ग्रामसेवकांची कामे आणि कर्तव्ये कोणती? ।। ग्रामीण व्यवस्थेमध्ये नागरिक आणि सरकार यांच्यामध्ये जो दुवा समजला जाणाऱ्या ग्रामसेवकाची कामे जाणून घ्या भाग – २

लोकप्रिय शेती शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत ग्रामीण व्यवस्थेबद्दल. ग्रामीण व्यवस्थेमध्ये नागरिक आणि सरकार यांच्यामध्ये जो दुवा समजला जातो तो म्हणजे ग्रामपंचायत आणि याच ग्रामपंचायतीमध्ये अतिशय महत्त्वाचा अधिकार असतो तो म्हणजे ग्रामसेवकाचा आता या ग्रामसेवकांची कामे आणि कर्तव्ये कोणती आहे याची आज आपण माहिती घेणार आहोत.

सरकारी कामांची अंमलबजावणी कशा प्रकारे गावांमध्ये व्हायला पाहिजे याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांची कामे: महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961,महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 व त्याखाली राज्य शासनाने तयार केलेल्या नियमानुसार ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी

यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजना त्यांच्यासाठी सुधारित कार्य सूची देण्यात आली आहे. 1.प्रशासन 2.नियोजन 3.शेती विषयक योजना 4.कुटुंब कल्याण कार्यक्रम 5.कल्याणकारी योजना 6.गाव माहिती केंद्र 7.पशु संवर्धन विविध योजना 8.संकीर्ण 9.इतर कामे. हे मुद्दे सविस्तर मध्ये नेमके काय आहेत ते पाहूयात.

1.प्रशासन: 1.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 व त्याखाली राज्य शासनाने तयार केलेल्या नियमानुसार ग्रामसेवकाने ग्रामपंचायतीची कामे पाहणे, अभिलेख जतन करणे, नरेगा योजनेचे अभिलेख वेळोवेळी अद्ययावत करणे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 7 नुसार वर्षातून चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. त्याची नोटीस काढून संबंधितांना देणे, सभेचे कार्य, सभेमध्ये झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी व कार्य पूर्तता करणे हे काम पंचायतीच्या सहकाऱ्यांनी करावे हे ग्रामसेवकाला बंधनकारक आहे.

2.शासनाने व जिल्हा परिषदेने बसवलेले विविध कर वसूल करण्याचे आदेश सचिवांकडून प्राप्त झाल्यानंतर कर व फी यांची वसुली करणे. प्रत्येकी चार वर्षांनी कराची आकारणी करून 25 टक्के वाढ सुचवणे, ग्रामपंचायतीतील लेखापरीक्षणात निघालेल्या आक्षेपांची पुर्तता करणे व लेखापरीक्षकांनी दर्शविलेल्या आक्षेपांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेणे, ग्रामपंचायत हद्दीतील जमीन, रस्ते, इमारत सार्वजनिक जागा यांचे मोजमाप करणे व अभिलेख अद्ययावत ठेवणे.

जन्म, मृत्यू,विवाह नोंदणी इत्यादीबाबत रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार निबंधक म्हणून कर्तव्य पार पाडणे. गावातील विविध सहकारी सोसायट्या, दूध डेरी, स्थानिक स्वराज्य संस्था, बचत गट, महिला मंडळ प्राथमिक व माध्यमिक शाळा, स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत लोकोपयोगी कार्यक्रम राबविणे.

3.ग्रामपंचायतीच्या पातळीवर शासकीय निमशासकीय कर्मचार्‍यांना आठवड्यातून किमान तीन दिवस ग्रामपंचायत मध्ये एकत्रित आणून ग्रामपंचायतीच्या प्रश्नाची सोडवणूक करणे बाबत समन्वय साधणे व त्यावर आवश्यक ती कारवाई ग्रामसेवकांनी करायला पाहिजे.

सरपंच उपसरपंच यांना कायदेशीर विषयक सल्ला देऊन मदत करणे. ग्रामपंचायत काही नियमांची व कायद्यांचे उल्लंघन करत असेल तर त्याचा अहवाल गटविकास अधिकारी यांना विहित मुदतीत देणे. 4.ग्रामपंचायतीचे वार्षिक अहवाल तयार करून पंचायत समितीस मुदतीत पाठवणे. निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करणे.

5.ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी सोबत आस्थापनाविषयक जबाबदाऱ्या पार पाडणे तसेच त्यांच्या सेवा पुस्तके,वैयक्तिक नसत्या रजे चा हिशोब, भविष्य निर्वाह निधी बोनस इत्यादी शासनाच्या आदेशानुसार व नियमानुसार देणे. सेवा हमी कायदा नुसार दाखले विहित मुदतीत देणे. आता नियोजन मध्ये ग्रामसेवकाने ग्रामपंचायतीचे नियोजन कशाप्रकारे करायला पाहिजे याची विस्तृत माहिती आज आपण पाहणार आहोत.

2.नियोजन: 1.ग्रामपंचायतीचे सरपंच व सभासदांच्या सहकार्याने गावाचा विकास आराखडा तयार करणे, नियोजन करणे. रोजगार उपलब्धतेच्या दृष्टीने उद्योगधंद्यात वाढ करणे, रस्तेदुरुस्ती, सांडपाणी व्यवस्थापन, परिसर स्वच्छता, पशुधन विकास व बालकल्याण योजना साक्षरता मोहीम राबवणे,नरेगा व वित्त आयोग योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीचे उत्पन्न इतर प्रशासकीय व जिल्हा परिषद उपलब्ध होणारे अपेक्षित अनुदानाचा विचार करून ग्रामपंचायत चा विकास आराखडा तयार करणे.

2.पंचवार्षिक आराखडा तयार करीत असताना ग्रामपंचायती मार्फत राबविल्या जाणाऱ्या विकास योजनांवर लाभार्थी निवडीचे जानेवारी महिन्यात वार्षिक कृती आराखडा तयार करून एप्रिल-मे महिन्यात मध्ये होणाऱ्या ग्रामसभेत ठेवून मंजूर करून घेणे.

3.विकास कामाची वर्गवारी करून एकत्रित माहिती आणि योजनांचे नोंदी वेगळा ठेवून ग्रामपंचायत पातळीवर योजनांची अंमलबजावणी सुरळीत पणे करणे. शेती विषयक ग्रामसेवकाने कशी नियोजन करायला पाहिजे ते आता पाहू या.

3.शेती विषयक: 1.शासनाकडून तसेच जिल्हा परिषदेकडून वेळोवेळी जाहीर होणाऱ्या योजनांची माहिती प्राप्त करून ती ग्रामसभा, मासिक सभा व इतर सार्वजनिक कार्यक्रमा मार्फत ग्रामस्थ पर्यंत पोचवणे. त्याबाबतीत ग्रामस्थांना माहिती देणे. सदर योजनेचा ग्रामस्थांना लाभ होण्याच्या दृष्टीने पंचायत समिती पातळीवरील तांत्रिक अधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन योजना राबवणे.

2.दारिद्र्यरेषेखालील लोकांचे सर्वेक्षण करणे पात्र लोकांच्या मागणीनुसार नियमानुसार प्रकरणात तयार करणे त्यांना मंजुरी घेणे व त्यानुसार खरेदी करून देणे 3.नरेगा व वित्त आयोग योजनांची शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन परिपत्रकानुसार हाती घ्यावयाच्या कामाचे स्वरूप व पंचायत समिती च्या साह्याने नियोजन करणे.

4.ग्रामसभेत पुढे कामाचे प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवणे. 5.प्रस्ताव मान्य झाल्यानंतर सदर प्रस्ताव खातेप्रमुख तांत्रिक अधिकारी यांच्याकडे मंजूरी साठी पाठवणे. बांधकामावर देखरेख ठेवणे, कामाची पाहणी करून मूल्यांकन करण्यासाठी प्रस्ताव पाठवणे. नरेगा योजनेअंतर्गत निर्माण झालेल्या मालमत्तेबद्दलची नोंदणी करणे, सदर योजनेची जमा करायची माहिती ग्रामसेवक व सरपंच यांच्या संयुक्त सहीने ग्रामसभेत ठेवणे.

आता कुटुंब कल्याण कार्यक्रम आपल्या गावांमध्ये राबविण्यात विषयी माहिती बघुयात. 4.कुटुंब कल्याण कार्यक्रम: 1.कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा प्रसार आरोग्य खाते व पंचायत समितीचे सरपंच व सभासद यांच्या सहकार्याने करणे. 2.कुटुंब कार्यक्रमाअंतर्गत शासनाकडून वेळोवेळी नवीन आलेल्या योजनांची माहिती ग्रामस्थांना देणे.

ग्रामसेवकाच्या कर्तव्यतील मुद्दा आपण बघणार आहोत तो म्हणजे कल्याणकारी योजना. 5.कल्याणकारी योजना: 1.महिला बालकल्याण, समाज कल्याण,साक्षरता, अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी कामे स्थानिक संस्थांच्या सहकारी घेऊन योजनांबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे.

2.मोफत कायदेविषयक सहाय्य व सल्ला देणे, विविध योजनांची माहिती,जिल्हास्तरावरून घेऊन ती ग्रामस्थांना अवगत करून देणे तसेच या योजनांची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व कार्य करणे. 6.गाव माहिती केंद्र: ग्रामपंचायत क्षेत्रात माहिती केंद्राची स्थापना करून दूरदर्शन, संचार, रेडिओ व सार्वजनिक वाचनालय यांच्या द्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देणे.

7.पशुसंवर्धना बाबत विविध योजना गावात राबविणे: या योजनेसाठी प्रोत्साहन देणे व संकरित जनावरांच्या वाढीसाठी उत्तेजन देणे. 8.संकीर्ण: 1.गावाला शुद्ध पाणीपुरवठा करून अशा योजना सुस्थितीत ठेवणे त्यांची दुरुस्ती व देखभाल करणे, शुद्धीकरणासाठी औषधांचा पुरेसा साठा करणे, पाणीवाटपाचे नियोजन देत, दुरुस्तीसाठी होणाऱ्या खर्चाला पाणीपट्टी बसवणे,

त्याबाबतचा अहवाल पंचायतीला सादर करणे आणि त्यावर पंचायतीने केलेल्या कारणानुसार ग्रामपंचायत अधिनियम कलम 129 नुसार पाणीपट्टी व विशेष पाणीपट्टी वसुलीची कार्यवाही करणे. 2.दुष्काळ भूकंप पूर इत्यादी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत त्वरित संबंधित खात्याला कळवणे व ग्रामपंचायतीने आरोग्य खात्याच्या सहाय्याने प्राथमिक उपाययोजना करणे.

9.इतर कामे: जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व जिल्हा परिषदेचे इतर वरिष्ठ अधिकारी यांनी वरील कार्य सूची मधील व त्या व्यतिरिक्त वेळोवेळी सोपविलेली इतर कामे पार पाडणे. अशी महत्वाची कामे करावी लागतात. तर आज आपण अशा प्रकारे ग्रामसेवकाची कामे भाग २ मध्ये माहिती घेतली.