वडिलोपार्जित जमिनी मध्ये सर्व वारसांची नावे न टाकता फक्त काही वारसांची नावे टाकता येते का?।।फसवणूक करून केलेल्या कराराला कसे आव्हान द्यायचे?।। वडीलोपार्जीत जमिनीचे काही अनोंदणीकृत करार स्टॅम्प पेपर वर केलेली असल्यास काय करता येईल?।।मृत्युपत्र मध्ये जर मुलींची नावे न टाकता फक्त मुलांची नावे टाकलेली असतील आणि मृत्युपत्र करणारी व्यक्ती हयात असेल तर काय करता येईल?।। अविभाजित मालमत्तेची विक्री करता येते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

प्रश्न 1: वडिलोपार्जित जमिनी मध्ये सर्व वारसांची नावे न टाकता फक्त काही वारसांची नावे टाकलेली आहेत, ज्याच्या महसुली अभिलेख आहे म्हणजेच सातबारा आहे त्यामध्ये सर्व वारसांची वारस नोंद ही आज रोजी झालेली नाही आहे तर अशा परिस्थितीत काय करता येईल?

उत्तर:- सर्वप्रथम आपल्याला त्या जमिनीचे महसूल अभिलेख आहेत याच्या परिस्थितीचा शोध घेणे आवश्यक आहे, त्याकरता आपण जी काही कागदपत्रे मिळत असेल त्याचा महसुली अभिलेख आहे, त्याचा सातबारा आणि त्या सातबारा चे जेवढे आपल्याला फेरफार मिळतील तेवढे फेरफार याची आधी प्रत मिळवली पाहिजे.

ती एकदा प्रत मिळाली की त्या सात-बारावर आज पर्यंत काय काय फेरफार झाले आणि आजपर्यंत कोणा कोणाची नावे कशाप्रकारे लावण्यात आले, याबद्दल स्पष्टता येईल एकदा स्पष्टता आली की मग नक्की या जमिनीवर नाव लावताना कधी आणि काय चुकलं हे आपल्याला कळेल,

हे आपल्याला कळलं की ती चुकीची नोंद कुठल्या फेरफार अनुसार झाली आहे किंवा कुठल्या फेरफार मध्ये वारस नोंद करताना ठराविक वारसाची नोंद केली नाहीये ते आपल्या लक्षात येईल. हे एकदा आपल्या लक्षात आलं की मग चुकीचा फेरफार मांडण्यात आला आहे त्या फेरफाराला आपल्याला आव्हान देता येईल.

बरेचदा असं होतं की फेरफाराला आव्हान देण्याचे मुदत फार कमी आहे आणि तो फेरफार फार जुना आहे आणि त्याला आव्हान द्यायला आता चिक्कार उशीर झालेला आहे. त्यामुळे या फेरफाराला आव्हान द्यायला आपल्याकडे प्रांत अधिकार्‍याकडे अपील करतो ते निश्चितच मुदत निघून गेली आहे,

अशा वेळेस आपल्याला सर्वप्रथम एक विलंब माफ करण्यासाठी अर्ज करावा लागेल आणि या अर्जावर सुरुवातीला काम चालेल जर का आपला विलंब माफ झाला तर आपण आपल्या माहितीनुसार जो चुकीचा फेरफाराला आहे त्याला आपण आव्हान करु शकतो. त्यामुळे आपली कारवाई चालू होईल. विलंब माफ झाला तर प्रश्नच नाही पण जर विलंब माफ नाही झाला तर त्याच्याविरुद्ध सुद्धा आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करता येईल.

प्रश्न 2: फसवणूक करून केलेल्या कराराला कसे आव्हान द्यायचे? उत्तर:- आपल्याकडे दोन पर्याय आहेत पहिला आहे फौजदारी, दुसरा आहे दिवाणी ,जर ज्या लोकांनी फसवणूक केली आहे त्यांना शिक्षा व्हावी, तुरुंगात जावे, त्यांना दंड व्हावा अशी जर आपली इच्छा असेल आणि ते जर आपले ध्येय असेल तर त्या विरोधात आपण पोलीस स्टेशन किंवा संबंधित न्यायालयामध्ये त्यांच्याविरुद्ध फौजदारी प्रक्रिया सुरू करणे अत्यावश्यक आहे.

दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे दिवाणी.जर आपल्याला जो काही व्यवहार झालेला आहे तो चुकीचा आहे, बेकायदेशीर आहे किंवा गैर आहे अस जर घोषित करुन हवा असेल तर किंवा जर करार रद्द करून हवा असेल तर जमीन आपल्याला परत मिळवून हवे असेल तर, त्याकरता आपल्याला सक्षम दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल.

असा दावा दाखल करण्याकरता कागदपत्रांची आवश्यकता असते त्या अनुषंगाने त्याचा मालमत्तेची सर्व कागदपत्रे जसे की जमिनीचा सातबारा फेरफार आणि आपल्याला जो करार आव्हान करायचा आहे त्याची एक साक्षांकित प्रत आधी मिळाली पाहिजे

त्या कागदपत्रांचा अभ्यास आपण जर केला तर आपल्याला आपण कुठल्या न्यायालयात जाऊ शकतो,कुठे दाद मागू शकतो हे स्पष्ट होईल आणि हे चित्र एकदा स्पष्ट झाले की आपण उपलब्ध पर्यायांपैकी सर्वोत्तम पर्याय देऊन त्या त्यानुषंगाने कारवाई पूर्ण करू शकतो.

प्रश्न 3:- वडीलोपार्जीत जमिनीचे काही अनोंदणीकृत करार स्टॅम्प पेपर वर केलेली असल्यास काय करता येईल? उत्तर:- सर्व प्रथम करार म्हटलं की तो करार कायदा आणि नोंदणीकृत कायदा यांच्या चौकटीतच असला पाहिजे. मात्र बर्‍याचदा असं होतं की तो तो करार वैध्य जरी असेल तरी त्याची नोंदणी होत नाही किंवा केली जात नाही अशा परिस्थितीत जेव्हा कुठल्याही कराराची नोंदणी होत नाही.

तोपर्यंत त्याला पूर्ण कायदेशीर स्वरूप प्राप्त होत नाही अशा परिस्थिती जेव्हा एखादा करार नोंदणीकृत होत नाही आणि त्या अनुषंगाने तसेच जमिनीच्या महसूल अभिलेखा मध्ये फेरफार करताना नावांची अदलाबदल किंवा असे काही प्रकार झाले असतील तर त्या करता आपल्याला दोन ठिकाणी कारवाई सुरू करावी लागेल.

तो जर काही करार आहे,तो अवैध्य आहे त्याच्या करता आपल्याला दिवाणी न्यायालयात जावे लागेल आणि त्या अनुषंगाने महसूल अभिलेखात काही गडबड झाली असेल तर त्याच्या विरोधात दाद मागण्याकरिता आपल्याला महसूल म्हणजेच प्रांत अधिकारी यांच्याकडे जावं लागेल आणि ह्या दोन्ही कारवाई आपण एकदा सुरू केली की जी काही चूक झाली आहे ती सुधारण्याच्या दृष्टीने आपली वाटचाल चालू होईल.

प्रश्न 4: मृत्युपत्र मध्ये जर मुलींची नावे न टाकता फक्त मुलांची नावे टाकलेली असतील आणि मृत्युपत्र करणारी व्यक्ती हयात असेल तर काय करता येईल? उत्तर:- कायद्यानुसार मृत्युपत्र हे फक्त त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच लागू होतं ती व्यक्ती जिवंत असेपर्यंत ती कितीही मृत्युपत्र करू शकते आणि तुमचे शेवटचे मृत्युपत्र असेल ते मृत्युपत्र मृत्यूनंतर ग्राह्य समजले जाते.

त्याच्या आधी कितीही मृत्यूपत्र झाले असले तरी ते प्रत्येक नवीन मृत्युपत्राने त्याच्या आधीची सर्व मृत्यूपत्र ही बाद होत असतात. दुसरी गोष्ट अशी की जर वडिलोपार्जित मालमत्ता असेल आणि मृत्युपत्र हे फक्त मुलांचे नावे केलेले असेल तर आपण त्याला आव्हान देऊ शकतो कारण वडिलोपार्जित मालमत्ता असल्यामुळे त्यामध्ये सर्वांचा विभाजित अधिकार आहेत,

मात्र ती मालमत्ता स्वकमाईची असेल तर आपण त्या विरोधात कसलही आव्हान देऊ शकत नाही. कारण, स्वकष्टाची मालमत्ता कुणाला द्यायची याचा संपूर्ण अधिकार त्या मालकाला असतो.स्वकष्टार्जित मालमत्ता असेल आणि त्या मालमत्तेच्या मालकाने मृत्युपत्र हे आपल्या घरातील नातेवाईक किंवा अपत्य यांच्या नावे न करता कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीच्या नावे जरी केले तरी त्याला आव्हान देणे हे कठीण आहे. त्याच्याबद्दल आपण त्या माणसाकडून कायद्याने हक्क म्हणून काही मागू शकत नाही.

प्रश्न 5:- अविभाजित मालमत्तेची विक्री करता येते का? उत्तर:- सर्वप्रथम अविभाजित मालमत्ता म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. आपल्याकडे कसा आहे की वडीलोपार्जित आणि पारंपरिकतेनुसार किंवा पिढ्यान पिढ्या चालत आलेली मालमत्ता जसे की घर आहे शेती आहे.

जमीन जुमला आहे आणि आपल्या वारस हक्कानुसार एखाद्या जमिनीचं सरस निरस वाटप होत नाही तो वर वंशावळीने जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र अविभाजित हक्क आणि हिस्सा असतो,आता होतं अस की सगळ्या वारसांची नावे लावली जात नाही किंवा वारसांची नावे लावली गेली तरी त्या प्रत्येक वारसाचा हक्काने जो हिस्सा किती आहे हा कधीच स्वतंत्र केला जात नाही.

आणि केला गेला तरी त्याची कागदोपत्री नोंद होत नाही अशा वेळेस एकत्रित कुटुंबाची मालमत्ता वाटप न करता तसेच एकत्रित मालमत्ता आहे अशा परिस्थित होतं काय तर त्या सगळ्या मालमत्तेमध्ये कुटुंबातील व्यक्तीचा हक्क किती आहे आणि कुठे आहे काही निश्चित सांगता येत नाही.

तर त्या जमिनीची विक्री करण्याकरता ती जागा आहे कुठे हे सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे समजा एक एकर जागा आहे आणि त्याचे चार हिस्सेदार आहे तर त्याचे चार हिस्से होतील, परंतु जोवर कोणाचा भाग कुठलं त्याचे जोपर्यंत वाटप होत नाही तोवर त्या मालमत्तेची विक्री जरूर करता येईल.

पण तो फक्त आपण ज्याला मालकीहक्क म्हणतो तेच विकता येतं ताबा मात्र देता येत नाही कारण की खरेदीदाराने घेतलेली जागा नक्की कोणती आहे हे जोपर्यंत निश्चित सांगता येत नाही तोपर्यंत त्या व्यवहाराला कायदेशीर रित्या ग्राह्य धरणे जरा कठीण आहे.

त्यामुळे जेव्हा जेव्हा अविभाजित मालमत्तेच्या विक्रीचा प्रश्न येतो तेव्हा शक्यतोवर विक्री च्या अगोदर अशा मालमत्तेचा सरळ सरस वाटप करून घ्यावा किंवा मग सरळ सरस वाटप करायला आपल्याला वेळ लागणार असेल आणि आपल्याला व्यवहार तातडीने करायचं असेल आणि त्याला बाकी सगळ्यांची संमती असेल तर अशा खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये सगळ्या हिस्सेदारांनी सामील व्हावं. जेणेकरून विकणारा आणि घेणारा यांच्यामध्ये भविष्यात काही वाद निर्माण होणार नाही.

सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

9 thoughts on “वडिलोपार्जित जमिनी मध्ये सर्व वारसांची नावे न टाकता फक्त काही वारसांची नावे टाकता येते का?।।फसवणूक करून केलेल्या कराराला कसे आव्हान द्यायचे?।। वडीलोपार्जीत जमिनीचे काही अनोंदणीकृत करार स्टॅम्प पेपर वर केलेली असल्यास काय करता येईल?।।मृत्युपत्र मध्ये जर मुलींची नावे न टाकता फक्त मुलांची नावे टाकलेली असतील आणि मृत्युपत्र करणारी व्यक्ती हयात असेल तर काय करता येईल?।। अविभाजित मालमत्तेची विक्री करता येते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !”

 1. केशव तुकाराम पाटील

  सर नमस्ते.. मी केशव तुकाराम पाटील.. राहणार शिंदेवाडी. तालुका. मिरज जिल्हा सांगली.. सर माझी शेत जमीन 29गुंठे असून मला दोन पत्नी आहेत. त्यातली पहिली पत्नी पासून मला दोन मुले आहेत. व दुसऱ्या पत्नी पासून एक मुलगी आहे.. पण पहिली पत्नी माझा सांभाळ करत नाही कारण ती गेली 35वर्षे माझ्याबरोबर राहत नाही.. माझा पूर्ण सांभाळ माझी दुसरी पत्नी करते. जमीनेच्या 7/12 वर फक्त मीच वारस आहे. त्यात पहिल्या पत्नीचे नाव अथवा मुलांची नावे नाहीत.. आणि दुसऱ्या पत्नीचे देखील नाव नाही. पण गेल्या 6 वर्ष्यापासून मला परलेसिस झालेला आहे. माझी आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे. माझी दुसरी पत्नी कसेबसे मला राबून आणून जगवत आहे.. पण मला आता hi जमीन विकायची आहे.. तर मी ती जमीन कोणालाही न विचारता विकायची आहे. असं मी करू शकतो का 🙏

 2. माणिकराव देवरे

  आपन प्रकाशित केलेला लेख अतिशय उपयुक्त आहे.व तसेच दुसऱ्याची फसवणूक करून स्वताच्या फायदा करून घेणाऱ्याना नक्कीच आळा घालता येइल.व अन्याय पिडीताला न्याय मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल.त्याचप्रमाणे लढा कसा द्यावा याचेही अचूक मार्गदर्शन केले आहे.त्याचा भूमाफियांना नक्कीच आळा बसेल .

 3. आती तातडीची मोजणी साठी एक वर्ष होऊनही मोजणी झालेली नाही मराग्दर्षण करावे

 4. हरि ओम शेलार

  वडिलोपार्जित शेती किंवा जमीन आई च्या नावे आहे पण पंरसपर लहानाचे भावाने तीन भाऊ व एक बहीणी चा हींस्सा लहान भावाने स्वंताच्या पत्नी च्या नावे करून घेतला हक्क सोड पत्र व खाते वाटप न करता पत्नी च्या नावे ७/१२ फसवणुक करून घेतला या बद्दल प्रतिक्रिया काय कळवावे ?

  1. नमस्ते सर मी सागर बोडके मला असे विचारायचे आहे की जर वडिलोार्जित जमीन १९२५ मध्ये हयात असलेल्या दोन मुलांच्या नावे झाली आणि त्या दोन मुलान मधील एक मुलगा १९५२ सली मयेत झाला आणि हयात असलेल्या एका मुलाच्या नावे सर्व जमीन झाली .. आणि मयत वेकतीच्य वारसा चे नाव लागले नाही … आणि ते खूप वर्षा नंतर (२००७/८) त्याच्या असे लक्ष्यात येते की आपल्या वडिलोपर्जित वारसा हक्क मध्ये आपले नाव न लागता चुलत्याचे नावे सर्व जमीन गेली आहे.. तर त्या विरोधात ( मयत चुलत्याच्या मुलाच्या विरोधात ) वडिलोपर्जित जमिनी मधील हुस्या साठी दावा करता येऊ शकतो का आणि हीसा मिळू शकतो का

  2. माझ्या वडिलांनी माझ्या भावाच्या नावावर पाच एकर जमीन विकत घेतली. त्या वेळी माझ्या भावाचे वय 4वर्षे होते. तर मालक कोण आहे.

  3. Yogesh Dharrao Nikam

   सर माझ्या आजोबानी एक वडिलोपार्जित शेत काकांना 2008 मध्ये विकले आहे ते विकताना माझ्या वडिलांच्या आत्या ह्या 15 वर्षांपूर्वी 1993वारल्या होत्या काकानी खोटी बाई उभी करून ते विकत घेतले आहे आज रोजी आजोबा वारले आहेत तर ती खरेदी रद्द करता येईल का

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *