कोकण रेल्वे – आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार, वाचा सविस्तर

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

कोणतीही देशव्यापी योजना राबवायची असेल, तर मार्गदर्शनासाठी आणि ती योजना तडीस नेण्यासाठी सहसा एखाद्या विदेशी तज्ज्ञाची किंवा तज्ज्ञांच्या टीमची मदत घेतली जाते. परंतु भारतामध्ये एक अशी योजना यशस्वीपणे साकार झाली, जी संपूर्णपणे भारतीयांनी डिझाईन केली आणि यशस्वीरित्या तडीस नेली. ती महत्वाकांक्षी योजना म्हणजे कोकण रेल्वेचा प्रकल्प!

आठ वर्षांच्या विक्रमी कालावधीत भारतीय इंजिनिअर्सनी डिझाइन आणि बांधणी केलेली कोकण रेल्वे तुम्हांला उंच पर्वत, दऱ्या, सूर्यप्रकाशात न्हाऊन निघालेली भातशेती, गजबजलेली गावे आणि समुद्राकडे जाणाऱ्या अथांग नद्यांमधून एक चित्तथरारक प्रवास घडवते. कोकणातील लोकांचे दीर्घकाळचे स्वप्न साकार करताना, कोकण रेल्वेच्या उभारणीने भारताच्या नैऋत्य किनारपट्टीला देशाच्या इतर भागांशी एका सरळ रेषेत प्रभावीपणे जोडते.

कोकण रेल्वे हा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने हाती घेतलेला आणि यशस्वीपणे पूर्ण केलेला सर्वात मोठा आणि कठीण पायाभूत प्रकल्पांपैकी एक आहे. आज कोकण रेल्वे महाराष्ट्रातील रोहा रेल्वे स्थानकापासून सुरू होऊन दक्षिणेकडील मंगळूरजवळील ठाकूर रेल्वे स्थानकावर संपून महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमधून ७३८ किलोमीटरचा प्रवास करते.

कोकण रेल्वेची रचना आणि बांधणी हा एक मनोरंजक प्रवास आहे ज्याबद्दल अनेकांना माहित नाही. विशेष म्हणजे कोकण रेल्वेच्या उपक्रमाचा इंग्रजांनी एक शतकापूर्वी विचार केला होता, पण तो प्रकल्प खूप अवघड असल्यामुळे सोडून दिला होता.

कोकण रेल्वेच्या उभारणीत इंजिनिअर्सना अनेक अडचणी आल्या. खडकाळ सह्याद्रीच्या डोंगररांगा पोखरून, दऱ्याखोऱ्यांतून आणि १,५०० हून अधिक दुथडी भरुन वाहणाऱ्या नद्यांमधून मार्ग काढावा लागला. तत्कालीन रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस हे कोकण किनार्‍यावरील उडपी शहराचे रहिवासी होते आणि त्यांना हा महत्त्वाचा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची ओढ लागली होती. त्यांनी आपल्या कार्यक्षमतेसाठी ओळखले जाणारे अनुभवी डॉ. ई. श्रीधरन यांना १९९० मध्ये स्थापन झालेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपद स्वीकारण्याची विनंती केली.

१६० किमी प्रति तास वेगाच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी, १.२५ कि. मी. त्रिज्येची किमान वक्रता असलेला सपाट रेल्वे मार्ग आवश्यक होता. हे साध्य करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सरळ रेषेत नसलेल्या भूप्रदेशातून रेल्वेमार्ग तयार करणे. याचा अर्थ पुष्कळसे पूल, बोगदे इत्यादी बांधणे जे रेल्वेमार्गाला त्याची पातळी टिकवून ठेवण्यास सहाय्यक ठरतील. आरेखन करण्यासाठी उपग्रह प्रतिमांचा वापर करण्यात आला आणि दोन्ही टोकांपासून काम सुरू झाले.

कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांतील ४२००० हून अधिक जमीन धारकांकडून ४८५० हेक्टरहून अधिक जमीन संपादित करण्यात आली. विशेष म्हणजे या प्रकल्पाचे महत्त्व पटून अनेकांनी स्वेच्छेने आपली मालमत्ता आणि जमिनीचा त्याग केला. भारतात अजूनही नोकरशाही वरचढ आहे, तरीही विस्थापित शेतकर्‍यांचे योग्य पुनर्वसन करताना रक्कमेचे धनादेश घरोघरी वितरीत केले गेले, तेही केवळ बारा महिन्यांत.

अनेक वेळा काम बंद पडत असे, विशेषतः पावसाळ्यात, कारण काही बोगदे खोदल्यावर लगेचच ढासळत आणि ते पुन्हां खोदावे लागतं. १९९४ मध्ये महाड सेक्टरमध्ये पाण्याची पातळी रस्त्याच्या पातळीपेक्षा १२ फूट वर गेल्याने पूर आला होता. उक्षी येथे डोंगरावर केलेले काम आणि उपकरणे; दोन्ही पुरली गेली. पर्नेम बोगदा बांधणारे अभियंता कपूर, माती कोसळल्यानंतर छातीपर्यंत खोलवर गाडले गेले आणि त्यांचे सहकारी जयशंकरन यांनी धाडस दाखवून त्यांना वाचवले; त्यांना शौर्य पुरस्कार मिळाला. अशा अनेक प्रसंगांना तोंड देत काम सुरू राहिले.

या निसर्गरम्य मार्गावर करबुडे येथे भारतातील तत्कालीन सर्वात लांब ५.६ किमी लांबीचा बोगदा आहे. या मार्गामध्ये पनवल नदीवरील ब्रॉडगेज ट्रॅकचे ४२४ वायडक्ट किंवा छोटे पूल देखील आहेत.

बोगदे खोदण्यासाठी हायड्रोलिक उपकरणे स्वीडनमधून आयात करण्यात आली. मोठ्या पुलांसाठीचे पायर्स किंवा खांब वाटेत लागणाऱ्या नद्यांच्या काठावरच टाकण्यात आले आणि पॉंटूनवर बसविलेल्या क्रेनचा वापर करून ते सुरू करण्यात आले. सुमारे २००० छोटे मोठे पूल बांधले गेले आणि ९१ बोगदे खोदले गेले.

भारतात प्रथमच या प्रकल्पासाठी सरकारी तिजोरीला हात न लावता निधी उभारण्यात आला. अधिकृत भांडवल भारतीय रेल्वे, केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र राज्यांनी एकत्रित उभारले. हे भांडवल सार्वजनिक रोख्यांच्या द्वारे उभे करण्यात आले, ज्यात आकर्षक परतावा, कर सूट आणि परतफेडीची हमी आहे.

आठ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर, कोकण रेल्वे सागरी मार्गावरील पहिली पॅसेंजर ट्रेन २६ जानेवारी १९९८ रोजी रवाना झाली. ज्या देशात उड्डाणपूल पूर्ण होण्यास अनेक वर्षे लागतात, त्या देशात बांधकामाचा हा अविश्वसनीय वेग होता!

कोकणातील सर्व गावांपर्यंत पोहचणारी आणि शहरातील कोकणी माणसाला त्याच्या कोकणातील घरापर्यंत घेऊन जाणारी कोकण रेल्वे ही अभियांत्रिकी, कार्यक्षमता, नावीन्य आणि समर्पण अशा अनेक कसोट्यांवर यशस्वीपणे उतरणारी रेल्वे आहे. पश्चिम घाटाची नेत्रदीपक दृश्य, डोंगरांमधून जाणारा थरारक मार्ग, आणि कोकणातील मातीचा अद्भुत सुगंध; कोकण रेल्वे हा एक असा अनुभव आहे, जो दीर्घकाळ आपल्या स्मरणात राहील.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.