वर्ल्डकप मध्ये खेळलेला, विरेंद्र सेहवागची माफी मागणारा हा श्रीलंकेचा खेळाडू आता औस्ट्रेलियामध्ये बस चालवतो आहे.

क्रीडा

16 ऑगस्ट 2010 रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यात दांबुला येथे एकदिवसीय सामना खेळला जात होता. या मालिकेतील हा तिसरा सामना होता आणि श्रीलंकेचा कर्णधार तिलकरत्ने दिलशानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, पण हा निर्णय यजमानांना भारी पडला.

अवघ्या 170 धावा करून श्रीलंकेचा संघ भारताच्या गोलंदाजी समोर घायाळ झाला होता. लक्ष्य मोठे नव्हते पण भारताच्या तीन विकेट इतक्या झटपट पडल्या की श्रीलंकेला सामन्यात पुनरागमन करायला थोडासा चान्स मिळाला. मात्र, यानंतर सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने आपला टॉप गियर टाकून श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली.

श्रीलंकेने या सामन्यात पाच गोलंदाजांचा वापर केला, ज्यामध्ये सूरज रणदिव नावाच्या फिरकी गोलंदाजाचाही संघात समावेश करण्यात आला होता, जो सध्या खूप चर्चेत आहे. प्रत्यक्षात त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या ऑस्ट्रेलियात राहत असलेला रणदिव हा बस चालक बनल्याचे बोलले जात आहे.

श्रीलंकेसाठी एके काळी वर्ल्ड कप खेळणाऱ्या रणदिवची ही अवस्था पाहून आता त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी समोर येत आहेत, त्यात दांबुला वनडेचा देखील समावेश आहे.

रणदीवमुळे सेहवागचे शतक पूर्ण झाले नाही : श्रीलंकेविरुद्धच्या दांबुला वनडे सामन्यात भारताला सामना जिंकण्यासाठी अवघ्या काही धावांची गरज होती. त्याचवेळी सेहवागलाही आपले शतक पूर्ण करायचे होते पण रणदिवने जाणूनबुजून त्याचे शतक होऊ दिले नाही.

झालं असं की, 34.3 व्या षटकात सेहवाग 99 धावांवर असताना रणदीव गोलंदाजी करत होता. सेहवागने पुढच्याच चेंडूवर षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला पण तरीही तो शतकापासून हुकला. अरेच्चा, तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे? 99 आणि 6 म्हणजे 105, याचा अर्थ शतक पूर्ण झाले असेल नाही का? तर नाही…

रणदीपचा तो चेंडू ‘नो बॉल’ होता आणि तो मुद्दाम टाकला होता. अशा स्थितीत भारताला विजयासाठी आवश्यक धावा मिळाल्या पण सेहवागच्या खात्यात काहीच जमा झाले नाही. नो बॉल वर मिळालेल्या सर्व धावा हा फलंदाजाच्या खात्यात नव्हे तर ‘एक्सट्राज’ मध्ये जोडल्या जातात. म्हणून भारत तर मॅच जिंकला पण सेहवाग मात्र 99 वर नॉट आऊट राहिला.

नंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने रणदीववर कारवाई करत त्याच्यावर एका सामन्याची बंदी घातली आणि कर्णधार दिलशानची मॅच फी कापली कारण रणदीवने दिलशानच्या सांगण्यावरून तो नो-बॉल टाकला होता. सेहवागनेही या घटनेची आठवण करून देत एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

2011 च्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाचा भाग होता : रणदीवने 12 कसोटी आणि 31 एकदिवसीय सामन्यांमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने कसोटीत 43 आणि एकदिवसीय सामन्यात 36 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय तो २०११ च्या विश्वचषकात उपविजेता ठरलेल्या श्रीलंकेच्या संघाचाही सदस्य होता.

या उच्च पातळीवर खेळणाऱ्या रणदिवच्या कारकिर्दीने अचानक असे वळण घेतले की त्याला आता नेट बॉलर बनणे भाग पडले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये रणदिव ऑस्ट्रेलियन संघाचा नेट बॉलर होता हे जाणून आश्चर्य वाटेल.

त्याच वेळी, 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रणदिव ऑस्ट्रेलियामध्ये बस चालविण्याव्यतिरिक्त स्थानिक क्लबसाठी क्रिकेट खेळतो.