विदेशातील लाखोंची नोकरी सोडून रेशीम उद्योगाला महाराष्ट्रात वेगळे स्थान मिळवून देणाऱ्या पाटील दाम्पत्याची ‘रेशमी यशोगाथा’ !!

अर्थकारण लोकप्रिय शेती

महाराष्ट्रात रेशीम कोषाच उत्पादन तर होत मात्र रेशीम प्रक्रिया महाराष्ट्रात होत नसल्याने शेतकऱ्यांना कर्नाटकातल्या रामनगर बाजारपेठ वर अवलंबून राहावे लागत असे, परंतु हे पद्धत मोडीत काढली आहे साताऱ्याच्या एक दाम्पत्याने. त्यांचं नाव आहे सुप्रिया आणि समीर पाटील. रेशीम कोषाला बाजारपेठ देणारा आणि त्यावर प्रक्रिया करणारा कदाचित हा महाराष्ट्रातला एकमेव उद्योग असेल.

इथे वर्षभरात पंचवीस टन रेशीम कोषापासून धागा निर्मिती केली जाते. तसेच शेतकऱ्यांना रामनगर बाजारपेठे इतकाच भाव देखील दिला जातो. कराड तालुक्यातील वाठार या गावचे समीर पाटील यांनी २००६ साली जीवशास्त्रात पदवि घेतली. यानंतर २००९ साली MBA पूर्ण केले. परंतु नोकरी करण्याऐवजी त्यांनी शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली.

रामनगर बाजारपेठेत रेशीम कोषाला भाव चांगला मिळत होता, मागणी ही होती परंतु तेथील मक्तेदारी समीर पाटील यांना खटकू लागली आणि हीच मक्तेदारी मोडुन काढण्यासाठी २०१४ साली त्यांनी स्वतः रेशीम प्रक्रिया उद्योग चालू करण्याचं ठरवलं. यामध्ये त्यांना साथ दिली ती म्हणजे त्यांची पत्नी सुप्रिया ह्यांनी. एम एस.सी.मायक्रोबायोलॉजी केल्यानंतर सुप्रिया यांनी जर्मनी आणि पुण्यात कनिष्ठ संशोधक म्हणून काम केलं. २०१३ साली लग्नानंतर त्यांनी रेशीम उद्योगात लक्ष घालायला सुरूवात केली.

गावातील सोळा महिलांना एकत्र करून आराध्या महिला बचत गट चालू केला. बंगलोर मधील कारागिरांकडून या महिलांना धागा निर्मितीच प्रशिक्षण दिलं. धागा निर्मितीची आधुनिक यंत्र खरेदी केली आणि धागा निर्मिती व्यवसाय सुरू केला. साताऱ्यासह आसपास च्या गावातील शेतकरी इथे रेशीम घेऊन येतात, यानंतर याच वजन केलं जातं, व ग्रेडिंग केलं जातं, एक किलोमध्ये किती कोष बसतात त्याप्रमाणे याच ग्रेडिंग होत. जसे की एक किलोत ६०० कोष बसले तर A ग्रेडिंग, याला 300 रुपये प्रतिकिलो भाव मिळतो.

६०१ ते ७०० कोष बसले ते B ग्रेडिंग, याला २७० रुपये प्रतिकिलो भाव मिळतो, तर ७०१ ते ८०० कोष बसले तर C ग्रेडिंग दिल जात याला २४० रूपये प्रतिकिलो भाव मिळतो. याप्रमाणे मोजमाप करून शेतकऱ्यांना लगेच पैसे दिले जातात, तसेच रामनगर बाजारपेठेतील भाव वाढल्यास त्याप्रमाणे इथेही भाव दिला जातो. कोष विकत घेतल्यानंतर सर्व प्रथम त्यातील खराब कोष बाजूला काढले जातात, त्यानंतर ते एक तासासाठी ड्रायर मध्ये सुकवले जातात. नंतर कूकिंग विभागात पाठवले जातात.

इथे कोषापासून धागा स्वतंत्र होतो. यानंतर हे कोष मशीन वर घेतले जातात, तिथे पाच ते सहा कोषापासून धागा बनवला जातो. आणि मग तो धागा बॉबीन वर गुंडाळला जातो. तो धागा सुकवला जातो आणि दुसऱ्या लडी वर गुंडाळला जातो. एका लडीच वजन हे दीडशे ग्रॅम असत. एक किलो रेशीम निर्मिती साठी सात ते आठ किलो कोष लागतो. तसेच एका दिवशी बारा ते पंधरा किलो रेशीम निर्मिती होते. त्यासाठी दिवसाला ऐंशी ते नव्वद किलो कोष लागतात.

समीर पाटील यांनी घराजवळच असलेल्या इमारतीत हा उद्योग सुरू केला, त्यासाठी त्यांना पंधरा लाख रुपये खर्च आला त्यातही त्यांना सरकारकडून ७५% अनुदान मिळालं त्यामूळे त्यांना फक्त चार लाख रुपये खर्च लागला. अभिलाषा सिल्क अँड प्रॉडक्ट्स या नावाने समीर यांनी फर्म उभी केली,आणि कोष विक्री पेक्षा धागा निर्मिती ला प्राधान्य दिलं. रेशीम धागा निर्मिती मध्ये नफा कसा मिळतो ते पाहू.

सात किलो कोषापासून एक किलो रेशीम निर्मिती होते, ३०० रुपये किलो प्रमाणे २१०० रुपये कोषाला लागतात, ४०० रुपये मजुरी आणि इतर खर्च लागतो. या तयार केलेल्या रेशीम लडीला बाजारामध्ये २८०० ते ३००० रुपये किलो प्रमाणे भाव मिळतो. म्हणजेच किलो मागे ३०० ते ५०० रुपयांचा नफा शिल्लक राहतो. याप्रमाणे महिन्याला समीर पाटील यांना ७०-८० हजार रुपये निव्वळ नफा मिळतो. पारंपरिक व्यवसायात अडकून पडण्यापेक्षा समीर आणि सुप्रिया यांनि  रेशीम उद्योग ला प्राधान्य दिलं.

आणि स्वतः च्या आर्थिक उत्पन्नाबरोबरच शेतकऱ्यांच्या कोषाला भाव आणि महिलांना रोजगार मिळवून दिला. त्यामुळे साताऱ्यातील वाठार येथील रेशीम हा एक नविन ब्रँड बनत आहे. कमी खर्चात, कमी वेळेत आणि कमी जागेत हा व्यवसाय करता येतो. तसेच नोकरदाराप्रमाणे महिन्याला चांगलं उत्त्पन्न देखील मिळत. रेशीम कोष निर्मिती साठी जगामध्ये  जास्तकरून तुतीची शेती केली जाते. महाराष्ट्रामध्ये बीड, पुणे, सातारा सांगली हे जिल्हे कोष निर्मिती मध्ये अग्रेसर आहेत.

रेशीम अळ्यांच पालन हे  बंदिस्त जागेमध्ये केल जात, त्यामुळे ऊन वारा पाऊस याचा यावर जास्त परिणाम होत नाही. रेशीम किड्याच्या अळीपासून ते कोष तयार होई पर्यंत ३०-३२ दिवसांचा कालावधी लागतो. तुतीची झाडं ही १५-२० वर्ष टिकू शकतात, त्यामुळे दरवर्षी लागवडीचा खर्च देखील वाचतो. सरकारही या उद्योगाच्या वाढीसाठी नियोजनबद्ध योजना आखत आहे. रेशीम धाग्याचा शोध चीन मध्ये लागला, कोरिया मध्ये याला लोकाश्रय मिळाला.

जपान, इटली आणि फ्रान्स मध्ये त्याचा प्रसार झाला त्यामुळे परदेशात देखील याची खूप मागणी आहे म्हणूनच याचा भाव बाजारात नेहमी चढताच राहतो. रेशीम उद्योगामध्ये मध्ये काहीही वाया जात नाही, रेशीम किड्यांची विष्टा ही दुभत्या जनावरांना सुग्रास प्रमाण खाद्य म्हणून वापरली जाते, तुतीच्या वाळलेल्या काड्यांचा इंधन म्हणून किंवा खत म्हणून वापर होतो. तुतीच्या पानांमध्ये जीवनसत्व भरपूर असल्यानं तुतिचा पाला, रेशीम कोष आणि प्युपा हा आयुर्वेदिक दृष्टीनं महत्वाचा आहे. प्युपाचा आयुर्वेदिक औषध आणि सौंदर्य प्रसाधन यामध्ये उपयोग केला जातो. यासर्व कारणामुळे रेशीम कोषाला विदेशी बाजारात देखील मोठी मागणी आहे. आणि म्हणूनच हा उद्योग शेतकऱ्यांना तसेच नवीन व्यासायिकांना फायदाचा ठरू शकतो.