील. तर बघूया बचत गटा विषयी संपूर्ण माहिती.

स्वयंसहाय्यता बचत गट म्हणजे काय ? : सर्वसाधारण 15-20 लोकांचा/महिलांचा अनौपचारिक समूह, निश्चित स्वरूपाचे उद्दिष्ट घेऊन स्व-इच्छेने एकत्र आलेल्या लोकांचा/महिलांचा समूह, एकाच कारणासाठी गटातील लोकांच्या उन्नती, विकास व फायद्यासाठी एकत्रित आलेला समूह म्हणजे बचत गट होय.

प्रत्येक सभासद समान रक्कम, ठराविक कालावधीत बचत म्हणून एकत्र करतात व त्याचा उपयोग सभासदांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी लोकशाही मार्गाने करतात. ही कोणतीही योजना अथवा प्रकल्प नसून महिलांना व युवकांना संघटित करण्यासाठी, त्यांना विकासात्मक स्वरूपाचे शिक्षण देण्यासाठीचे माध्यम होय.

प्रथम बघुया स्वयंसहायता समूहाची संकल्पना कशी झाले. म्हणजेच काय बचत गटाचा थोडक्यात इतिहास समजून घेऊया. स्वयंसहायता ग्रुप म्हणजे काय त्यालाच आपण इंग्लिश मध्ये सेल्फ हेल्प ग्रुप असे म्हणतो. स्वयंसहायता समूह म्हणजे आपणच आपल्याला मदत करायची.

या गटाची सुरुवात मुळीच गरीब लोकांनी गरीब लोकांना मदत करण्यासाठी झालेली आहे. गरीब माणसाला त्याच्या गरजा भागवण्यासाठी बँक कर्ज देत नाही हे सर्वांना माहीत आहे. कारण त्यांच्याकडे ठेवण्यासाठी काहीच नसते. त्यामुळे तो सावकाराकडे जातो आणि सावकार त्याला जास्त टक्क्याचे कर्ज देतो आणि तो बिचारा घेतो. सावकार व्याज खूप घेतो व गरीब माणूस व्याज देतच राहतो.

मूळतः रक्कम तशीच राहते आणि त्यातून गरीब माणसाची ही लूट होत असते. ही लूट थांबविण्यासाठी आपण महिला बचत गट आणि पुरुष गट पण स्थापन करू शकतो बचत गटाची संकल्पना ही बांगलादेशामधील प्राचार्य डॉक्टर महंमद युनूस यांनी 1976 मध्ये काढली. हा एक थोडासा इतिहासाचा भाग आहे. आणि आपल्या भारतामध्ये बचत गट स्थापनेला सरकारी मंजुरी म्हणजेच आपल्या भारतीय रिझर्व बँकेने 24 जुलै 1991 ला आणि 26 फेब्रुवारी 1992 मध्ये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांनी बचत गट योजनेला मान्यता दिली.

बचत गटाचे फायदे : संघटन होते व बचत आणि काटकसरीची सवय लागते. बचत गटामुळे अडीअडचणींच्या वेळेस तातडीच्या गरजा भागविण्यासाठी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत नाही. त्वरीत व सुलभरित्या कर्ज पुरवठा होतो व सभासदांना बचतीची सवय लागते आणि बँकेचे व्यवहार माहिती होतात. सावकारी कर्जाच्या तुलनेत अत्यंत कमी व्याजदरात आर्थिक सहाय्य उपलब्ध होते त्यामुळे सदस्यांच्या एकमेकांच्या आर्थिक अडचणी सोडविल्या जातात.

सभासदांमध्ये परस्पर सहकार्य व विश्वास निर्माण होतो. सभासदांना अंतर्गत कर्ज पुरवठा अल्प व्याजदराने होतो. महिला घराबाहेर पडून त्यांना नवीन बाबी शिकण्याची संधी मिळते तसेच त्या स्वावलंबी होतात. महिलांना बचत, कर्ज घेणे व परतफेड करणे अशा आर्थिक व्यवहारांची माहिती होते व त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो.

सरकारच्या लोककल्याणाच्या विविध योजनांची माहिती होते. समाजात स्थान निर्माण होते. परतफेडीची सवय लागते. कार्यरत असलेल्या बचत गटास एक वर्षानंतर प्रती सभासद रू. 1000/व जास्तीत जास्त रू. 25000/पर्यंत व्यवसायासाठी खेळते भांडवल (कॅश क्रेडीट) मिळते. दारिद्रय रेषेखालील बचत गटास व्यवसायासाठी रू. 1.25 लाख किंवा 50% यापैकी कमी असेल त्या रकमेएवढे अनुदान मिळते.

आता आपण बघूया बचत गटाची स्थापना कशी करायची किंवा बचत गटाची स्थापना करण्यासाठी किती सदस्य असले पाहिजे? अशी सर्व माहिती आपण पाहणार आहोत. तर महिलांचे सबलीकरण करण्यासाठी किंवा त्यांना स्वावलंबी बनण्यासाठी बचत गटाची स्थापना होत असते. बचत गटाची हा कमी कमी 10 स्त्रियांनी आणि जास्तीत जास्त 20 स्त्रियांनी एकत्र येऊन स्थापन केलेला गट असतो.

मग त्या स्त्रिया कुठल्याही वर्गाच्या गरीब असो वा श्रीमंत असो, गावातील किंवा शहरातील असो अशा महिलांना गटाची स्थापना करता येते. ग्रामीण भागात व शहरी भागात बचत गटांना शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना काही आर्थिक निकष असतात.

बचत गट स्थापनेच्या पाय-या (स्टेप्स) : प्रथम कार्यक्षेत्राची निवड करून त्या कार्यक्षेत्रात जाऊन बचत गटाची संकल्पना व्यवस्थित व स्पष्टपणे समजावून देऊन गट स्थापन्यास प्रोत्साहित केले जाते. गटामध्ये सहभागी होणा-या १० ते २० इच्छुक महिला / पुरूषांचा गट तयार केला जातो. सर्वांच्या संमतीने सोईच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी बैठक आयोजित करून बचत गटाविषयी माहिती दिली जाते.

बैठकीत सर्व संमतीने गटाला एक नांव देण्यात येते व गटामध्ये जमा करावयाच्या बचतीची रक्कम ठरविली जाते. गटाच्या नांवे बँकेत खाते उघडले जाते व प्रत्येक महिन्याची जमा रक्कम खात्यात जमा करण्यात येते. लघुसिंचनाचे बाबतीत व अपंग व्यक्तींच्या बाबतीत 5 व्यक्तींचा गट बनविला जातो. एका कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती गटात सभासद होऊ शकते.

गट स्थापनेचा कालावधी सर्वसाधारणपणे 6 महिने गृहित धरला आहे. 6 महिन्यांनंतर गटाची प्रतवारी (Grading) करण्यात येते. शेजारी राहणा-या महिला किंवा एकाच ठिकाणी काम करणारे १० ते २० सहकारी बचत गट स्थापन करू शकतात.

बचत गट दोन प्रकार चे असतात. पहिला BPL आणि दुसरा म्हणजे APL. BPL बचत गट म्हणजे काय below poverty line आणि दुसरा म्हणजे above poverty line. शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला NRLM (National Rural livelihood mission) गावासाठी आणि NULM म्हणजे National Urban Livelihood Mission हे शहरासाठी याअंतर्गत बचत स्थापन करायचा झाल्यास बचत गटांना शासकीय योजनेचा लाभ मिळतो.

एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक आहे. तुम्हाला माहीतच आहे की प्रत्येक गटाला एका अध्यक्ष आणि एक सचिव असतो. तर गटातील सभासदां मधून सभासदांची अध्यक्ष व सचिव म्हणून निवड करावी. ती निवड सभासदांनी एकमताने करायची असते. निवड झाल्यानंतर आपल्या बचत गटाला एक नाव घ्यायचं असतं. नाव दिल्यानंतर आपल्याजवळ असलेल्या कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये किंवा ग्रामीण बँक किंवा जिल्हा सहकारी बँकेमध्ये बचत गटाच्या नावाने खाते उघडावे लागते.

इतर काही सातत्याने विचारले जाणारे प्रश्न: १) बचत गटांची नोंदणी बंधनकारक आहे का? उत्तर: बचत गटांची नोंदणी बंधनकारक नाही. मात्र ती केल्यास उपयोगी असते, विविध शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी नोंदणीची गरज भासते.

२) नोंदणी करणा-या संस्था कुठल्या ? उत्तर: ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, महानगरपालिका आदी स्वायत्त संस्थांनी नेमलेले अधिकारी नाबार्ड, महिला आर्थिक विकास महामंडळासारखी मंडळे व अशासकीय संस्था देखील बचतगटांची नोंदणी करतात. ३) बचत गटांमध्ये किमान किती सदस्य लागतात ? उत्तर: बचत गटांमध्ये किमान १० सदस्य लागतात.

४)बचत गटांचे प्रकार कोणते ? उत्तर: १) महिला बचतगट व पुरुषांचा बचत गट २) ग्रामीण बचत गट व शहरी बचत गट ३) दारिद्र्य रेषे खालील बचत गट व दारिद्र्य रेषे वरील बचत गट

५) महिला बचत गटांमध्ये पुरुष सदस्य किंवा पुरुष बचत गटांमध्ये महिला असे करता येते का? उत्तर: नाही, बचत गट, महिलांचाच किंवा पुरुषांचाच असतो, कायदा मिश्र बचतगटांना परवानगी देत नाही.

६) बचतगटांमार्फत व्यवसाय करता येतो का? उत्तर: हो, बचतगटांमार्फत व्यवसाय करता येतो, मात्र, त्या करिता महिलांमध्ये व्यवसायिकाची मानसिकता रुजविणे नितांत गरजेचे असते, त्यांना व्यवसायिकतेचे मुलभुत धडे देणे व ते गुण त्यांनी अंगीकारने महत्त्वाचे असते. आज अनेक बचतगट आहेत जे यशस्वीरित्या आपला उद्योगव्यवसाय करतात. शासन देखील बचतगटांना व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देते.

७) आम्ही बनविलेल्या वस्तुंचे मार्केटिंग कसं करायचं? उत्तर: मार्केटिंग एक तंत्र आहे, जाहिरातीसाठी बचतगटांकडे पैसे नसतात, त्यामुळे नवनवीन मार्गाने व मार्केटिंगच्या नाविन्यपुर्ण पध्दती अवलंबून संस्था महिलांना मार्केटिंग करण्यास मदत करते.

तर ही होती बचत गटाबद्दल बेसिक माहिती. पुढे आपण बचत गट बद्दल सखोल माहिती जाणून घेणार आहोत. महिती जसे की बचत गटाचे वैशिष्ट्ये काय असतात, बचत गटाचे नियम काय असतात, बचत गटाचा कारभार कसा करायचा असतो, बचत गटाच्या मीटिंग कश्या घ्यायच्या असतात, बचत गटाच्या मार्फत आपण कोणते कोणते व्यवसाय करायचे असतात किंवा कोणतेही सरकारी कामात किंवा प्रायव्हेट काम कसे मिळवायचे असते अशी संपूर्ण संपूर्ण माहिती आपण पुढच्या भागात बघणार आहोत.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

2 thoughts on “बचत गट म्हणजे काय? बचत गटाची स्थापना कशी करायची? सदस्य संख्या किती असावी लागते? भाग 1

  1. छान माहीती मिळाली बचत गटा बाबत आभारी आहोत

Comments are closed.