नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
सर्वसाधारणपणे पाहिलं तर स्वतःचं घर किंवा फार तर थोडी जमीन किंवा प्लाॅट विकत घेतला जातो. पण कुणी एखादं बेट विकत घेतलेलं ऐकलं आहे कां? असतात अशी काही माणसं जी चक्क बेट विकत घेतात. ब्रेंडन ग्रिमशॉ हा त्यापैकीच एक. अर्थात बेट विकत घेण्याचा विचार त्यांच्या मनांत ओघानेच आला.
जे लोक स्वतःचे बेट विकत घेऊ शकतात, ते श्रीमंत तर असणारच, आणि त्यातील बहुतेक जण एखादं बेट खरेदी करतात केवळ एक चैन म्हणून. ब्रेंडन ग्रिमशॉ यांचा विचार मात्र वेगळा होता. ग्रिमशॉ पहिल्यांदा सेशेल्समध्ये आले, त्यावेळी ते पूर्व आफ्रिकेतील एका मोठ्या वर्तमानपत्रामध्ये संपादक होते.
टांझानिया देश वर्षभरापूर्वीच स्वतंत्र झाला होता, आणि त्यांच्या लक्षात आले होते की लवकरच स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये सामावून घेतले जाईल. आतां ग्रिमशॉ यांना जगण्याचा दुसरा मार्ग शोधावा लागणार होता. पत्रकारिता तर ते घरी बसून देखील करू शकत होते, पण सुट्टी व्यतीत करण्यासाठी मात्र त्यांना स्वतःच्या मालकीचे एखादे निसर्गसुंदर स्थान असावे असे वाटू लागले. जेव्हां ते सेशेल्समध्ये सुट्टी व्यतीत करण्यासाठी आले, त्यावेळी त्यांच्या मनात हाच विचार घोळत होता.
पण त्यांना माहित नव्हते, की लवकरच ते स्वतःचे एक बेट खरेदी करणार आहेत.
सेशेल्समधील त्यांच्या सुट्टीच्या शेवटच्या दिवशी एक तरुण त्यांच्याकडे आला आणि त्याने ग्रिमशॉ यांना विचारले की त्यांना एखादे बेट विकत घ्यायचे आहे कां. त्यांनी हो म्हणताच तो तरुण ग्रिमशॉ यांना सेशेल्समधील माहे या सर्वात मोठ्या बेटाच्या उत्तर किनार्यापासून ४.५ कि. मी. अंतरावर असलेल्या मोयेन या छोट्याशा बेटावर घेऊन गेला. ग्रिमशॉ वनस्पतींनी नटलेल्या आणि शांततेच्या दुलईत पहुडलेल्या त्या बेटाच्या पाहताक्षणीच प्रेमात पडले आणि त्यांनी ते बेट चक्क विकत घेतले. किंमत ८००० डाॅलर्स, म्हणजे साधारण ४ लाख ८० हजार रूपये. हे घडलं १९६२ मध्ये. त्या काळाचा विचार केला तर ही किंमत खूपच झाली.
परंतु लवकरच त्यांच्या लक्षात आले, की मोयेन बेट खरेदी करणे एक वेळ परवडले, पण ते विकसित करणे कठीण काम. बेटावर राहणारे एक मच्छीमारांचे कुटुंब वगळता मोयेन अनेक दशकांपासून जगापासून अलिप्त होते. सेशेल्समध्ये पर्यटन सुरू झाल्यामुळे कोणीतरी पंचतारांकित रिसॉर्ट बांधण्यासाठी मोयेन बेटाचा विचार नक्कीच केला असणार. ग्रिमशॉ यांनी मोयेन बेट केवळ एक चैन म्हणून घेतलं नव्हतं, तर त्यांचं स्वप्न होतं त्या बेटाला जागतिक पर्यटन स्थळ बनवणं.
मोयेन हे फक्त ०.४ किमी लांब आणि जेमतेम ०.३ किमी रुंद आहे आणि त्याची किनारपट्टी २ किमी पेक्षा कमी आहे. मोयेन बेटावर सेशेल्सच्या अनेक किनाऱ्यांचे वैशिष्ट्य असलेली स्फटिकासारखी पांढरी वाळू आणि ग्रॅनाइटचे खडक आहेत. निळ्याशार आकाशाच्या पार्श्वभूमीवर गर्द झाडांची हिरवी वनराई आणि फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटा म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारा सृष्टीसौंदर्याचा नजराणा.
खरं तर मोयेन बेट खूपच छोटं होतं, आणि बेटाचं नैसर्गिक सौंदर्य अनेक गोष्टींमुळे खुलत नव्हतं. बेसुमार वाढलेली झाडे, रानटी गवत, तण ह्याचा जमीनीवर इतका खच पडलेला होता, की झाडावरून पडलेल्या नारळांचा आवाजाचं येत नव्हता, आणि बेटावर पक्ष्यांची लक्षणीय अनुपस्थिती होती.
ग्रिमशॉ यांच्या मदतीला रेने अँटोइन लाफॉर्च्यून नावाचा एक युवक होता, जो एका स्थानिक मच्छिमाराचा १९ वर्षांचा मुलगा होता. त्यांनी एकत्रितपणे बेटाचा कायापालट करण्याचे काम सुरू केले. हे आत्यंतिक कष्टाचे आणि पाठ मोडणारे काम होते, पण ते ग्रिमशॉ यांचे आयुष्यभराचे ध्येय बनले. १९८०च्या दशकात सेशेल्स जगातील पर्यटकांचे आकर्षण बनले होते आणि ग्रिमशॉ यांना मोयेन बेटासाठी ५० मिलियन डॉलर्सच्या ऑफर आल्या होत्या, पण त्यांनी सर्व ऑफरना नकार दिला.
जसजसे ग्रिमशॉ यांचे वय वाढायला लागले, मोयेन बेटाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी थोडाच वेळ उरला होता हे त्यांच्या लक्षात आले. त्यांना मूलबाळ नसल्यामुळे ते बेट कोणाच्या नावावर करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांनी योग्य तो निर्णय घेतला आणि मोयेन बेटाच्या सुरक्षेसाठी एक विश्वस्त संस्था स्थापन केली, तसेच सेशेल्सच्या पर्यावरण खात्यासह एक करार केला. अशा प्रकारे मोयेन बेट नॅशनल पार्कचा जन्म झाला.
ग्रिमशॉ यांना मोयेन बेट त्याच्या नैसर्गिक स्थितीमध्ये ठेवायचे होते, त्यामुळे त्यांनी बेटावर उंची हॉटेलची सुविधा, किंवा बेटावर फिरण्यासाठी आरामदायी गाड्या इत्यादीची काहीही सोय केली नाही. पर्यटकांनी इथे यावं आणि इथलं सृष्टीसौंदर्य नैसर्गिक स्थितीमध्ये अनुभवावं अशी त्यांची अपेक्षा होती आणि त्यांनी ती पूर्ण केली.
आज मोयेन बेट हे जगातील सर्वात छोटा नॅशनल पार्क म्हणून ओळखले जाते.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा