ग्रँड कॅनियनच्या रौद्र रूपाचे अधांतरी दर्शन ।। घोड्याच्या नालाच्या आकारात असलेला हा स्कायवाॅक बद्दल जाणून घ्या आजच्या लेखातून !

प्रवास

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

केवळ विचार केला तरी अंगावर काटा उभा राहिल, मग प्रत्यक्ष अनुभव घेतला तर काय होईल? केवळ दुरुन पाहिलं तरी भीती वाटेल, मग प्रत्यक्ष त्यावर उभं राहिलं तर काय होईल? त्याबद्दल केवळ वाचलं तरी ते विराट रुप एकदां तरी पहायला मिळावं याची उत्सुकता निर्माण होईल. अमेरिकेतील ॲरिझोना प्रांतामधील ग्रँड कॅनियन ह्या पर्वतराजीला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला आहे.

लाखो वर्षांचा भूवैज्ञानिक इतिहास उलगडणाऱ्या ह्या लाल रंगांच्या पर्वत रांगा जगभरातील प्रवाशांचे आकर्षण आहेत. तसं इथल्या पर्वतांचं दर्शन हेलिकॉप्टर मधून घेता येतं, पण जर तुम्हांला त्यांचं अगदी त्यांच्या माथ्यावर उभं राहून दर्शन घ्यायचं असेल, तेसुद्धां एका पारदर्शक काचेमधून, तर मात्र ग्रँड कॅनियन स्कायवाॅकला भेट द्यायलाच हवी.

‘हाॅर्स शू’ अर्थात घोड्याच्या नालाच्या आकारात असलेला हा स्कायवाॅक म्हणजे प्रगत इंजिनिअरिंगचा आविष्कार! भौतिकशास्त्राच्या नियमांना आव्हान देणाऱ्या ग्रँड कॅनियन स्कायवाॅक वर उभं राहून ४००० फूट खोलीपर्यंत बघायचं म्हणजे तसं भीतीदायक, तरीही लाखो लोक इथे येतात आणि निसर्गाचे अतिभव्य रुप डोळ्यात साठवून घेतात. ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क अमेरिकन सरकारच्या स्वाधीन आहे, पण ग्रँड कॅनियन स्कायवाॅक ही मात्र खाजगी मालमत्ता आहे.

लास वेगासचे व्यावसायिक डेव्हिड जिन यांनी १९९६ मध्ये ग्रँड कॅनियनला भेट दिली तेव्हा स्कायवॉकची कल्पना त्यांना सुचली. लोचसा इंजिनिअरिंग, एमआरजे आर्किटेक्ट्स आणि एक्झिक्युटिव्ह कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट यांच्या भागीदारीत, जिन यांनी स्कायवॉकची रचना आणि बांधणी केली आणि २००७ च्या मार्चमध्ये त्याचे उद्घाटन करण्यात आले. स्कायवॉकवर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या काही लोकांपैकी बझ आल्ड्रिन आणि जॉन हेरिंग्टन हे दोन अमेरिकन अंतराळवीर होते.

हा स्कायवॉक बांधताना कॅन्टिलिव्हर्ड पुलाच्या संकल्पनेचा वापर करण्यात आला. कॅन्टिलिव्हर्ड पुल म्हणजे काय? : कॅन्टिलिव्हर्ड हा अधांतरी पुल असतो जो फक्त एका टोकाला आधार घेऊन बांधलेला असत़ो. स्कायवॉक सारख्या मोठ्या कँन्टिलिव्हर्ड पुलांना स्ट्रक्चरल स्टील किंवा काँक्रीट बॉक्स गर्डर सारख्या मजबूत, जड साहित्याचा वापर करून बांधलेल्या बीम आणि ट्रसचा आधार दिला जातो.

आता हा स्कायवॉक कसा बांधला गेला ते पाहू. स्कायवॉकचे बांधकाम ६ ऑक्टोबर २००४ रोजी सुरू झाले, तेव्हां हुआलापाय इंडियन्सनी ग्रँड कॅनियनच्या बांधकामाला पारंपारिक पद्धतीने आशीर्वाद दिला. हुआलापाय इंडियन्स कोण आहेत? तर ग्रँड कॅनियन क्षेत्रामधील मूळचे रहिवासी. एक महिन्यानंतर ड्रिलिंग सुरू झाले आणि दीड वर्षानंतर पूर्ण झाले. स्टील बीम वेल्डिंगला आणखी ४ महिने लागले.

स्कायवॉकसाठी लागणारे वेगवेगळे भाग प्रत्यक्ष जागेवर आणून एकत्र जोडण्यात आले. जाड काचेचे पॅनेल योग्य जागेवर बसविण्यासाठी मोठ्या सक्शन कपचा वापर करून डिझाइन केलेले विशेष मॅनिप्युलेटर वापरण्यात आले. बांधकाम सुरू झाल्यानंतर अडीच वर्षांनंतर प्राचीन इजिप्शियन लोकांनी पिरॅमिड बांधण्यासाठी वापरलेल्या पद्धतीचा वापर करून काचेचे पॅनेल जागेवर आणले गेले.

हा स्कायवॉक न पडता जागेवर कसा टिकून राहतो? एकूण ८ खांबांच्या पायावर हा स्कायवॉक उभा आहे. हे खांब ६ फूट उंच, ३२ इंच रुंद आणि २ इंच जाडीच्या भिंती असलेल्या बॉक्स बीमला आधार देतात. बॉक्स बीमचा पाया ४५ फूट खोल आहे आणि स्कायवॉकच्या कॅन्टिलिव्हर डिझाइनसाठी काउंटरवेट म्हणून काम करण्यासाठी ते चुनखडीच्या पर्वताच्या तळाशी बसविलेले आहेत.

आतां ह्या स्कायवॉकच्या काचेबद्दल जाणून घेऊया : स्कायवॉकच्या काचेच्या डेकमध्ये मूलतः अत्यंत जाड काचेचे चार थर होते, ज्यांची जाडी ४ इंच, रुंदी १० फूट, आणि प्रत्येकाचे वजन सुमारे एक टन होते. २०११ मध्ये, स्कायवॉकचे उद्घाटन झाल्यानंतर चार वर्षांनी काचेचे पॅनेल प्रथमच बदलण्यात आले. ह्या वेळी १८०० पाउंड काचेचा प्रत्येक तुकडा उचलण्यासाठी १५० फूटी क्रेन वापरण्यात आली. नवीन स्कायवॉकवर काचेचे पाच थर आहेत आणि प्रत्येकाची जाडी २.५ इंच आहे.

ह्या स्कायवॉकचे वजन १,०००,००० पौंडांपेक्षा अधिक आहे. ह्यात वापरलेल्या स्टीलचे वजन देखील १,०००,००० पौंड आहे आणि काचेचे वजन ८०,००० पौंडापेक्षा जास्त आहे. बाकी सुरक्षिततेबाबत तर बोलायलाच नको. स्कायवॉक ७० पूर्णपणे भरलेल्या ७४७ बोईंग विमानांचे वजन पेलू शकतो; अर्थात एका वेळी फक्त १२० लोकांना त्यावर प्रवेश आहे. १०० मैल प्रति तास वेगाने वाहणारे वारे आणि ८.० तीव्रतेचा भूकंप देखील हा स्कायवॉक सहन करू शकतो. मग? कधी जात आहात ग्रँड कॅनियनला भेट द्यायला?

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.