दुष्काळावर मात करण्यासाठी काळाची गरज – ‘विहीर पुनर्भरण’ ।। प्रत्येक शेतकऱ्याने नक्की करावे असे उपाय !!

बातम्या शेती

भारतासारख्या शेतीप्रधान देशात वर्षातील बरेच महिने दुष्काळाचं सावट असतं, नदी, नाले, विहिरी यांचं पाणी आटून जातं, मराठवाडा मध्ये तर महिलांना पाण्यासाठी मैलोमेल पायपीट करावी लागते, आणि जेव्हा पाऊस येतो तेव्हा मात्र पावसाचं सगळं पाणी वाहून जात, विहिरी मात्र कोरड्याच राहतात. परंतु पावसाचं हेच पाणी जर विहिरीत सोडलं तर विहिरींची पाणी पातळी वाढू शकते.

हे पावसाचं पाणी विहिरीत सोडण्याच्या प्रक्रियेला विहिर पुनर्भरण अस म्हणतात. विहीर पुनर्भरण प्रक्रियेची रचना सात भागात केली आहे, त्यातला पहिला भाग म्हणजे इनलेट चर, नाला आणि या रचनेला जोडणारा भाग इनलेट चर म्हणून ओळखला जातो, हा भाग विहिरीपेक्षा थोड्या उंचीवर असतो जेणेकरून उतारामुळे पाणी  विहिरीत जाईल, दुसरा भाग म्हणजे साठवण खड्डा, या खड्ड्यात इनलेट चर मधून येणार पाणी जमा होत.

इथे पाणी बऱ्यापैकी शांत होतं, आणि त्यातला गाळ खड्ड्याच्या तळाशी बसतो, तिसरा भाग म्हणजे फिल्टरेशन टाकी आणि साठवण खड्डा यांना जोडणारा चर, चौथा भाग आहे फिल्टरेशन टाकी, पाण्यातील अशुद्धी आणि इतर माती साफ करण्यासाठी फिल्टरेशन टाकी चा उपयोग होतो. पाचवा आहे फिल्टरेशन टाकी आणि विहीर यांना जोडणारा चर. सहावा आहे ओव्हरफलो आउटलेट चर, हा चर पुन्हा नाल्याला जाऊन मिळतो.

आणि शेवटचा आणि सातवा भाग आहे नाल्यावर बांधलेला बांध या बांधच उद्दिष्ट आहे नाल्याचे पाणी अडवून ते विहीर पुनर्भरण रचनेत वळवणं. विहीर पुनर्भरण प्रक्रियेची रचना करताना काही गोष्टीचं काटेकोर पालन करावे लागत तसेच या साठी निवडण्यात येणारी जागा कशी असावी याबद्दल माहिती असणं देखील तितकंच महत्वाचं आहे. विहीर आणि नाला यांच्या मधील जागा विहीर पुनर्भरण रचनेसाठी उपलब्ध असावी.

या रचनेची  लांबी साधारणतः तेरा मीटर इतकी असते त्यामुळे विहीर आणि नाला यातील अंतर कमीतकमी तेरा मीटर असेल अशीच जागा निवडावी. आजूबाजूच्या भागात दोन ट्रॉली भरतील इतके मोठे आणि दोन ट्रॉली भरतील इतके छोटे दगड असावेत, जर ते उपलब्ध नसतील आणि जागा या रचनेसाठी योग्य असेल तर दगड विकत घेण्यास हरकत नाही. विहिरीच्या काठांची जमिनीवरील पातळी ही ज्या ठिकाणावरून पाणी विहिरीत वळवायचे आहे त्याच्या काठाइतकी किंवा त्यापेक्षा कमी असावी.

यामुळे उतार तयार होऊन पाणी विहिरीकडे सहज जातं. या सर्व गोष्टी विहीर पुनर्भरण रचनेसाठी महत्वाच्या आहेत. तसेच नाला आणि विहिर यामधील जागा खडकाळ असेल आणि तिथे 2 मीटर खोली पर्यंत खोदकाम करणं शक्य नसेल तर अशी जागा या रचनेसाठी निवडू नये. या रचनेसाठी लागणार साहित्य खालील प्रमाणे आहे, विहिर पुनर्भरण प्रक्रियेची रचना करण्यासाठी पुढील साहित्य उपलब्ध असल्याची खात्री करून घ्यावी. १.दोन ट्रॉलीभर मोठे गोलाकार दगडं.

२.दोन ट्रॉलीभर छोटे गोलाकार दगडं. ३.अर्धी ट्रॉलीभर वाळु जी नाल्यातून ही मिळू शकते. ४.तीस मीटर लांबीची मेजरिंग टेप. ५.खुणा करण्याकरता खडू पावडर म्हणजेच फक्की ६.खोदण्यासाठी कुदळ आणि फावडे. ७.माती  उचलण्यासाठी घमेली. ८.सहा इंच व्यासाचा, सहा मीटर लांब पी वी सी पाईप ९.लाल रंगाचा ऑईल पेंट चा डब्बा आणि पेंट ब्रश. या रचनेची  आखणी ही सरळ रेषेत करावी.

जेणेकरून नाल्याच्या प्रवाहाला अडथळा येणार नाही, तसेच जमिनीची धूप होण्याचा संभाव्य धोका टाळता येईल. परंतु जर का या रेषेत एखादा विद्युत वाहिनी खांब असेल किंवा एखादं झाड असेल किंवा एखाद बांधकाम असेल तर तज्ज्ञांच्या सल्याने या आखणीत थोडाफार बदल करता येऊ शकतो. पण रचनेची आखणी सरळ रेषेत करण्यालाच प्राधान्य द्यावे. फिल्टरेशन टाकी ला विहिरीसोबत जोडणारा चराच आकारमान हे लांबीला 5 मीटर आणि रुंदीला दीड फूट असावे.

फिल्टरेशन टाकी ही दोन मीटर लांब आणि दोन मीटर रुंद असावी, साठवण खड्डा आणि फिल्टरेशन टाकी ला जोडणारा चराची लांबी दोन मीटर आणि रुंदी नव्वद सेंटीमीटर असावी. तर साठवण खड्डा तीन बाय तीन मीटर चा असावा, तसेच नाला आणि साठवण खड्डा यामध्ये उरलेल्या अंतरात इनलेट चर करावा, त्यांची रुंदी नव्वद सेंटीमीटर असावी. ओव्हरफलो आउटलेट चर हा देखील नव्वद सेंटीमीटर रुंदीचा असावा व लांबी जेवढी उपलब्ध असेल तेवढी करावी. 

विहीर पुनर्भरण रचना करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे विहीर आणि नाला यातील लांबी कमीत कमी 13 मीटर असावी जे शासकीय निकषावरून ठरवले आहे पण जर असे शक्य नसल्यास फिल्टरेशन टाकी आणि विहीर यांना जोडणाऱ्या चराची लांबी कमी करता येईल,पण ही दोन मीटर पेक्षा कमी असू नये व यासाठी कोणतंही शासकीय अनुदान मिळणार नाही याची नोंद घ्यावी. या रचनेची आखणी करताना ती सरळ रेषेत येईल याची दक्षता घ्यावी, त्यासाठी विहीर आणि नाला यामाध्ये जिथे ही रचना करायची आहे तिथे मेजरिंग टेप धरून विहिरपासून पाच मीटर, दोन मीटर, दोन मीटर, तीन मीटर असे क्रमशः बिंदू आखावेत.

नंतर या बिंदू च्या सहाय्याने रचनेप्रमाणे फिल्टरेशन टाकी आणि विहिरीला जोडणारा चर, फिल्टरेशन टाकी, फिल्टरेशन टाकी आणि साठवण खड्ड्याला जोडणारा चर, साठवण खड्डा, इनलेट चर आणि ओव्हरफलो आउटलेट चर खडू च्या साहाय्याने आखून घ्यावे. हे सर्व झाल्यावर नाल्यावर जिथे इनलेट चर आहे तिथून खाली एक ते दोन मीटर  अंतरावर  भौगोलिक रचना पाहून बांध घालावा, स्थानिक परिस्थिती, उपलब्ध साधन सामग्री व खर्च लक्षात घेऊन हा बांध दोन प्रकारे बांधता येऊ शकतो, एक म्हणजे मुरूम आणि दगड यांच्या मदतीने बांधलेला बांध आणि दुसरा म्हणजे एल बी एस. बांध बांधताना एक गोष्ट लक्षात घ्यावी जर नाल्याची रुंदी दहा मीटर पेक्षा जास्त आणि खोली दिड मीटर पेक्षा जात असेल तर मात्र बांध बांधताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

बांधामुळे पावसाचं पाणी तिथे अडून ते शांत होईल व विहीर पुनर्भरण रचनेत जाईल. या रचनेच खोदकाम मनुष्यबळाच्या साहाय्याने किंवा जे सी बी च्या साहाय्याने करु शकता परंतु जर तुम्हाला मनरेगा या शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मात्र हे खोदकाम मनुष्यबळाने च करावं. खोदकाम करताना आखणीप्रमाणेच विहिरपासून नाल्याकडे खोदत न्यावे, खोदकामात निघालेली माती आणि दगड तसेच बाजूला ठेवावे ते आपल्याला नंतर उपयोगी येतील, फिल्टरेशन टाकी आणि विहिरीला जोडणारा चर व फिल्टरेशन टाकी दोन मिटर खोल करावे, फिल्टरेशन टाकी आणि साठवण खड्ड्याला जोडणारा चर खोदताना तो अश्या प्रकारे खोदावा की त्याचा तळ साठ सेंटीमीटर इतका होईल आणि खोली एक फूट ठेवावी. साठवण खड्डा देखील दोन मीटर खोल करावा.

इनलेट चराची खोली ही नाल्याच्या खोली पेक्षा अर्धा ते एक मीटर कमी असावी, हा चर देखील तळाला साठ सेंटीमीटर रुंद होईल असाच खोदावा. ओव्हरफलो आउटलेट चर हा एक फूट खोल आणि तळाशी साठ सेंटीमीटर असा खोदावा, तळ लहान केल्यामुळे चराच्या बाजू उताराच्या राहतील. आता बांधकाम करताना सर्वप्रथम इनलेट चर आणि नाल्याच्या तोंडाजवळ दोन ते तीन मोठे दगड ठेवावे ज्यामुळे नाल्यातून आलेला कचरा आणि गाळ नाल्याच्या तोंडाशीच अडकेल, यानंतर साठवण टाकीत खाली अर्धा मीटर उंचीपर्यंत छोट्या दगडाने भरून घ्यावेत त्यावर एक मिटर उंचीपर्यंत मोठे दगड टाकावेत व उरलेला भाग तसाच राहू द्यावा.

फिल्टरेशन टाकी आणि साठवण टाकी तसेच फिल्टरेशन टाकी तशीच राहू द्यावी, सहा मीटर लांबीचा आणि सहा इंच व्यासाचा पाईप फिल्टरेशन टाकी आणि विहीर यामध्ये टाकून घ्यावा, हा पाईप लावताना त्याच एक टोक हे विहिरीच्या भिंतीच्या एक मीटर बाहेर ठेवा यामुळे पाईप मधून येणार पाणी विहिरींच्या भिंतीला स्पर्श न करता सरळ विहिरीत जाईल, तसेच पाईपच्या दुसऱ्या टोकाच्या आजूबाजूला माती किंवा चिखलाच्या साहाय्याने फिट करून घ्या जेणेकरून टाकीतील पाणी हे फक्त पाईप मधूनच विहिरीत जाईल.

पाईपाच्या तोंडाशी छोटे दगड व त्याच्या तोंडाच्या आकारापेक्षा थोडा मोठा दगड त्यातून पाणी सहज जाईल अश्या प्रकारे ठेवा. पाईप वर दबाव येऊन तो फुटू नये तसेच त्यात माती जाऊन त्याच तोंड बंद होऊ नये म्हणून हे करणं गरजेचं आहे, हे झाल्यावर हा चर मातीने झाकून टाका. फिल्टरेशन टाकीत सर्वप्रथम मोठ्या दगडांचा, त्यावर छोट्या दगडांचा व त्यावर वाळूचा थर लावा हे सगळे थर प्रत्येकी 42 सेंटीमीटर असावे, उरलेला भाग तसाच मोकळा राहू द्या.

वाळू आणि दगड हे चाळणी प्रमाणे काम करतात. राहिलेला ओव्हरफलो आउटलेट चर देखील तसाच राहू द्या. या विहीर पुनर्भरण रचनेमुळे नाल्याचे पाणी फिल्टर होऊन विहिरीत जाते त्यामुळे विहिरीला कोणतीही हानी पोचत नाही, हेच पाणी सरळ विहिरीत सोडल्यास पाण्यातील गाळ आणि कचरा विहिरीत जाऊन विहिरीला हानी पोहचू शकते. आजूबाजूच्या लोकांना इथे विहीर पुनर्भरण रचना आहे हे माहीत व्हावं व इतर धोका टाळण्यासाठी रचनेच्या बाजूने लाल ऑइल पेंट ने कमीतकमी चार ठिकाणी  खुणा करून घ्या. अशा प्रकारे विहीर ही पुनर्भरणासाठी तयार होईल आणि पाऊस येताच विहीर काठोकाठ भरेल. दरवर्षी पावसाळ्याआधी फिल्टरेशन टाकी व साठवण टाकीतील गाळ व कचरा साफ करून घ्यावा. टिप:पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे पुनर्भरण करू नये.