मजुरी ते आज करोडोंचा व्यवसाय करणारे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स असे अनेक नावलौकिक मिळवणारे ‘रामदास माने’ या यशस्वी उद्योजकाची संघर्षमय गाथा !!

Uncategorized

परिस्थिती कधीच माणसाला बदलू शकत नाही, उलट जी परिस्थिती आहे त्या मध्ये त्याला मदत करणाऱ्या व्यक्तीचे चांगले गुण हेच त्या माणसाला सक्षम बनवतात. यशस्वी बनवतात. अशाच एका भल्या माणसाच्या मदतीमुळे आज एक मजूर अतिशय उत्तम व्यावसायिक बनला आहे. त्या व्यावसायिकाच नाव आहे रामदास माने. रामदास माने हे सातारा जिह्यातील मान तालुक्यातील लोढवडे या गावचे.

साताऱ्यापासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात अजून देखील बस जात नाही. साताऱ्यातील मान तालुका, खटाव तालुका हे अतिशय दुष्काळी तालुके म्हणून ओळखले जातात, तिथे सात सात वर्षे पाऊस पडत नाही. अशा गावात रामदास माने राहत होते, वडिलांकडे २० गुंठे शेती होती. घर हे वडिलोपार्जित बांधलेलं, लाकूड आणि माती पासून बनवलेलं. मात्र पावसामुळे लाकूड सडले आणि घर पडलं. वडिलांनी शेतात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला.

शेत हे गावापासून सात किलोमीटर दूर डोंगराच्या पायथ्याशी होत. तिथेच त्यांनी राहायला सुरू केलं. आई सोबत शेतात काम करताना त्यांना जाणवलं की या रखरखत्या उन्हात आपण कांम करू शकत नाही, त्यांनी त्यांच्या आईला मला शाळेत जायचंय अस सांगितल, आई ने त्यांना शाळेचा गणवेश घेऊन दिला आणि शाळेत पाठवलं. सातवी झाली, तेव्हा १९७२ चा काळ चालू होता, खूप मोठा दुष्काळ पडला होता. लोकांना खायला अन्न नव्हतं, जनावरांना चारा नव्हता.

अशातच त्यांचे वडील त्यांना म्हणाले शाळा सोडून दे आणि कामाला जा, पण ते म्हणाले मला शाळा शिकायची आहे मी नाही शाळा सोडणार. त्यांचे आई वडील रोजगार हमी च्या कामाला जात असत. अशातच एकदा लोढवडे गावानजीक एक ओढ्याच काम सुरू झालं. रामदास माने तिथे गेले, तेथील इंजिनिअर आणि प्रभारी, मुल्ला साहेब यांना ते भेटले, व त्यांना म्हणू लागले, साहेब मला शाळा शिकायची आहे, वह्या पुस्तक घेता येतील एवढेच पैसे पाहीजेत मला काम द्या.

परंतु मुल्ला साहेबांनी त्यांना, अरे बाळा तुझं वय काय अस विचारलं. त्यावर उत्तर देत माने म्हणाले, तेरा वर्ष, पण साहेब मी मोठ्या माणसाएवढंच काम करेल, मला शाळा शिकायची आहे. मुल्ला साहेब म्हणाले, ठीक आहे. आणि त्यांनी त्यांच्या  सुपरवायझर ला सांगितलं की याला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा याला काम द्या. दुसऱ्या दिवशी ते कामावर गेले, सुपरवायझर ने त्यांना 10 बाय 15 चा खड्डा खोदण्यासाठी आखून दिला.

रामदास यांनी फावडे, टोपली आणि कुदळ घेतली आणि सलग दीड तास न थांबता काम केलं, मात्र वयाच्या मानाने दीड तासानंतर ते थकले आणि खाली बसले व मुल्ला साहेबांना म्हणाले साहेब मला दहा मिनिटाचा ब्रेक द्या मी परत काम करतो, आता मात्र मुल्ला साहेबांना या पोराचं कौतुक वाटू लागले, कारण जे काम मोठी माणसं दिवसभऱ्यात करतात ते या पोरानं दीड तासात केलं होतो, त्यांनी रामदास यांना ते सांगितलं आणि घरी पाठवलं.

त्यांच्या सुपरवायझर ला त्यांनी सांगितलं की या पोराला येईल तेव्हा कामाला घ्या. आणि याची जी काही मजुरी असेल ती त्याला द्या. तेव्हा पासून दहावी पर्यंत रामदास माने जमेल तसं त्यांच्या कडे रोजगार हमी च्या कामासाठी जात असत. ते म्हणतात की मुल्ला साहेबांनी काम दिल म्हणूनच मी दहावी पर्यंत शिक्षण घेऊ शकलो. त्या काळात फारसे मीडिया उपलब्ध नव्हते त्यामुळे दहावी नंतर काय करायचं याच मार्गदर्शन करणार कुणी नव्हतं. त्यांच्याच गावातील एक गृहस्थ जनार्दन लोहार जे तेव्हा B.Com  झाले होते.

त्यांच्याकडे हे गेले व त्यांना विचारलं की आता काय करायचं, त्यावर त्यांनी रामदास माने यांना सांगितलं की चार पाच वर्षांनी आपल्या गावात वीज येणार आहे, तेव्हा बटन दाबली की लाईट लागते, तू त्याचा कोर्स कर. ते घरी आले व आई ला सांगितलं, आई मी उद्या सातारा ला जाणार आहे, आईने त्यांना एक पेटीत स्टोव्ह, तांब्या, ताट, आणि भाकरी च पीठ भरून दिल. दुसऱ्या दिवशी ते सातारा ला आले, तिथे चौकशी केल्यावर त्याना कळलं की कॉलेज इथून 7-8 किलोमीटर आहे, ते ती पेटी डोक्यावर वर घेऊन तिथवर चालत गेले.

तिथे गेल्यावर एका वॉचमन ला विचारलं, मला बटन दाबली की लाईट लागते त्याचा कोर्स करायचा आहे, त्यांनी रामदास यांना आत जाऊन भेटायला सांगितलं, तेथील एका शिक्षकांना ते भेटले त्यांना पण त्यांनी हेच सांगितलं, मला बटन दाबली की लाईट लागते त्याचा कोर्स करायचा आहे, त्या शिक्षकांनी रामदास यांना वायरमन साठी अर्ज करायला सांगितला. अर्ज केल्यावर जवळपास आठ दिवसांनी त्यांना कॉलेज कडून पत्र आलं.

त्यांची मुलाखत झाली. त्यांना प्रवेश मिळाला. पण त्यांचे कोणीही नातेवाईक सातारा मध्ये राहत नसल्याने त्यांच्या राहण्याची सोय होत नव्हती. रात्री ते बस स्टँड वर झोपत असत, परंतु एक दिवस पोलिसांनी त्यांना तिथून उठवलं, ते बस स्टँड बाहेर जाऊन पोलीस जाण्याची वाट पाहू लागले व ते गेल्यावर हे परत तिथेच जाऊन झोपले. परंतु हे किती दिवस चालणार होत? म्हणून दुसऱ्या दिवशी ते बस कॅन्टीन मध्ये शेट्टी साहेबांना जाऊन भेटले व त्यांना त्यांची अडचण सांगून काम देण्यास विनवणी केली.

शेट्टी साहेबांनी त्यांना रात्री 11 ते सकाळी 5 या वेळेत कॅन्टीन मध्ये काम करण्यास सांगितले, रामदास माने सांगतात की मला ही गोष्ट सांगताना अभिमान वाटतो की मी दिवसा ITI च शिक्षण घेत होतो आणि रात्री कॅन्टीन मध्ये वेटर च काम करत होतो. आणि अस करतच दोन वर्षे गेली आणि रामदास माने ITI मध्ये ८२% गुण मिळवून प्रथम आले. त्यांना त्यांच्या मुख्याध्यापकांनी  महिंद्रा कंपनी, पुणे; कूपर  कंपनी, सातोड आणि एका मुंबई च्या कंपनी चे एप्रेंटीस  चे पत्र त्यांच्या हातात दिल.

पुण्याला जायचं म्हटलं तर बरेच पैसे लागणार होते, रामदास यांनां महिन्याला फक्त 3 रुपये मिळत होते. आता काय करायचं म्हणून त्यांनी त्यांच्या आजीकडे जाऊन पैसे मागायचे ठरवले त्यांचा आजीचं गाव हे साताऱ्यापासून ४५ किलोमीटर होत. दुसऱ्या दिवशी ते सायकल ने आजीकडे गेले व तिला २० रुपये मागितले. परंतु आजीकडे देखील एवढे पैसे नव्हते, पण नातवाच हट्ट पाहून आजीने तरतूद केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते रामदास यांना दिले, ते साताऱ्याला परत आले, कॅन्टीन मधून त्यांची सामानाची पेटी घेतली व पुणे गाठलं.

महिंद्रा मध्ये त्यांची मुलाखत झाली, व तेथील साहेबांनी त्यांना आठ दिवसांनी कळवतो असे सांगितले, रामदास त्यांना म्हणाले साहेब मी आजीकडून २० रुपये उसने घेऊन आलोय, तुम्ही जर मला परत आठ दिवसांनी बोलवलं तर परत यायला माझ्याकडे पैसे नाही, तुमचा काय निर्णय असेल तो आत्ताच सांगा, मी संध्याकाळ पर्यंत थांबायला तयार आहे. साहेब म्हणाले, ठीक आहे. रामदास संध्याकाळ पर्यंत तिथेच बसून राहिले. संध्याकाळी त्यांना त्यांची निवड झाल्याचं कळलं.

त्या साहेबांनी त्यांच्या हातात १०० रुपये दरमहा  स्टीपेंड च पत्र दिल. रामदास यांनी ते घेतल त्यांची पत्र्याची पेटी घेतली, व जिकडे रस्ता मिळेल तिकडे चालत गेले, एका पाण्याच्या टाकीखाली राहून त्यांनी एक वर्ष काढलं, व एप्रेंटीस पूर्ण केली, त्यात देखील ते ८८% गुणासह प्रथम आले व त्यांना महिंद्रा कंपनी मध्ये पर्मनंट नोकरी मिळाली. गरिबीचे दिवस जाऊन सुखाचे दिवस आले, आर्थिक परिस्थिती सुधारली. नोकरी करत असतानाच रामदास यांनी पूढील शिक्षण पूर्ण केलं, ते कंपनी  मध्ये इंजिनीअर झाले, मॅनेजर झाले.

परंतु रामदास यांना स्वतः व्यवसाय करायचा होता. रामदास यांनी भोसरी मधील सर्व वर्कशॉप मध्ये काम केलं, अनुभव मिळवला. व स्वतः व्यवसाय सुरू केला. हळू हळू त्यांच्या व्यवसाय वाढु लागला व एक दिवस त्यांना चेन्नई वरून फोन आला, त्यांना बोर्ड ऑफ डायरेक्टर च्या मीटिंग साठी बोलवल्या गेले. ते चेन्नई ला गेले, मीटिंग झाली व रामदास यांना सहा लाख रुपयेची ऑर्डर मिळाली. रामदास माने चेन्नई वरून परत आले. आता रामदास माने यांचा व्यवसाय भरभराटीला आला होता.

आज भारतामध्ये चेन्नई पासून दिल्ली पर्यंत आणि मुंबई पासून कलकत्ता पर्यंत जे पण थर्माकॉल बनत त्यातलं ८०% थर्माकॉल हे रामदास माने यांच्या कंपनी मधल्या मशीन मध्ये बनत. भारताला त्यांनी १२८ प्रोजेक्ट दिले, १२००० लोकांना रोजगार मिळवून दिला. एवढंच नव्हे तर पंचवीस देशामध्ये ३५२ प्रकल्प निर्यात केले. जगातला सर्वात मोठा प्रोजेक्ट देऊन गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. आणि जगातलं सर्वात मोठं मशीन बनवल त्यांची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली. रामदास माने म्हणतात, मी एका खेड्यातुन आलो आणि आज इथवर पोचलो, तुम्ही पण मेहनत करा, जिद्द जर असेल तर परिस्थिती काहीही असो माणूस यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही हा माझा विश्वास आहे.