कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आता मोठा बदल ।। अर्ज कुठे करावा, फी किती लागेल इ. ।। जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया !

शेती शैक्षणिक

कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आता मोठा बदल केला गेला असून त्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने 4 नोव्हेंबर 2020 रोजी जीआर प्रकाशित केलेला आहे. कृषी विभागाच्या योजनांची महाडीबीटी पोर्टल द्वारे अंमलबजावणी करण्याबाबत असे या जीआर चे शीर्षक असून 4 नोव्हेंबर 2020 रोजी हा प्रकाशित करण्यात आला आहे. काय आहे हा जीआर पाहूया सविस्तर माहिती.

प्रस्तावना: शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची जलद गतीने व पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी करण्याकरिता तसेच नागरिकांना सर्व शासकीय विभागांच्या विविध योजनांचा लाभ एकाच पोर्टल द्वारे देण्याच्या हेतूने शासनाने महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळामार्फत महाडीबीटी पोर्टल विकसित केले आहे.

सद्यस्थितीत या पोर्टलवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध विभागांच्या पोस्ट मेट्रीक शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रणाली विकसित केली असून सदर योजनांची महाडीबीटी पोर्टल द्वारे अंमलबजावणी करण्यात येत आहे. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांशी निगडित विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेसाठी लेखी स्वरूपात स्वतंत्र अर्ज करावे लागत होते तसेच, काही योजनांसाठी संगणकीय प्रणालीवर स्वतंत्रपणे अर्ज करावे लागत होते. तथापि,अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली अस्तित्वात नव्हती.

कृषी विभागाने आता महाडीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्यादृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडित विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे.

सदर बाबी या योजनेतून देता येऊ शकतील. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची संगणकीय सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. यामुळे, योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येईल. तसेच, राज्यात सर्व योजनांच्या अंमलबजावणीत एकसूत्रता येईल व वरिष्ठ स्तरावरून योजनांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचे प्रभावी संनियंत्रण करणे शक्य होणार आहे.

सन 2020-21 पासून कृषी विभागाच्या प्रमुख योजनांची अंमलबजावणी महाडीबीटी पोर्टल द्वारे करण्यात येणार असून दिनांक 7 जुलै 2020 रोजी मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते या पोर्टल वर अर्ज स्वीकृती चा शुभारंभ करण्यात आला आहे. चालू वर्षापासून महाडीबीटी पोर्टल द्वारे योजनांच्या अंमलबजावणीबाबत पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.

मित्रांनो www.mahadbt.gov.in या पोर्टल वर कोणकोणत्या कृषी योजनांसाठी अर्ज करता येणार आहे त्या योजना कोणकोणत्या आहेत ते आपण पाहू. या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या योजना खालील प्रमाणे आहेत: 1.प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- प्रति थेंब अधिक पीक (PMKSY-PDMC) 2.मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना.

3.कृषी यांत्रिकीकरण उप अभियान(SMAM) 4.राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना 5.राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके(भात, गहू, कडधान्य, पोषक धान्य, भरडधान्य)(NFSM-foodgrains) 6.राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान- तेलबिया पिके(NFSM- oilseeds)
7.राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान- वाणिज्यिक पिके( कापूस व ऊस)(NFAM-cash crops)

8.एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान(MIDH) 9.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 10.बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना(आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत) 11.बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील) 12.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 13.राष्ट्रीय कृषी विकास योजना- रफ्तार योजनेअंतर्गत(RKVY-RAFTAAR) मंजूर होणारे कृषी विभागाचे विविध प्रकल्प

वरील योजनांची ऑनलाईन अर्ज, त्याबाबतची पात्रता निकष व कागदपत्रे याबद्दलची सविस्तर माहिती www.mahadbt.gov.in या पोर्टलवर उपलब्ध असलेली दिसून येईल. या जीआर मध्ये शेतकऱ्यांसाठी कोणकोणते घटक कोणकोणत्या योजनांसाठी उपलब्ध आहेत ते पाहूया.

1.कृषी यांत्रिकीकरण- यामध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर, मनुष्य बैलचलित अवजारे, स्वयंचलित यंत्र, अवजारे, प्रक्रिया युनिट, ट्रॅक्टर व पावर टिलर,यंत्र अवजारे भाडेतत्त्वावर कृषी यंत्र अवजारे, सेवा पुरवठा केंद्राची उभारणी इत्यादी कृषी यंत्र व अवजारे उपलब्ध आहेत. 2.सिंचन साधने व सुविधा- सूक्ष्म सिंचन( ठिबक व तुषार सिंचन),शेततळे, शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरण, पाईप पंपसेट, इंजिन इत्यादी.

3.बियाणे औषधे व खते- विविध पिकांसाठी लागणारे प्रमाणित बियाणे विविध औषधे आणि जैविक व रासायनिक खते इत्यादी. 4.फलोत्पादन- फळबाग लागवड काढणीपश्‍चात व्यवस्थापन, रोपवाटिका कांदाचाळ, संरक्षित शेती( हरितगृह शेडनेट गृह) एकात्मिक शेतीचा प्रकल्प, प्रक्रिया प्रकल्प इत्यादी फलोत्पादन विषयक सर्व बाबी.

5.अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना- नवीन विहीर बांधणे, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोरींग, सूक्ष्म सिंचन( ठिबक व तुषार सिंचन) शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण, पाईप पंपसेट,इंजिन, परसबाग, वीजजोडणी आकार इत्यादी( बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना( आदिवासी उपयोजना क्षेत्र अंतर्गत व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील) आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत अनुज्ञेय बाबी).

त्यानंतर मित्रांनो ऑनलाइन कृषी योजनांसाठी अनुदान मिळवण्यासाठी जो अर्ज करायचा आहे त्यासाठी शासन शुल्क देखील आकारणार आहे तर त्यासाठी लागणारे शुल्क किती आहे ते पहा. अर्ज सादर करतेवेळी शेतकऱ्याने रू.20/- व रू. 3.60/- जीएसटी मिळून एकूण रू.23.60/- शुल्क ऑनलाइन भरावयाच्या आहे.

तदनंतर महा आयटी महामंडळाकडे शेतकऱ्यांचा अर्ज पुढील प्रक्रिये करीता पाठविला जाईल. अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत शेतकऱ्यांना अर्जात निवडलेल्या बाबींमध्ये विनाशुल्क बदल करता येईल( नवीन बाबींच्या अर्जात समावेश करणे, अथवा अर्जात समाविष्ट केलेल्या बाबी वगळणे) परंतु, मुदत संपल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही.

मित्रांनो यानंतर जे शेतकरी विविध योजनांतर्गत ऑनलाईन अर्ज करतील त्या शेतकऱ्यांना सोडत पद्धतीने लाभ देण्यात येणार आहे.याबाबतची माहिती पाहुयात. एकत्रित संगणकीय सोडत: महाडीबीटी पोर्टलवर कृषी विभागाने विकसित केलेल्या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या कोणत्याही विशिष्ट योजनेस अर्ज घेण्यात येत असून तो शेती निगडित विविध बाबींसाठी घेण्यात येत आहे

आणि त्या बाबींकरिता कोणत्या योजनेतून लाभ देता येईल, याबाबत संगणकीय प्रणाली एकत्रित सोडतीमध्ये निर्णय घेईल. महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी तालुकास्तरावर एकत्रित संगणक सोडत काढण्यात येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नसून त्यांनी अर्ज केलेल्या बाबी ज्या योजनेतून उपलब्ध असतील त्या सर्व योजनांसाठी अर्जाचा विचार केला जाईल.

शेतकऱ्यांनी( वैयक्तिक शेतकरी व गट/FPOs) अर्ज केलेल्या विविध बाबींची तालुकास्तरावर एकत्रित संगणकीय सोडत काढण्यात येईल. तथापि, ज्या घटकांसाठी/ प्रवर्गासाठी तालुकास्तरावर पुरेसा आर्थिक लक्षांक उपलब्ध होणार नाही त्यासाठी जिल्हास्तरावर संगणकीय सोडत काढण्यात येईल.

संगणकीय सोडतीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर लघुसंदेश द्वारे त्यांच्या निवडीबाबत अवगत करण्यात येईल आणि त्या सोडतीमध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली नसेल त्यांना प्रतीक्षा यादीत क्रमवारीनुसार ठेवण्यात येईल. शेतकऱ्याचे अर्ज घटक/ बाब या लक्षात घेण्यात येत असून

संगणकीय सोडत प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जातील बाबी विविध प्रचलित योजनेतून मंजूर करण्यात येतील. तर मित्रांनो अशाप्रकारे शासनाने आता www.mahadbt.gov.in हे संकेतस्थळ बनवलेली असून त्यात संकेस्थळावर शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांसाठी तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील योजनांसाठी एकत्रित अर्ज सादर करता येणार आहे. GR च्या लिंक करता कमेंट मध्ये कळवा लिंक टाकली जाईल.

सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती हीसध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आता मोठा बदल ।। अर्ज कुठे करावा, फी किती लागेल इ. ।। जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया !

  1. मी गेल्या 4 वर्षापासून कान्द चाळ साठी अर्ज करतोय परंतू
    मला अजुनही कान्दा चाळ मंजूर होत नहिये काय करावे

Comments are closed.